• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

…वादळांची सवय करून घ्या!

- डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी

टीम मार्मिक by टीम मार्मिक
June 9, 2021
in भाष्य
0
…वादळांची सवय करून घ्या!

वर्ष २०१८… कडक उन्हाळा सुरू असताना अरबी समुद्रात आलेल्या सागर आणि मेकुनू या चक्रीवादळांनी कोकण किनारपट्टीला चांगला तडाखा दिला होता… वेगवान वार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात झाडं पडली होती, विजेचे खांब वाकले होते. वादळी पावसामुळे इथल्या गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले होते.

वर्ष २०२०… गेलेच वर्ष… महिना होता जूनचा… उन्हाळा संपायला आला असताना अरबी समुद्रात आलेल्या ‘निसर्ग’ या चक्रीवादळाने फक्त कोकण किनारपट्टीलाच नाही, तर काही प्रमाणात शहरी भागाला फटका दिला, त्यामध्ये वाहणार्‍या वार्‍याचा वेग ताशी १८० ते २२० इतका होता, त्यामुळे झाडपडीबरोबरच मोठ्या प्रमाणात इतरही नुकसान झाले होते…

या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस आलेल्या ‘तोक्ते’ या चक्रीवादळाने देखील कोकणवासियांना जोरदार तडाखा दिला… या तडाख्याने गेल्या वर्षीच्या निसर्ग वादळाच्या कटु आठवणी जाग्या केल्या… गेल्या वर्षी मुंबईचा परिसर निसर्गच्या आवर्तांमधून बराच बचावला होता. यावेळी मात्र तोक्तेने मुंबईलाही सोडलं नाही… किनार्‍यावरच्या उपनगरांना सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाच्या मार्‍याने झोडपून काढलं…

हा सगळा प्रकार पाहून गेल्या काही वर्षांत किनारपट्टीच्या प्रदेशांत राहणारे लोक धास्तावले आहेत… वादळं, चक्रीवादळं त्यांना नवी नाहीत… पण, हल्ली वादळांचं प्रमाण जरा जास्तच वाढलं आहे का, अशी शंका लोकांना येते आहे… यात शास्त्रीय तथ्य किती?
चला, याचा शास्त्रीय वेध घेऊ या.

हल्ली जेवढ्या संख्येने चक्रीवादळे निर्माण होत आहेत, तशी स्थिती १९८०च्या दशकात नव्हती. पूर्वी चक्रीवादळे निर्माण होण्याचा कालावधी हा दोन ते तीन वर्षांचा होता. आता ही परिस्थिती बदलू लागली आहे. चार वर्षांपासून- अगदी नेमाने म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही इतक्या नियमितपणे- दरवर्षी न चुकता चक्रीवादळे धडकू लागली आहेत. इतकेच नाही तर ती अधिक शक्तिमान आणि गतिमान होताना दिसत आहेत. पूर्वी आपल्याला हवामान बदल हा विषय म्हणजे बागुलबुवा वाटायचा. आता दरवर्षी होणारी चक्रीवादळे हवामानबदलाची प्रत्यक्षात साक्ष पटवून देत आहेत आणि आपल्याला आवडो वा न आवडो, सर्वांनाच दरवर्षी अधिकाधिक शक्तिमान होत चाललेल्या वादळांची सवय करून घ्यावी लागणार आहे. वादळं येणार आणि कितीही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तरी काही ना काही नुकसान करून जाणारच. वादळांमध्ये शून्य प्राणहानी कशी होईल आणि कमीत कमी वित्तहानी कशी होईल, यासाठी दीर्घकालीन भक्कम उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

वादळाची निर्मिती कशी होते?

