अजूनही मुसळधारच पडतो पाऊस गावाकडे… आणि इतकी वर्षं झाली तरी त्याचा आवाज अजूनही मला ऐकू येत असतो! माझं गाव फोंडाघाट सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलंय. म्हणजे आमच्या घराच्या अंगणात उभं राहिलं तर थेट सह्याद्रीचे कडे समोर दिसतात. त्या डोंगरकड्यांवर दाणदाण पाऊस कोसळत असताना आम्हाला दिसायचा. छत्री कितीही धडकी असली तरी, पोटाशी घेतल्यामुळे आमची दप्तरं तेवढी सुकी असायची, पण प्रत्येकाचे शर्ट आणि चड्ड्या भिजलेल्या असायच्या. त्या तशाच अंगावर सुकवत आम्ही चार-चार तास वर्गात बसून असायचो.
पूर्वी घराभोवतालच्या दहा-बारा गुंठ्यात आम्ही शेती करायचो आणि आमचे वडील दुस-याच्या जमिनीही शेती करण्यासाठी कधी-कधी खंडानं घ्यायचे. डोकीवर घोंगडी घेऊन पावसात भिजत नांगरट करणारे वडील, आमचे शेजारी आप्पा मर्ये आणि चिखलात लावणी करणारी, डोकीवर `इरली’ घेतलेली ती `पैरी’ (रोज मजुरीनं शेतात काम करणा-या बायका) अजूनही पावसाळा सुरू झाला की माझ्या डोळ्यासमोर उभी राहतात.
`गे वैनी, ह्या थंडयेत लयच कुडकुडताव गे आमी- वाय्च परत कडतवनी धाड’ – असं एखादा गडी नांगरता-नांगरता तिथूनच हळी देऊन म्हणाला की आई पुन्हा चुलीवर मोठ्या पातेल्यात चहा करून द्यायची. मग ते `कडतवनी’ म्हणजे गरम गरम चहा मी सगळ्या गडी-पैर्यांदना नेऊन देणार, मेरेवर बसून ते गरम घोट पीत नंतर तंबाखू मळत ते आपापसात, पुढच्या वर्षी किती पाऊस लागेल याचे अंदाज बांधत गजाली करणार आणि `रे मेल्यानु व्हयतशे बसान र्हलवलास तर संध्याकाळपर्यात दोन तरी कोपरे लावन होतीत काय रे?’ असा वडिलांनी आवाज दिल्यावर घाईघाईनं माणसं उठून परत कामाला लागणार- हे ठरून गेलेलं होतं. चौथीत असताना मी नांगर धरायला शिकलो. मग `गुठा’ चालवायला. बहिणी, आई- यांना लावणी, भात कापणी, झोडणी ही सगळी कामंही करावी लागायची.
आमच्या फोंड्यातल्या घराच्या मागून एक वहाळ वाहतो. दरवर्षी त्या वहाळाला पूर यायचा आणि कुंपणाचा गडगा फोडून कधी-कधी ते पाणी अगदी आमच्या घरात शिरायचं. एका वर्षी तर घरात पाणी शिरून आमच्या गळ्यापर्यंत आलं तेव्हा आम्हाला घरातून बाहेर पाडून संपूर्ण दिवस रस्त्यावर आणि रात्र शेजा-यांकडे घालवावी लागली होती.
मागच्या पडवीत घोंगड्या आणि इरली सुकवण्यासाठी `उतव’ होता. उतवाखाली रात्रभर लाकडं ढणढणत ठेवावी लागायची. एवढ्या संध्याकाळी या पडवीत ना-याण पास्टेची म्हातारी आये येऊन काकुळतीनं आमच्या आईला म्हणायची- “वैनी, चिखलात काम करून करून ही माज्या पायांची `केला’ बग गे कशी कुसली- वाय्च `मुठयाल’ असला तर दी- लावतंय.’ कोकमतेल म्हणजे मुठ्याल. पायातल्या भेगांची जळजळ थांबण्यासाठी आणि त्या भेगा बुजवण्यावरचं एक नंबरचं कोकणी औषध. ते मिळालं की ना-या पास्टेची म्हातारी पडवीत बसून खूप वेळ पायातल्या भेगांवर मुठयाल लावत रहायची. पावसाला शिव्या देत रहायची- आणि आपल्या नशिबाला.
पावसाळ्यात नदीचे `चढणीचे मासे’ पकडण्यासाठी आम्ही काही शाळामित्र सुट्टीच्या दिवशी तास न् तास नदीत `ग-याय’ टाकून बसायचे. मासे मिळायचे आणि घरी आल्यावर मारसुद्धा. कारण बेसुमार पावसात बेसुमार भिजल्यामुळे सटासट शिंका देत, अंग तापानं फणफणून पुढचे दोन दिवस आमची शाळा बुडायची- याचा घरच्यांना राग यायचा. तेव्हा सटासट आणि फटाफट एकदमच चालायचं.
पावसाळ्यात पडवीच्या कोप-यात न्हाणी पेटलेली असायची. चुलीत ढणढणती लाकडं नि चुलीवर मोठ्ठं मडकं. पावसाची थंडी एकीकडून झोंबत असताना, मडक्यातलं ते गरम पाणी अंगावर ओतत अंघोळी करताना माझी तर समाधीच लागायची. मग अंघोळ झाल्यावर लगेच गरम गरम भात ताटात पसरून वर सुक्या बांगड्याचं तिखलं ओतायचं आणि तडस लागेपर्यंत जेवत राहायचं… आणि मग गोधडी घेऊन पावसाचा आवाज ऐकत आपणच आपल्यामध्ये गुडूप व्हायचं!
– महेश केळुसकर
ज्येष्ठ लेखक