गिरगाव चौपाटीवर चर्नी रोड स्टेशनच्या जवळ घोड्यावर चढून बसण्यासाठी एक चौकोनी दगड होता. त्यावर उभं राहून भाषणं करण्याची पद्धत होती. तिथेच प्रबोधनकारांच्या जाहीर भाषणांची सुरुवात झाली. या रायडिंग स्टोनवरूनच त्यांनी वक्तृत्वाच्या घोड्यावर पक्की मांड ठोकली.
——————–
‘नामांकित वक्त्यांचा परिणामकारक नि बहारदार वाग्विलास पाहून व ऐकून , ‘आपल्याला हे कसे जमणार बुवा? तेथे पाहिजे जातीचे’ असल्या निराश भावनेच्या पचनी हकनाहक पडणारांनी अभ्यासाने अशक्य ते शक्य होत असते, हा सिद्धांत डोळ्यांपुढे ठेवूनच अभ्यासाला लागावे.’ – प्रबोधनकार ठाकरे, ‘वक्तृत्व-कला आणि शास्त्र’
इतिहासाची काही पानं चर्नी रोडची मस्त गोष्ट सांगतात. त्याचं काय झालं, फार फार पूर्वी म्हणजे १८२२-२३ मधे कधीतरी ब्रिटिशांनी आझाद मैदानात गुरंचरण्यासाठी पैसे घ्यायला सुरवात केली. तेव्हा ते आझाद मैदान नव्हतंच. ते एस्प्लनेडचा एक भाग होता. एक्प्लनेड म्हणजे आताच्या कुपरेज ग्राऊंडपासून बोरीबंदरपर्यंत पसरलेल्या हिरवळीच्या लांबलचक पट्टा. त्यानंतर या भागाला कॅम्प मैदान म्हणायला लागले. नंतर बॉम्बे जिमखाना मैदान. आझाद मैदान हे नाव त्याला गांधीजींनी दिलं म्हणतात. १८५७मधे एका हिंदू आणि एका मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकाला इंग्रजांनी तोफेच्या तोंडी दिलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ आझाद मैदान हे नाव गांधीजींनी एका प्रचंड सभेत दिलं गेलं. हे सगळं होण्याआधी म्हणजे आजपासून दोनशे वर्षांपूर्वी तिथे गुरं चरण्यासाठी सरकार पैसे घेऊ लागलं. गुराख्यांना ते परवडणारं नव्हतं. गुरं बिचारी अपुर्या चार्यामुळे मरायला टेकली. मुंबईचे एक महत्त्वाचे शिल्पकार असणार्या जमशेदजी भाईंना हे बघवलं नाही. त्यांनी ठाकूरद्वारच्या समोर समुद्राला लागून मोठी जागा विकत घेतली आणि तिथे मोफत कुरण सुरू केलं. तिथे गुरं चरायची म्हणून तो भाग चरनी म्हणून ओळखला जाऊ लागला. बीबी अँड सीआय रेल्वेने तिथे स्टेशन बांधलं, त्याला नाव दिलं, चर्नी रोड.
प्रबोधनकार गिरगावात राहत असल्यामुळे ते चर्नी रोडशी जोडले गेलेच. विशेषतः स्टेशनच्या पश्चिमेला असलेल्या चर्नी रोड बागेशी. आता तिथे लोकमान्य टिळकांचं स्मारक आहे. आजी आजोबा पार्क आहे. तिथेच कुठे तरी रायडिंग स्टोन होता. साधारण अडीच तीन फूट उंचीचा तासलेला चौकोनी दगड. त्यावर चढायला एक पायरीही होती. तिथून रायडिंग पाथ म्हणजे घोड्यावर रपेट मारण्यासाठी गोरे साहेब आणि मॅडमांसाठी चौपाटीपासून थेट कुलाब्या पर्यंत बनवलेला मातीचा रस्ता सुरू व्हायचा. आजकाल मुख्य रस्त्याला लागून सायकलसाठी वेगळी लेन बनवलेली असते, तसाच हा पाथ घोडेस्वारीसाठी होता. त्यावर दाट हिरवळ असायची. रोज सकाळ संध्याकाळी गोरे त्यावर घोडदौड करायचे. त्यांना घोड्यावर चढून बसण्यासाठी हा दगड उपयोगी पडायचा. म्हणून त्याला रायडिंग स्टोन म्हणत.
