□ उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मायावतींचा स्वबळाचा नारा
■ गेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मिळालेली मतं आणि जागा यांचा डोळसपणे अभ्यास केला असेलच त्यांनी!
□ माझ्यापेक्षा शिक्षकांना जास्त पगार, निम्मा पगार कर भरण्यात जातो : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
■ गणित आणि सामान्यज्ञान इतकं कच्चं नसतं तर राष्ट्रपती महोदयांनाही शिक्षक बनण्याची संधी होती.
□ सत्ता दिल्यास तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन नाहीतर राजकारण संन्यास घेईन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
■ बडे बुजुर्ग सांगतात की स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशीही गर्जना ऐकू आली होती एकेकाळी नागपुरातून.
□ वजन कमी करण्याच्या गोळ्यांची जाहिरात करण्यास शिल्पा शेट्टीचा नकार; १० कोटी रुपयांची
ऑफर धुडकावली
■ अभिनंदन शिल्पा. वजन कमी करण्यासाठी आहारात बदल आणि घट करून त्याला व्यायामाची जोड देण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही, हे अधोरेखित केल्याबद्दल.
□ घरगुती गॅसच्या किंमती १ ऑक्टोबरपासून पुन्हा भडकणार
■ चला चला भक्तगणहो, कच्चे पदार्थ खाणं हीच आपली संस्कृती, अशा पोस्टी सोशल मीडियावर फिरवण्याची वेळ झाली…
□ कोरोना नियमांचे उल्लंघन करून महिला सहकार्याचे चुंबन घेणारे ब्रिटनचे मंत्री अखेर पायउतार
■क्षण एक पुरे चुंबनाचा, वर्षाव पडो गच्छंतिंचा
□ लसीचे २१६ कोटी नव्हे, १३५ कोटी डोस मिळतील : केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
■ देशभरातल्या पेट्रोलपंपावर स्वत:भोवती बळेबळेच आरती ओवाळून घेणारे बोर्ड लावण्यासाठी केलेला खर्च लसींकडे वळवला असता तर जमलं असतं हे गणित.
□ भाजप आमदारांमध्ये सत्तेविना नैराश्य वाढीस लागल्याची चर्चा
■ सत्तेच्या आशेनेच ठिकठिकाणाहून उडी मारली होती, ती कोरड्या तळ्यात पडली… म्हणून तर आता सरकार पडणार, आता नक्कीच पडणार, असं डराव डराव करत राहायला लागतं सारखं.
□ भ्रष्टाचारी माणसाला राज्यपाल कसे बनवले? ममता बॅनर्जी यांचा जगदीश धनखड यांच्यावर हल्ला
■ दीदी, तुम्हाला सतत त्रास देण्याची गॅरंटी मिळाली तर एखादा बांगलादेशी घुसखोरही पावन करून घेतील केंद्रसत्ताधीश!
□ गंगेतील मृतदेहांचा एसआयटी तपास होणार नाही
■ एसआयटी, ईडी, बिडी, काडी हे सगळं विरोधकांच्या मागे ससेमिरा लावण्यासाठी वापरायचं असतं- आपलीच अब्रू घालवण्यासाठी कोण वापरील?
□ राज्यात रस्ते अपघातांत पाच महिन्यांत पाच हजार मृत्यू
■ टाळेबंदीमुळे रस्त्यात वाहनं नसतील, अशा समजुतीने बेफिकिरी वाढते आहे की काय?
□ घरोघरी लसीकरणासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची गरज काय? उच्च न्यायालयाचा फटकारा
■ केंद्रसत्तेने तेवढंच निमित्त करून लसपुरवठा थांबवला तर काय करायचं राज्यांनी?
□ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेलं बूस्टर पॅकेज म्हणजे फसवणूक : राहुल गांधी
■ हे सांगण्याची गरजच नाही. लोक आता पॅकेज जाहीर झालं की आपोआपच ओळखतात ते.
□ पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले
■ इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठीचा मास्टरस्ट्रोक आहे हा, समजून घ्या!
□ कोविडमुळे पालक गमावलेल्या पाल्याचा पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च माफ : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
■ योजना स्तुत्यच. अंमलबजावणी मात्र सरकारी खाक्याने व्हायला नको.