धनुषची प्रमुख भूमिका असलेला ‘कर्णन’ हा बहुचर्चित तामीळ सिनेमा परवा बघितला आणि लागलीच लिहू लागलो… लॅपटॉप क्रॅश झाला आणि त्वेषाने, भारावून लिहिलेला पहिला ड्राफ्ट उडाला… दुसरा हात मारताना अधिक थंड डोक्याने आणि सम्यक बुद्धीने सिनेमाचं मनोमन अवलोकन करीन अशी आशा आहे. कारण खरं तर हा सिनेमा बघून झाल्यावर बराच काळ तुमच्या डोक्यात घर करतो. या सिनेमात अनेक थर आहेत. हे थर आणि त्यांचा उलगडा हळुहळू होत राहतो आणि ‘कर्णन’ एक जोरदार सिनेमा म्हणून समोर येतो. व्यवसायिक स्तरावर त्याने पहिल्या आठवड्यातच ३० कोटीचा गल्ला गोळा केला आहे.
कोडियनकुलममध्ये १९९६ साली बहुजन समाजाच्या वस्तीच्या गावात ६०० पोलिसांनी तिथल्या उच्चवर्णीयांच्या तक्रारीवरून हल्ला केला होता. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याबरोबरच जी आपल्या नेणीवांमधून शेकडो वर्षांच्या जात आणि वर्गसंघर्षाची सुद्धा भोई बनते, अशा पोलिसी अत्याचाराचा सामना तिथल्या लोकांना करावा लागला होता. असो. हा कहाणीचा गाभा असला तरी ही घटना म्हणजेच फक्त हा सिनेमा नव्हे. या सिनेमाबद्दल दुसरी गोष्ट उथळ समीक्षकांकडून समोर आणली जाऊ शकते आणि ती म्हणजे या सिनेमातील हिंसा आणि खास करून पोलिसांविरुद्ध केलेली हिंसा.
मला असं वाटतं की हा सिनेमा अनेक रूपकांनी, सांस्कृतिक संदर्भांनी समृद्ध आहे आणि अभिजनप्रधान जातिव्यवस्थेला एक पर्याय उभा करण्याचा गृहितकावर उभा आहे. त्यामुळे या सिनेमातली हिंसाही रूपकात्मक अर्थानेच पाहावी.
या सिनेमामध्ये नक्की आहे काय? आणि या सिनेमानंतर धनुष याला सिनेसृष्टीतला नवा बहुजननायक असं का म्हटलं जाईल?
इथे एक आटपाट गाव आहे. पण हे गाव नकाशावर असूनसुद्धा नसल्यासारखं आहे. या गावाला आपला एक सूर आहे, रिदम आहे आणि एक मागास बहुजन जातीच्या वाटेला आलेला अखंड पिचलेपणासुद्धा आहे. अभिजन लोकांचं गाव बाजूलाच आहे. अभिजन म्हणजे जातीच्या उतरंडीत एक पाऊल पुढे असतील फार फार तर. बहुजन गावाला अनेक वर्षं संघर्ष करूनही बसस्टॉप मिळत नाही. यांच्याकडच्या मुलींना शिकायचं असेल तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. भांडणंतंडणं रोजचीच. अशाच एका भांडणाच्या वेळी गाव प्रतिकार करतं आणि एक बस तोडतं. बस तोडल्यामुळे अचानक एसपीपासून कलेक्टरपर्यंत सगळ्या प्रशासनाचं गावाकडे लक्ष जातं. गावातल्या आबालवृद्धांवर अत्याचार होतात. गाव आणि धनुष मिळून या सगळ्याचा बदला घेतात.
हा चित्रपट अॅजिटप्रॉप थिएटरचं उदाहरण आहे. (अॅजिटप्रॉप या शब्दात दोन शब्दांचा समन्वय आहे. अॅजिटेशन आणि प्रॉपगँडा. सोविएत रशियामध्ये जन्मलेल्या या शब्दाचा सोविएत अर्थ निव्वळ प्रचारकी नाट्यतंत्र असाच आहे. त्याचा इतरत्र मात्र अत्यंत राजकीय प्रचारकी मांडणी करणारा असा आहे.) तोच त्याचा बाज असला आणि तो आंदोलनी त्वेषाने पुढे जात असला तरी त्याला एक कवितेची किनार आहे. ही कविता मला अरूण काळे यांच्या ‘नंतर आलेले लोक’ या कवितेच्या कुळातील वाटली. धनुषच्या म्हातारीच्या कोंबडीची पिल्लं रोज एक घार चोरून नेते. म्हातारी दुर्दम्य आशावाद असल्यामुळे ती रोज घारीमागे पळते आणि तिला फर्मास शिव्या हाणते. इथे गावाची पारंपारिक तलवारही आहे. जो पाण्यात सूर मारताना हवेत उडवलेल्या माशाचे एका घावात दोन तुकडे करेल त्यालाच ती तलवार मिळते. महाभारतात कर्णाने सुद्धा द्रौपदीचा हात जिंकायचा प्रयत्न केला होता, पण तो सुतपुत्र असल्यामुळे त्याला नकार दिला गेला. पुढे कायम हेच मांडलं गेलं की कर्ण कसा सुतपुत्र नव्हता तर आर्यपुत्र आणि सूर्यपुत्र होता… जणू तो सुतपुत्रच असता तर त्याच्या पराक्रमात, दानशूरतेत काही उणीव आली असती.