पुढे या दगडाचा उपयोग घोडेस्वारीसाठी नाही, तर भाषणांसाठी होऊ लागला. प्रबोधनकारांच्या काळात रोज संध्याकाळी गिरगावकरचौपाटीवर फिरायला येत. त्यांना आपल्या विचारांकडे वळवण्यासाठी वेगवेगळ्या धर्मपंथांचे प्रचारकही त्यांच्यासोबत गोळा होत. त्यात ख्रिस्ती मिशनरी असत. आर्य समाज स्थापना झाली ते ठिकाणही गिरगावातच असल्यामुळे त्याचे भगवे प्रचारकही येत. शिवाय मुस्लिम मौलवीही असत. एकमेकांपासून अंतर ठेवून या सगळ्यांच्या भाषणांचे तळ चौपाटीवर पडायचे. त्यापैकी प्रत्येकजण रायडिंग स्टोन पटकावण्यासाठी प्रयत्न करायचा. कारण त्यावर वक्ता उभा राहिला की चर्नीरोड बागेतून येणारी मंडळी आपोआप त्याचं ऐकायला थांबायची. हा दगड एकदा हातातून गेला की मग चौपाटीवर कुठेही राहून भाषणं द्यावी लागायची.
अनेक मोठमोठ्या वक्त्यांनी हा रायडिंग स्टोन गाजवला होता. त्यात विष्णुबुवा ब्रह्मचारी प्रमुख होते. ते १५ जानेवारी १८५७पासून दर गुरूवारी याच रायडिंग स्टोनवरून व्याख्यानं देत. ख्रिस्ती मिशनरी हिंदू धर्मावर आरोप करत, ते खोडून काढत. वादविवाद करत. त्याच्याही आधी चौपाटीवरचं विल्सन कॉलेज सुरू करणार्या रे. जॉन विल्सन या प्रोटेस्टंट धर्मगुरूंनी ही रायडिंग स्टोन गाजवला होता. तिथेच उभं राहून प्रबोधनकारांनी रोज संध्याकाळी जाहीर व्याख्याने देण्याची सुरवात केली. विषय होता, अर्थातच स्वदेशी. वय अवघं वीस एकवीस. शरीरयष्टी सडपातळ. प्रबोधनकारांच्या शब्दांत `लुकडा`. पण भाषणं देण्याची ईर्ष्या मात्र जबरदस्त होती.
या उपक्रमात त्यांना मोने नावाचा एक मित्र सोबतीला मिळाला होता. दोघांच्या धडपडीचं प्रबोधनकारांनी केलेलं वर्णन मोठं मजेशीर आहे. ते लिहतात, `मी आणि मोन्याने स्वदेशी नि राष्ट्रभक्तीवर काही कविता तयार केल्या होत्या. मोने आधी स्वतः चौपाटीवर जाऊन धोंड्यावर उभा रहायचा आणि मोठमोठ्याने त्या कविता साभिनय गाऊ लागायचा. त्याला परसनॅलिटी काहीच नव्हती. चेहरा देवीच्या व्रणांनी डागाळलेला. एका डोळ्यात फूल पडलेले. आवाज भसाडा. पण लेकाचा तो गर्दी जमवायचा. मला यायला वेळ लागला आणि कविता संपल्या तर तोही व्याख्याने द्यायचा. मी आल्यावर माझी सरबत्ती चालू व्हायची. थोड्याच दिवसांत आम्ही आमच्या श्रोतृवर्गाचा एक कंपू तयार केला. अहो, त्यावेळी काय पाचपन्नास माणसे जमली का `प्रचंड` सभा व्हायची.`
पनवेल आणि देवासच्या शाळांमधे असतानाच प्रबोधनकारांच्या वक्तृत्वाचं दर्शन वेगवेगळ्या प्रसंगात घडलं होतं. गाडगीळ गुरुजींची नोकरी टिकवण्यासाठी शिक्षण समितीसमोर त्यांनी भाषणच केलं होतं. पण जाहीर भाषणांची सुरवात झाली ती चौपाटीवरच या रायडिंगस्टोनवरच. लवकरच त्यांना या हौशी मंचाची त्यांना गरज उरली नाही, कारण ठरले वामन रावरामचंद्र जोशी. त्यांनी प्रबोधनकारांची रायडिंग स्टोनवरची अनेक भाषणं ऐकली होती. धडपड्या जोशी मास्तरांनाही एक हुकमी वक्ता सोबत हवाच होता.
