सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही : सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
आणि यांचीच पिलावळ कालपर्यंत ‘इंदिरा इज इंडिया’ म्हणणार्या बारुआंवर फिदी फिदी हसत होती.
चीनमध्ये आता तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी
आता आपल्याकडे धर्मरक्षणासाठी, देशरक्षणासाठी १० मुले जन्माला घाला, असा फतवा सगळ्यात आधी कोण काढतो ते बघायचं!
छोटे बच्चों को इतना काम क्यों रखते हो मोदी साब? ऑनलाइन अभ्यासाच्या ओझ्यावरून सहा वर्षांच्या चिमुरडीचा पंतप्रधानांना सवाल
तिच्या घरावर सीबीआय, ईडी वगैरे कोणाची रेड पडलेली नाही ना? यांचं सांगता येत नाही.
केंद्राने देशभरात एकाच किंमतीला लसी उपलब्ध करून द्याव्यात : सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला
काहीतरीच काय? उद्या म्हणाल, ‘सगळ्यांना मोफत लस द्या, सगळ्यांचा जीव समान आहे. ही काय दळभद्री खांग्रेसी राजवट आहे का?’
मूळचा भारतीय जनता पक्ष आहेच कुठे? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल
आहे आहे, आयाराम-गयारामांसाठी जो सतरंज्या उचलताना दिसतोय ना, तो तोच आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण : नारायण राणे यांची मुक्ताफळे
त्यांना समजून घ्या… ज्या कामासाठी नेमलंय ते नित्यनेमाने करावं लागतं. इथून हकालपट्टी झाली तर जातील कुठे?
महिलांना मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतं याची सरकारला लाज वाटायला हवी : प्रवीण दरेकर यांची टीका
अरेच्चा, यांच्यात आपल्याच केंद्र सरकारवर, साक्षात मोदींवर टीका करण्याचं धैर्य आलं कुठून? परिस्थिती त्यांनीच आणलीये ना!
खासगी बँकांमधले घोटाळे ३५ टक्क्यांनी वाढले…
…यालाच म्हणतात ‘न खाऊंगा न खाने दूँगा!’
रिझर्व्ह बँकेतून एक लाख कोटी रुपये गेले कुठे? विरोधकांचा केंद्राला सवाल
कुठेही गेले असतील तरी ते देशहिताच्याच कामासाठी खर्च होणार याची भक्तमंडळींना खात्री असणार!
वादळग्रस्त गुजरातला एक हजार कोटी; महाराष्ट्राला काहीतरी द्या : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विनंती
ते फारतर एकदोन शीघ्रकविता देऊ शकतील, त्यापेक्षा वादळ परवडलं!
गोव्यात घटस्फोटांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन लग्नाआधी समुपदेशनावर वाढता भर
या उपदेशांतून समुपदेशकांची लग्नं टिकली तरी पुष्कळ!
पत्नीला घरगुती हिंसाचारविरोधी कायद्याचं संरक्षण आहे, पतीने कुठे जायचं? मद्रास उच्च न्यायालयाला चिंता
आपल्या समाजव्यवस्थेत महिलांसाठी विशेष तरतूद करावी लागते, पुरुषांसाठी एरवीचे कायदे सक्षम आहेत, याची न्यायालयालाच कल्पना नसावी?
मुंबईत पेट्रोलचे दर न्यूयॉर्कच्या दुप्पट!
शुत् शुत्, हळू बोला… भक्तमंडळींच्या कानावर गेलं तर ते या नामुष्कीवरूनही मास्टरस्ट्रोकच्या पोस्टी प्रसवतील!
काळ्या बुरशीवर औषध निर्माण केल्याचा रामदेवबाबांचा दावा
कोरोनाच्या लाटेत कोरोनील आणून हात धुवून घेतला, आताही तोच इरादा दिसतोय…