चक्रीवादळाचे चार प्रकार आहेत, चक्रीवादळ, तीव्र वादळ, अतितीव्र वादळ आणि सुपर सायक्लोन. वादळ कोणत्या प्रकारचे आहे हे वार्‍याच्या गतीवर ठरवले जाते. चक्रीवादळाचा केंद्रातला वेग प्रति तासाला १० ते १५ किलोमीटर इतका असतो आणि त्याच्याभोवती फिरणार्‍या वार्‍याचा वेग १०० किमी प्रतितास इतका असतो. तीव्र वादळाभोवती फिरणार्‍या वार्‍याचा वेग १२० किमी प्रति तास तर अतितीव्र वादळाभोवती फिरणार्‍या वार्‍याचा वेग ताशी १५० ते १८० किमी इतका असतो. सुपर सायक्लोनभोवती फिरणार्‍या वार्‍याचा वेग ताशी २०० ते २२० किमीच्या आसपास असतो. अलीकडच्या काळात आपल्याकडे आलेल्या चक्रीवादळांचा वेग ताशी २०० किमीच्या पुढे राहिला आहे. त्यावरून असा अंदाज बांधता येतो की आगामी काळात येणार्‍या वादळांचा वेग वाढू शकतो. वार्‍याचा वेग वाढत असल्यामुळे ही वादळे आता शक्तिमान होऊ लागली आहेत. त्यामुळेच कच्ची घरे पडणे, विजेचे खांब कोसळणे, झाडे पडणे यांसारख्या दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

चक्रीवादळ दिवसाला समुद्रावरून सुमारे ३०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करत असते. आपल्यावर येऊन धडकणार्‍या चक्रीवादळाची निर्मिती मुंबईच्या दक्षिणेस सुमारे १००० किलोमीटर अंतरावरच्या केरळ किनारपट्टीजवळच्या लक्षद्वीप बेटांजवळ होते. सुरवातीच्या काळात हे वादळ दिवसाला १०० किलोमीटर प्रवास करते. नंतर त्याचा वेग वाढत जातो आणि हे अंतर ताशी ३०० किलोमीटर वेगाने कापलं जाऊ लागतं. या वादळाला मुंबई गाठायला साधारणपणे एक आठवड्याचा कालावधी लागतो. बर्‍याचदा पश्चिमेला ओमानच्या किनार्‍याकडे ही वादळे वळतात. त्यामागचे कारण म्हणजे पूर्व आणि पश्चिम दिशने येणारी उष्ण कटिबंधातील वारे. काही वेळेला ही वादळे उत्तर दिशने प्रवास करतात आणि गुजरातच्या किनारपट्टीला धडकतात. कोकण किनारपट्टीच्या पश्चिमेला ही वादळे समांतर प्रवास करत असतात. चक्रीवादळे जमिनीवर येतात, तेव्हा एक ते दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होते.

वादळं का वाढतायत?

सातत्याने हवामानात होत असणारे बदल, समुद्राचे वाढत असणारे तापमान, हवेत वाढत असणारे धुलिकणांचे प्रमाण, पेट्रोल आणि कोळसा जाळल्यामुळे हवेत वाढणारे कार्बनचे कण अशा अनेक घटकांचा परिणाम तापमानवाढीवर होत आहे. हवामानात होत असणार्‍या या बदलामुळे समुद्रातल्या चक्रीवादळांची संख्या वाढताना दिसत आहे. मॉन्सून येण्यापूर्वी म्हणजे एप्रिल-मे दरम्यानच्या काळात ही वादळे होत असतात. पूर्वी म्हणजे १९८०-९०च्या सुमारास दोन ते तीन वर्षांतून असे एखादे वादळ व्हायचे. आता एकाच मोसमात दोन वादळे होऊ लागली आहेत. ही धोक्याची घंटाच ठरणार आहे.

पूर्वी अरबी समुद्राचे तापमान २७ अंश सेल्सियसच्या खाली होते, त्यामुळे चक्रीवादळांची संख्या कमी होती. चक्रीवादळ तयार होण्यासाठी किमान तापमान २७.५ अंश सेल्सियस लागते. अलीकडच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत असणार्‍या बदलामुळे समुद्राच्या किमान तापमानामध्ये तीन ते चार अंश सेल्सियसची वाढ झाली असून हे तापमान आता ३१ अंशापर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यामुळेच चक्रीवादळांचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

वादळाला ऊर्जा मिळते ती समुद्राच्या पाण्यातून. समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती उष्णता वादळांना मिळते. समुद्रात तापमानाची क्षमता वाढली की वादळांना आवश्यक असणार्‍या ऊर्जेत वाढ होते आणि त्यामुळेच वादळाची तीव्रताही वाढताना दिसते आहे.

वादळ आणते आजारपणाची साथ

वादळ आल्यानंतर समुद्राचे पाणी किनारपट्टीच्या काही अंतरापर्यंत आत येते. त्यामुळे किनार्‍यालगत असणारे पाण्याचे स्रोत दूषित होतात. किनार्‍यापासून काही अंतरावरच्या शेतीवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. वादळाचा फटका बसलेल्या गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत म्हणजे तलाव, विहिरी दूषित होतात. त्यामुळे या गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. साथीचे आजार निर्माण होतात.

