बारा आठवड्याहून अधिक अंतराने दुसरा डोस दिल्यावर प्रतिपिंडांचे प्रमाण वाढत असले तरीदेखील बारा आठवड्यांहून अधिक काळ थांबल्यास पहिल्या डोसचे संरक्षण कमी होऊन केवळ २८ टक्के उरते असेही संशोधनातून दिसून आले. त्यामुळे डब्ल्यूएचओ व इतर देश सहसा आठ ते १२ आठवडे एवढेच अंतर दोन डोसमध्ये ठेवताना आढळतात.
—-
एखाद्या लसीचा दुसरा डोस देण्याचा नियम कोविशिल्डबाबत जितक्या वेळा बदललाय तेवढा इतर कोणत्या लसीबाबत घडले नसेल. अर्थात त्यात चूक असे काही नाही. विज्ञान असेच असते. नवी माहिती उपलब्ध झाली की त्यानुसार मार्गदर्शक सूचनादेखील बदलतात. पण महासाथ सुरू असताना हा बदल योग्य वेळी होणे तसेच सारासार विचारांती होणे अपेक्षित आहे. तरच त्याचा सर्वोत्तम फायदा मिळेल.
शास्त्रीय माहितीच्या आधारे आपण कोविशिल्डच्या दुसर्या डोसचे बदलते गूढ सोडवायचा प्रयत्न करूया! सर्वप्रथम आपल्याला कोविशिल्डची क्रोनोलोजी समजून घ्यावी लागेल.
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड–एस्ट्राझीनिका लस म्हणजे भारतातील कोविशिल्ड. पुढील लेखामध्ये तिला कोविशिल्ड या एकाच नावाने उल्लेखिले जाईल. ३० डिसेंबरला इंग्लंडमध्ये या लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली गेली आणि दोन डोसमधील अंतर १२ आठवडे ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.
तीन जानेवारी २१ला भारतामध्ये डीसीजीआय म्हणजे ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात भारतीय औषध महानियंत्रकानी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. मात्र दोन डोसमधील अंतर चार ते सहा आठवडे असावे असे स्थानिक अभ्यासावरून ठरवले गेले. १६ जानेवारी २१पासून आरोग्य कर्मचार्यांच्या लसीकरणास सुरुवात झाली. १० फेब्रुवारीला डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने हंगामी परिपत्रक काढून कोविशिल्ड/ ऑक्सफर्ड लसीच्या दोन डोसदरम्यान आठ ते १२ आठवड्यांचे अंतर ठेवण्यास सुचवले. यामुळे लसीची परिणामकारकता ६५ टक्क्यांवरून ८२ टक्के इतकी वाढली असती.
१४-१५ फेब्रुवारीला आरोग्य कर्मचार्यांना त्यांचा दुसरा डोस चार आठवड्यांनी दिला गेला. (लसीची परिणामकारकता वाढवण्याची पहिली संधी हुकली.) २३ मार्च रोजी कोविड १९ साथीविरोधी लसीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ज्ञ पथकाच्या शिफारसीनुसार दोन डोसमधील अंतर सहा ते आठ आठवडे करण्यात आले. १३ मे रोजी लसीकरणविषयक तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड सब कमिटीच्या शिफारसीनुसार कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे केले गेले.
आता जूनमध्ये वरील समितीमधील तीन शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की दोन डोसमधील अंतर १२ आठवड्यांहून जास्त असणे योग्य नाही. कारण डब्ल्यूएचओने दोन डोसमधील अंतर आठ ते १२ आठवडे असावे असे सांगितले आहे. हा निर्णय समितीने एकमताने घेतलेला नव्हता. सरकारने अर्थातच हा दावा फेटाळला आहे व निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे.
इथे आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की या लसीची परिणामकारकता वाढावी म्हणून १२ आठवडे अंतर असावे असे प्रतिपादन करणारे संशोधन फेब्रुवारी-मार्च २१पासूनच प्रसिद्ध होत होते (लिंक लेखाच्या शेवटी दिल्या आहेत); मात्र भारताने हा बदल उशिरा म्हणजे मे २१मध्ये स्वीकारला. यामुळे हा बदल करण्यामागे शास्त्रीय कारण आहे की अजून काही, या शंकेला वाव मिळतो. कारण हा बदल करण्याने काही तोटा होईल का याचा सारासार विचार झालेला दिसून येत नाही.