या सिनेमातला कर्णन वेगळा आहे. तो आपल्या जाणिवांबाबत सजग आहे. त्याच्यात रागाचा लाव्हा उकळतो आहे. त्याला उधारीची जातओळख बिल्कुल नको आहे. त्याची गावातील प्रेयसी द्रौपदी आहे आणि तिला कर्णन याच खुलेपणामुळे आणि विद्रोही वृत्तीमुळे आपला वाटतो. सिनेमात एक पाय बांधलेलं खेचरही आहे. याचे पाय एका निर्णायक क्षणी धनुष सोडवतो आणि ते धावायला शिकतं. इथली पोरंसुद्धा शिकू पाहतात. कर्णनला पण सीआरपीएफचा कॉल येतो. या व्यवस्थेत वर नमूद केल्याप्रमाणे अनेक चुका आणि पारंपारिक फॉल्टलाइन्स आहेत. पण कर्णनला याच व्यवस्थेचा भाग बनून तिला बदलायचा मौका येतो. पण तो मौका तो नाकारतो. या सिनेमाचा एक स्वयंभू खडूसपणा आणि स्वत:चं संगीत आहे.
नागराज मंजुळेंपासून ते पा रंजिथचा ‘काला’ असो किंवा आताचा ‘मंडेला’ असो- बहुजन सिनेमा आणि मीडिया ही एक अर्थव्यवस्था उभी राहात आहे. मी १२-१४ वर्षांपूर्वी एनडीटीव्हीत असताना बहुजनांचं न्यूजरूममधलं नगण्य स्थान यावर बातमी केली होती. आता मी खमकेपणाने सांगू शकतो की बहुजन सोशल मीडिया, फिल्म यांची एक पर्यायी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. काही महिन्यांपूर्वी व्यक्तिगत पातळीवर अत्यंत पुरोगामी असणार्या पण न्यूजरूम्समध्ये प्रवाहपतित होणार्या काही सन्माननीय संपादकांना मी हे समजावून सांगितलं होतं की तुमची सामाजिक जबाबदारी म्हणून नाही तर किमान बाजाराची मागणी म्हणून तरी बहुजन प्रोग्रामिंगला तुम्हाला वाव द्यावाच लागेल. त्यांनी एका चळवळ्या मनाची अभिव्यक्ती म्हणून माझ्या सूचनेकडे कानाडोळा केला आणि अनेक शेळ्यांमधील एक बनणं पसंत केलं. असो. तर उद्याचा बहुजन मीडिया काही कुणाविषयी आकस-बिकस बाळगणार नाही आहे. कलेची सुरुवातीची अभिव्यक्ती ही अशीच हिंसक, बदला घेणारी असेल. नंतर ती पर्यायी बहुजनकथा, पर्यायी बहुजन भावविश्व, पर्यायी संगीत, कविता यांच्या विश्वात विहार करायला लागेल. तुम्ही सोबत आलात तर तुम्हाला सोबत घेऊन किंवा तुमच्याशिवाय या कथा सांगितल्या जातील आणि त्याला डेटा आणि बाजार भक्कम साथ देईल.
एकेकाळच्या महार जातीतील लढवय्यांचं लढणं साहेबाने हेरलं आणि पेशवाईचा पाडाव केला. पण त्यांच्या उपजत गाण्याला, लोककलेला- मग ती विठाबाई मांग नारायणगावकर यांची असो किंवा काळु-बाळु यांची असो- तिला तळटीपेचं स्थान दिलं गेलं. या सिनेमात कर्णन म्हणतो की प्रत्येक गोष्टीसाठी पाया पडू नका. हा संदेश बर्याच जणांनी घेतला आहे.
हे काही बहुजनवादाचा स्वप्नात रंगणं नाही. जात हे मोठं वास्तव आजही आहे. ही बरबट चालू ठेवणार्या अनेक घारी हवेत विहार करत आहेत. अशा वेळेला बहुजनत्वाचा लढा अधिक मुखरतेने सांस्कृतिक आयामांतून सुद्धा लढला जाणार आहे. हा कुठलाही वेगळा आयाम नाही. आपलं काय आहे, बहुजन विरासत काय आहे हेच कळलं नाही तर सवर्णांचं अनुकरण करून त्यांचंच राजकारण अनुसरणं हेच बहुजन समाजाकडे उरेल. म्हणूनच आपला ठेका आणि आपली मिजास असणारा कर्णन मला महत्वाचा वाटतो. हिंसेचा अतिवापर सिनेमात झाला आहे, यापेक्षा अनेक चांगले सिनेमेही आले असतील; पण मला हा सिनेमा त्याच्या खमकेपणासाठी आणि मिजासीसाठी महत्वाचा वाटतो.
आज देशासमोर जातवर्चस्वावर आधारित धार्मिक राष्ट्रवाद आणि कबीर-नानक या संतावर आधारलेला बहुजन राष्ट्रवाद हे समोरासमोर उभे ठाकले आहेत. एक आटपाट नगर आहे. तिथे अनेक गरीब बहुजन कुटुंबं आहेत. पण कलाकृती आणि वैकल्पिक मीडिया आणि कलावाद श्रीमंत होतो आहे.
– केतन वैद्य
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि केविकॉमचे संस्थापक आहेत.)