भारताच्या पूर्वेकडील किनार्‍यावर चक्रीवादळाची वारंवारता जास्त आहे. वादळात तिथल्या नागरिकांना धोका पोहचू नये म्हणून राज्य सरकारांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी जवळच्या डोंगरांवर निवारे बांधले आहेत. चक्रीवादळाचा धोका संपेपर्यंत या भागातील नागरिक तिथे सुरक्षित राहतात. पश्चिम किनारपट्टीवर वाढत्या तीव्र वादळांचा विचार केला तर राज्य सरकारने कोकणातील नागरिकांसाठी अशा प्रकारची योजना राबवायला हवी.

जून ते सप्टेंबरपर्यंतचा ब्रेक

मॉन्सूनच्या कालावधीत अरबी समुद्राचे तापमान कमी असते. पाण्याचे चलनवलन वाढलेले असते. हवामान ढगाळ असते, सूर्याची उष्णता कमी असते. पावसामुळे वातावरण थंड असते. मॉन्सूनकाळात समुद्राचे आणि हवेचे तापमान कमी असते. त्यामुळे या कालावधीत वादळांना ब्रेक असतो. पॅसिफिक समुद्रावर मात्र, जून ते ऑगस्ट या कालावधीत वादळांची संख्या वाढलेली असते. बंगालच्या उपसागरात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत वादळे होत असतात.

समुद्राच्या पाण्याची उंची वाढण्याचा धोका

हवामान बदलांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. हिमालयात बर्फ वितळू लागल्यामुळे नजीकच्या काळात समुद्राच्या पाण्याची उंची वाढू शकते. त्याचा परिमाण मोठ्या वादळांची संख्या आणि वारंवारता वाढण्यावर होऊ शकतो. क्लायमेट चेंजचे हे संकट आता दारापर्यंत येऊन उभे ठाकले आहे. वादळाची पूर्वसूचना आपल्याला आठ दिवस अगोदर मिळते, तेवढ्यात नुकसान टाळण्याचे सगळे प्रयत्न करावे लागतील.

हवामानबदलांकडे दुर्लक्ष नको…

हवामानात होत असणार्‍या बदलाकडे आपण दुर्लक्ष केले तर ते महागात पडू शकते. तापमानात होत असणारी वाढ रोखण्यासाठी हवेत वाढत असणारे धुलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. विकासकामे सुरू असताना बर्‍याचदा झाडे तोडली जातात, त्याचाही परिमाण हवामानातील बदलावर होताना दिसत आहे. आपल्याला चार वर्षांपासून लागत चाललेली दरवर्षी वादळ पाहण्याची सवय मोडायची असेल तर निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याकडे आपण लक्ष द्यायला हवे. तात्पुरत्या कितीही उपाययोजना केल्या तरी वादळांचे प्रमाण आणि वाढत जाणे आपल्याला दीर्घकाळ परवडणारे नाही.

– डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी

(लेखक भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था येथील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ आहेत.)

शब्दांकन – सुधीर साबळे

३० वर्षांत ४१ वादळे

१९७९ ते २००८ या ३० वर्षाच्या काळात अरबी समुद्रात ४१ चक्रीवादळे तयार झाली होती. त्यापैकी आठ तीव्र तर सात अतितीव्र स्वरूपाची वादळे होती. या ३० वर्षाच्या कालावधीत १९८१, १९९०, ९१, २०००, २००५ आणि २००८ या वर्षी समुद्रात चक्रीवादळे आली नाहीत. १९९०पासून वादळांना नावे देण्याची प्रथा सुरू झाली. अरबी समुद्रात २०१५मध्ये ‘अशोभा’ नावाचे वादळ आले होते. त्यानंतर २०१८मध्ये ‘सागर’ आणि ‘मेकुनी’ ही दोन वादळे थडकली होती. २०१९मध्ये ‘वायू’, २०२०मध्ये ‘निसर्ग’ आणि २०२१मध्ये ‘तौकते’ वादळ आले.

Previous Post

चाळ : धडे शिकवणारे एक पुस्तक!

Next Post

टपल्या आणि टिचक्या १२ जून

Next Post

टपल्या आणि टिचक्या १२ जून

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.