दोन डोसमधील अंतरामध्ये बदल केवळ कोविशिल्डसाठीच केला गेला आहे. कोव्हॅक्सिन लस चार ते सहा आठवड्यांच्या अंतराने घ्यायची आहे. कोविशिल्डसाठीच्या या बदलासाठी विविध कारणे आहेत.
१. कोविशिल्ड (ऑक्सफर्ड) लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचण्या इंग्लंड, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये झाल्या व त्यामध्ये २४,४२२ एवढ्या स्वयंसेवकांनी भाग घेतला. प्रत्येक देशात विविध ठिकाणी ही चाचणी सुरू असल्याने चाचणीच्या पद्धतीमध्ये काही बदल झाले. एका केंद्रामध्ये चुकून पहिला डोस अर्ध्या क्षमतेचा दिला गेला. या चुकीमुळे लक्षात आले की पहिला डोस अर्धा दिल्यावर लसीची उपयुक्तता वाढते. ९० टक्के एफिकसी होऊ शकते. काही ठिकाणी काही सहभागी स्वयंसेवकांच्या बाबतीमध्ये दोन डोसमधील अंतर हे चारऐवजी १२ आठवड्यापर्यंत किंवा त्याहूनही अधिक झाले. या अहेतुकपणे घडलेल्या बदलांचे संख्याशास्त्रीय विश्लेषण केल्यावर असे लक्षात आले की दोन डोसमधील अंतर वाढले कि न्यूट्रलायझिंग अँटिबॉडी निर्माण होण्याचे प्रमाण जास्त असते (तिसर्या लिंकमध्ये याविषयी सविस्तर माहिती आहे).
२. ‘दोन डोसमधील अंतर वाढले की लसीची परिणामकारकता वाढणे, असे प्रत्येक लसीबाबत घडणार नाही. कारण कोविशिल्ड ही नव्या तंत्रज्ञानाने बनलेली लस आहे. स्पुतनिक आणि जॉन्सन अँड जॉन्सनची लस देखील समान तंत्रज्ञान वापरते. या लसींमध्ये सर्दीचा विषाणू (एडिनोव्हायरस) वापरून मानवी पेशीमध्ये करोनाचे एस प्रथिन तयार केले जाते. सर्दीच्या विषाणूची स्वतःच्या प्रती बनवण्याची क्षमता नष्ट केली जाते आणि त्याच्या डीएनएमध्ये करोनाच्या स्पाईक (काट्यामधील) एस प्रोटीन बनवण्याचा कोड फिट केला जातो. असे विषाणू लसीद्वारे शरीरामध्ये जातात. काही मानवी पेशी बाधित करतात आणि पेशींच्या सहाय्याने करोनाचे एस प्रोटीन बनवू लागतात. यामुळे करोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
यासाठी कोविशिल्डमध्ये चिम्पान्झीचा एडीनोव्हायरस आणि स्पुतनिकमध्ये दोन डोससाठी दोन वेगवेगळे मानवी एडीनोव्हायरस तर जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीमध्ये एक मानवी एडीनोव्हायरस वापरला आहे.
यामध्ये गंमत अशी आहे की काही प्रतिपिंडे (अँटिबॉडी) या सर्दीच्या व्हायरसविरुद्ध देखील निर्माण होतात आणि म्हणून लवकर दिलेला दुसरा डोस पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. प्रतिपिंडे लसीला देखील प्रतिकार करतात. यावर उपाय म्हणून स्पुतनिकने सरळ दोन वेगळे एडीनोव्हायरस दोन डोससाठी वापरले. न रहेगा बांस, न बजेगी बासुरी! जॉन्सन अँड जॉन्सनने केवळ एका डोसची लस विकसित केली.
