इंद्रप्रस्थ नगरीत राजा धर्मराज युधिष्ठिराच्या मित्र द्वारकाधीश श्रीकृष्णासोबत गप्पा रंगल्या होत्या. युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणाले, ‘मी रोज दारी आलेल्या याचकांना मदत करत असतो, भरपूर दानधर्म करत असतो. तरीही सर्वत्र दानशूर कर्णाची चर्चा होत असते. कर्ण आणि माझ्यात काय फरक आहे, हे मला सांगाल का?’ श्रीकृष्ण म्हणाले, ‘संकटकाळात खर्या दानशूरतेची कसोटी लागत असते. त्यावेळी आपण कशा पद्धतीने मदत करतो, त्यातून खरी दानवृत्ती दिसून येते.’
असे कृष्णाने का सांगितले, ते स्पष्ट करणारी ही कथा वाचा.
एके दिवशी निसर्गाचा प्रकोप झाला. अचानक वादळ येऊन धडकले. सलग चार दिवस-रात्र अतिवृष्टी चालू होती, नदी-नाले-धरणे-बंधारे तुडुंब भरून वाहू लागले. गंगा-यमुनेच्या नदीपात्रातील पुराचे पाणी ओसंडून वाहिले. किनार्यावरच्या वस्तीवस्तीत, गावातल्या घराघरात पुराचे पाणी घुसले. घराघरातील सरपण, लाकूडफाटा, अन्नधान्य, संसारोपयोगी वस्तू, भांडीकुंडी, कपडेलत्ते वाहून गेले. चिखलगाळ घराघरात भरून राहिला. गावाबाहेरच्या वनात ऋषीमुनींचे आश्रम आणि मठ यांनाही पुराची झळ बसली. त्यांच्या पर्णकुटी कोसळल्या, होमहवन यज्ञाची सामग्री नष्ट झाली. पूरग्रस्त गावकरी, साधू ऋषीमुनींचे जत्थे मदत मागण्यासाठी वेगवेगळ्या राजांकडे रवाना झाले.
पहिला जत्था इंद्रप्रस्थ नगरीत दाखल झाला. पांडवांची नवीन इंद्रप्रस्थनगरी सर्व सुविधांनी परिपूर्ण होती. जनता सुखसमाधानात होती, त्यांना नैसर्गिक आपत्तीच्या झळा पोहोचत नव्हत्या. ऋषीमुनी पांडवांच्या राजवाड्यात पोहोचले. अतिवृष्टीतल्या जनतेसाठी मदतीची याचना केली. पांडवांनी आपसात सल्लामसलत केली. राजा युधिष्ठिर म्हणाले, ‘ऋषीमुनीजनहो, दिवस मावळायला आलाय, आता मदतकार्य तातडीने सुरू करता येणार नाही. तुम्ही सारे आज रात्री इथेच मुक्काम करा. उद्या सकाळी माझे बंधू नकुल-सहदेव पूरग्रस्त परिसराची पाहणी करतील. त्यांच्याशी विचारविनिमय करून अन्नधान्य, वस्त्रे, कपडेलत्ते, निवारा, लाकूडफाटा सारे जिन्नस घेऊन दोन दिवसांत आम्ही स्वत: जातीने तुमच्या गावाकडे रवाना होऊ. पांडवांच्या राजसत्तेच्या अधिकारक्षेत्राच्या हद्दीतील जनतेला सर्वतोपरी मदत देण्यात येईल. मदतीवाचून कुणीही वंचित राहणार नाही.’
ग्रामस्थ ऋषिमुनीवर यांनी सुकी लाकडे आणि सरपणाच्या साधनसामुग्रीची तातडीने मागणी केली. पांडव म्हणाले, जनहो, इंद्रप्रस्थ नगरी अलीकडेच उभारली आहे. त्यासाठी आसपासचे झाडेझुडपे तोडून, खांडववन जाळून जागा तयार करण्यात आली. जंगलातील मोठमोठी झाडे कापून लाकडे तासून घरे राजवाडे उभारले आहेत. राज्यकारभार करण्यासाठी, राजदरबार उभारण्यासाठी मोठे बांधकाम सुरू केले आहे. त्यासाठी गंगा-यमुनाकाठचे मोठे वन कापून भुईसपाट केले आहे. तरीही बांधकामासाठी लाकूड कमी पडत आहे. आपण शेजारच्या राष्ट्राकडून लाकडे खरेदी करून मागवली आहेत. त्यासाठी राजखजिन्यातील भरपूर संपत्ती खर्च होत आहे. त्यामुळे सरपण लाकूड तातडीने देता येणार नाही. जनहो, अतिवृष्टी, वादळ, पाऊस महापुरात तुमच्या घराचे जे काही नुकसान झाले आहे, त्यासाठी सध्या तरी लाकडे उपलब्ध करून देता येणार नाही. तुम्ही स्वत:च प्रयत्न करून शेजारच्या राष्ट्राकडून लाकूड फाटा सरपण याचना करून मिळवा अथवा स्वखर्चाने गरज भागवा.
ऋषीमुनींचा दुसरा जत्था हस्तिनापुरात दाखल झाला. कौरवांच्या राजवाड्यात पोहोचला. दानशूर कर्ण त्यांना सामोरा गेला. आदरातिथ्य केलं. ऋषीमुनीनी पूरग्रस्तांकरिता अन्नधान्य, कपडेलत्ते, ग्रामस्थांना चुलीसाठी आणि यज्ञ-होमहवनासाठी सुकी लाकडे सरपण मदतीची याचना केली. बाकी सर्व गोष्टी तयार होत्या. फक्त सुकी लाकडे, सरपण याचीच टंचाई होती. कर्णाने ऋषीमुनींना विनंती करून थोडासा अवधी मागून घेतला. त्याने सेवकांना तातडीने कामाला लावले. शेकडो मजूर आले, त्यांनी राजा कर्णाचा नव्यानेच उभारलेला सात मजली चंदनी राजवाडा रिकामा करून पाडायला घेतला. राजवाडा पाडून त्याची सुकी लाकडे बैलगाड्या, रथात भरून पूरग्रस्तांना मदतीसाठी रात्रीतूनच रवाना केले. त्या लाकडापासून पूरग्रस्तांच्या घराघरात चुली पेटल्या, घरे उभारली गेली. पाठोपाठ अन्नधान्याची पोती, राजखजिन्यातील संपत्ती खुली करून पूरग्रस्त जनतेत वाटली. मदत मागायला आलेले लोक कोणत्या राज्यातले आहेत, याची साधी चौकशीही त्याने केली नाही. अडचणीत, नैसर्गिक आपत्तीत सर्वसामान्य जनतेला तातडीने मदत उपलब्ध करून दिली.
राजाला, राज्यकर्त्याला शोभणार्या या दानतीमुळेच कर्ण हजारो वर्षांपासून दानशूर म्हणून ओळखला जातो.
– जयंत जोपळे
(लेखक समाजमाध्यमांवर खुसखुशीत लेखनासाठी प्रसिद्ध आहेत)