गेले अनेक दिवस सोशल मीडियावर मी कोरोनाने ज्या कुटुंबात मृत्यू झाले त्या निराधार कुटुंबांसाठी सरकारने काहीतरी करायला हवे यासंदर्भात पोस्ट लिहिल्या. २१ ते ५० वयोगटात (वय २१ ते ३० – १८१८) (वय ३१ ते ४० – ५८७०) (वय ४१ ते ५० – १२,२१५) असे एकूण १९९०३ मृत्यू झालेत. त्यावर लेख लिहिला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि त्यानंतर या विषयावर महाराष्ट्रातील ज्या संस्थांना व कार्यकर्त्यांना काम करावेसे वाटते त्यांनी संपर्क करावा अशी पोस्ट टाकली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल अवघ्या चार दिवसात १९० संस्था व व्यक्तींनी संपर्क केला. आम्हाला या विषयात काम करावेसे वाटते असे कळविले. महाराष्ट्राच्या एकूण २५ जिल्ह्यातील या संस्था व लोक आहेत. रायगड ते गडचिरोली-हिंगोलीपर्यंत लोक जोडले गेले. मी अक्षरशः भारावून गेलो. नंतर या सर्व व्यक्ती व संस्थांचा आम्ही व्हॉट्सअप ग्रुप केला व प्रत्येकाने आपल्या भागात कामाला सुरुवात केली.
त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाच्या राहुल मोरे आणि बिरासीस मॅडम या अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांच्याशी बोलणे झाल्यावर राज्यातील इतक्या संस्था एकत्र आल्यात म्हटल्यावर त्यांना खूपच समाधान वाटले. महिला बालकल्याण विभागाच्या आयुक्त पवनीत कौर यांना मेल करताच लगेच दुपारी तीन वाजता आपण या विषयावर मिटिंग करू असे त्यांनी कळवले. हा खरोखर सुखद धक्का होता. शासनस्तरावर आयुक्तपदावरून इतका जलद प्रतिसाद मिळाल्यावर लगेच दुपारी तीन वाजता त्यांनी बैठक घेतली आणि आणखी तपशीलवार सूचना करा पुढील आठवड्यात लगेच बैठक करून याबाबत नक्की काम सुरू होईल असे आश्वासन दिले. थोडक्यात मुलांसाठी महिला बाल कल्याण विभागाने महत्त्वाची भूमिका घेतली आता विधवा महिलाबाबत आहे हा विभाग काम करतो आहे. या विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनाही फोन करून सकाळी आम्ही एकत्र आलो आहोत ते सांगितले. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला मुंबईत जरूर भेटा असे सांगितले.
सोशल मीडिया हा अनेकदा खिल्लीचा विषय ठरतो, परंतु अनेक समविचारी संस्था व्यक्ती यांना एकत्र आणण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरले. त्यामुळे हे याच व्यासपीठावर नोंदवावेसे वाटते कदाचित हे काम फार पुढे जाईल किंवा जाणार नाही; परंतु किमान आपल्यासारखीच भावना असणार्याज अनेक ठिकाणच्या संस्था या निमित्ताने एकत्र आल्या व कामाला सुरुवात झाली आहे हे समाधान खूप मोठे आहे. या सदिच्छा गुणाकार होऊन महाराष्ट्रातील २०,००० कुटुंबांना आधार देण्याचे जर काही करू शकलो तर आमच्या सर्व संस्थांसाठी हा समाधानाचा क्षण असेल.
आपल्यापैकी कुणाला या कामाशी जोडून घ्यावेसे वाटत असेल तर जरूर संपर्क करावा व ८२०८५८९१९५ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.