भारताने संधी गमावली…
कोविशिल्डमध्ये एकच एडीनोव्हायरस वापरलेला असल्याने दोन डोसमधील अंतर वाढवले की शरीरातील एडीनोव्हायरसविरुद्धची प्रतिपिंडे कमी होतात आणि दुसरा डोस अधिक प्रभावीपणे करोनाविरुद्ध इम्युनिटी देऊ शकतो. याच कारणामुळे डब्ल्यूएचओने त्वरेने फेब्रुवारीमध्येच दोन डोसमधील अंतर चार आठवड्यांऐवजी आठ ते १२ आठवडे करण्याची अंतरिम सूचना (पहिली लिंक) दिली होती. मात्र दुर्दैवाने याचा उपयोग भारताने योग्य वेळी केला नाही. डब्ल्यूएचओवर विश्वास न ठेवता अधिक माहिती उपलब्ध होण्याची वाट बघण्याचे ठरवले. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचार्यांना चार आठवड्यांनी दुसरा डोस मिळाला. ज्यांना संसर्गाचा धोका सर्वाधिक होता त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी दोन डोसमधील अंतर वाढवून ९० टक्के एफिकसी मिळवणे सहज शक्य होते. पण त्यांना फक्त ६० ते ७० टक्के एफिकसी मिळाली. दुसर्या लाटेमध्ये ७००हून अधिक डॉक्टर मृत्युमुखी पडले आहेत, याचे एक कारण हे देखील असू शकेल. योग्य निर्णय योग्य वेळी घेतला नाही तर नुकसानच होते.
३. कोविशिल्ड ही लस आजाराची पूर्णपणे नक्कल करते, म्हणजे यामध्ये पेशी बाधित होतात. यामुळे कोविशिल्डच्या एका डोसमुळे देखील काही प्रमाणात संरक्षण मिळते असे आढळून आले आहे. (म्हणून तर जॉन्सन अँड जॉन्सनची लस एका डोसचीच आहे व साधारण ७२ टक्के एफिकसी देते.) कोविशिल्डची लस साधारण ७६ टक्के एफिकसी एका डोसनंतर देऊ शकते (पहा दुसरी लिंक), हे संशोधनातून लक्षात आल्याने त्याचवेळी (मार्चमध्ये) दुसरा डोस लांबवणे सहज शक्य होते. उपलब्ध लसीचे प्रमाण लोकसंख्येच्या मानाने कमी असताना इंग्लंडप्रमाणे जास्तीत जास्त जनतेला एका डोसची सुरक्षा देऊन साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणे फेब्रुवारी व मार्चमध्ये शक्य होते. लसीकरण संकोच जरी असला तरी जास्त गटांचा समावेश करून सर्व इच्छुकांना लस देता आली असती.
बारा आठवड्याहून अधिक अंतराने दुसरा डोस दिल्यावर प्रतिपिंडांचे प्रमाण वाढत असले तरीदेखील बारा आठवड्यांहून अधिक काळ थांबल्यास पहिल्या डोसचे संरक्षण कमी होऊन केवळ २८ टक्के उरते असेही संशोधनातून दिसून आले (पाहा तिसरी लिंक). त्यामुळे डब्ल्यूएचओ व इतर देश सहसा आठ ते १२ आठवडे एवढेच अंतर दोन डोसमध्ये ठेवताना आढळतात.
मीडियामधील बातम्यांमध्ये भारताखेरीज इतर काही देशांमध्ये दोन डोसमध्ये १२ आठवड्यांहून अधिक अंतर ठेवल्याचे उल्लेख आहेत. हे सत्य असेल तरी इतरांनी केले म्हणून आपण तसे करायला हवे असे नाही. कारण प्रत्येक देशाने आपल्या देशासाठी सुरक्षित आणि उपयुक्त मार्ग शोधणे अपेक्षित असते.
याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, बांगला देशाबाबत डेक्कन हेराल्डमध्ये काही बातम्या आढळल्या, ज्यामध्ये तेथे दोन डोसमधील अन्तर आठ आठवडे आहे असा उल्लेख दिसला. अंतर १२ आठवड्याहून अधिक नक्कीच नव्हते.
लसीच्या दोन डोसमध्ये किती अंतर ठेवायचे हे ठरवण्यासाठी वरीलप्रमाणे शास्त्रीय आधार असला तरीदेखील इतर अनेक तत्कालीन बाबींचा विचार देखील करायला हवा.
१. पहिला मुद्दा ‘लसीची उपलब्धता’ हा आहे. लस उपलब्ध असावी यासाठी अगदी सुरुवातीपासून योग्य नियोजन करून पुरेसे डोस नियमितपणे उपलब्ध होतील याची व्यवस्था करणे सरकारकडून अपेक्षित आहे. कोणतेही निर्णय ‘डोस उपलब्ध नाही’ यासाठी घेतले तर त्यामुळे होणार्या नुकसानीचा विचार करणे शक्य होत नाही. भारतातील लसीची कमतरता ऑगस्टनंतर कमी होईल असे सरकारी गोटातून सांगण्यात आले आहे. मात्र तोपर्यंत सर्वांना ‘मेरा नंबर कब आयेगा?’ अशी वाट बघावी लागणार आहे.
२. विषाणूंचे उत्परिवर्तन (म्युटेशन) झाल्याने नवनवीन आवृत्या निर्माण होतात. नव्या आवृत्यावर लस कितपत प्रभावशाली आहे याविषयी सतत संशोधन होणे आवश्यक आहे. फेब्रुवारी-मार्चनंतर आता परिस्थिती बदलेली आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेल्या डेल्टा व्हेरियंटविरुद्ध सर्व लसी कमी प्रमाणात सुरक्षा देतात असे आढळून आले आहे. एका संशोधनानुसार कोविशिल्डचा एक डोस डेल्टा विषाणू या उपप्रकाराविरुद्ध केवळ ३३ टक्के सुरक्षा देऊ करतो (पाहा दुसरी लिंक). त्यामुळे या डेल्टापासून सुरक्षित राहण्यासाठी कोविशिल्डचे दोन डोस पूर्ण होणे आवश्यक आहे.
याच कारणामुळे या नव्या माहितीस अनुसरून इंग्लंडने योग्य वेळी निर्णय घेत आता दोन डोसमधील अंतर १२ऐवजी आठ आठवडे करून ज्येष्ठ नागरिकांना लवकर सुरक्षित करण्याचे ठरवले आहे. यामुळे मृत्यू टाळणे शक्य होईल.
हा मुद्दा अतिशय महत्वाचा असून भारताने देखील यावर सारासार विचार करणे आवश्यक आहे. अतिशय कमी सुरक्षा असलेल्या आणि पहिला डोस घेतलेल्या जनतेमुळे नवी उत्परिवर्तने देखील घडू शकतात. त्यामुळे डेल्टा व्हेरियंटपासून सुरक्षित राहण्यासाठी लसीचा दुसरा डोस लवकर मिळणे आवश्यक आहे.
जसे इंग्लंड अतिजोखमीच्या व्यक्तींना आठ आठवड्याने डोस देत आहे, त्याच धर्तीवर भारतामध्येही सर्व आरोग्य कर्मचारी व सह्व्याधी असलेल्या गटासाठी १२ ऐवजी आठ आठवड्यांनी दुसरा डोस उपलब्ध करून द्यायला हवा. याबद्दल सरकारने विचार करायला हवा. यामुळे आरोग्य कर्मचारी तरी लवकर सुरक्षित होतील तसेच मृत्यूदर कमी होण्यास देखील मदत होईल. आंतरराष्ट्रीय प्रवासी चार आठवड्यांनी कोविशिल्ड घेऊ शकतात, त्याच धर्तीवर हा बदल देखील सरकारने करावा यासाठी आपण मागणी करायला हवी.
यावरून तुमच्या लक्षात आले असेलच की साथीच्या काळामध्ये शास्त्रीय माहितीवर आधारित निर्णय असला तरीदेखील काळाशी सुसंगत व नूतन माहितीचा वापर करून निर्णय घेणे तसेच तो निर्णय योग्य वेळी घेणे हे अतिशय महत्वाचे असते. कोविशिल्डच्या डोसमधील अंतराबाबत सर्वोत्तम निर्णय लवकरच घेतला जाईल ही आशा!
तोपर्यंत पहिल्या डोसनंतर देखील सर्व प्रकारची काळजी घ्या, सर्व नियम पाळा, मास्कचा सुयोग्य वापर करा, अतिजोखमीचे वर्तन टाळा. आणि मुख्य म्हणजे १२ आठवडे होताच लगेच दुसरा डोस घ्या! अधिक वाट बघू नका! सध्या आपल्या हातात इतकेच आहे!
संशोधनाच्या लिंक्स –
https://apps.who.int/iris/bitstream/handle/10665/339477/WHO-2019-nCoV-vaccines-SAGE-recommendation-AZD1222-2021.1-eng.pdf?sequence=5&isAllowed=y (10 Feb 21)
https://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(21)00528-6/fulltext (6 March 21)
https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0140673621004323 (12 March 21)
– डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)
(लेखिका साथरोगतज्ज्ञ आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे जनऔषध वैद्यकशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापक आहेत आणि सांगली जिल्हा टास्क फोर्सच्या सदस्य आहेत.)