वामनराव जोशी गिरगावच्या आर्यन हायस्कूलमधे शिक्षक होते. त्यांनी स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा स्थापन केली होती. स्वदेशी वस्तू या परदेशातून आयात केलेल्या वस्तूं इतक्याच उत्तम दर्जाच्या बनतात, हे ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी ते दर रविवारी प्रदर्शनं किंवा आजच्या भाषेत ग्राहक पेठा भरवत. तेव्हा त्यांना दुकानांच्या जत्रा म्हणत आणि जोशींच्या जत्रांना स्वदेशी बाजार म्हणत. शंभर दोनशे दुकानं आणि मधे स्वदेशीवरच्या जाहीर सभा. प्रबोधनकार म्हणतात, `असले उत्साही नि टापटिपीचे बाजार आणि त्या प्रचंड विचार क्रांतिकारक सभा, त्यानंतर मी कोठेही पाहील्या नाहीत.`
ही दुकानं फोर्ट-गिरगाव ऐवजी दादर, माटुंगा, शीव अशा भागांत जास्त असत. या सभांची ठिकाणंही प्रबोधनकारांनी सांगितलीत. ताडदेवचं प्रसिद्ध गोवालिया टँक मैदान. शीव सॅनेटोरियमचं पटांगण म्हणजे बहुदा स्टेशन जवळचा आर्युर्वेदिक हॉस्पिटलचा परिसर असावा. माटुंग्याचं शंकराचं देऊळ म्हणजे कटारिया रोडवर चंका विश्वेश्वराचं देऊळ असावं. लोकमान्य टिळक, काळकर्ते शि. म. परांजपे, भालाकार भा. ब. भोपटकर, नाशिकचे टिळक म्हणून प्रसिद्ध असलेले नेते बाबासाहेब खरे, राव बहादूर व सनजीखिमजी, ख्यातनाम उद्योजक नरोत्तम मुरारजी असे तेव्हा प्रसिद्ध असणारे वक्ते या सभांमधे बोलत, असं प्रबोधनकरांनी नोंदवलंय. या मोठमोठ्या वत्तäयांबरोबर स्वदेशी बाजारात प्रबोधनकारांचीही भाषणं होत. त्यामुळे या पुढार्यांची त्यांच्याशी ओळख झाली. `एक पाणीदार नि पट्टीचा वक्ता` म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं.
अशीच एक सभा दादर कबुतर खान्याजवळ, कीर्तिकर मार्केटसमोर भरली होती. आज जिथे दादर डिपार्टमेंट स्टोअर आहे तिथे दानशूर समाजसेवक वसनजी खिमजी यांचा बंगला होता. बंगल्याभोवती मोठी बाग होती. त्यात वामनराव जोशींनी स्वदेशी बाजार भरवला होता. लोकमान्य टिळक, शि.म. परांजपे येणार, अशी जाहिरात केल्यामुळे तुफान गर्दी झाली होती. अध्यक्षपदी वसनजी खिमजी होते. तात्त्विक चर्चा आणि व्यापारी आकडेमोड सांगणारे मिळमिळीत वक्ते लोकांना आवडत नव्हते. कारण लोकांमधे स्वदेशी चळवळीचा उत्साह होता. `बैठजाव, बैठजाव, नही मंगता`, अशा आरोळ्या ठोकत श्रोत्यांनी तब्बल सोळा वक्ते एक दोन मिनिटं ऐकून खाली बसवले.
वामनरावांना आजची सभा फसते की काय, अशी चिंता वाटू लागली. त्यांनी प्रबोधनकारांना बाजूला घेऊन विचारणा केली. त्यावर प्रबोधनकार म्हणाले, `लोक आज लढाऊ वृत्तीत आहेत. त्यांना मिळमिळीत भाषणं चालणार नाहीत. दणकेबाज काहीतरी हवंय.`वामनरावांनी विचारलं, तुम्हाला ते जमेल का? प्रबोधनकारांचं उत्तर अर्थातच होय असं होतं. वामनरावांनी त्यांचं नाव घोषित केलं. भलेभले सोळा वक्ते श्रोत्यांनी लोळवले, तिथे हा पोरसवदा लुकडा मुलगा काय करणार, असा प्रश्न सभेला पडला होता. पण झालं उलटंच. पहिल्याच मुद्द्यावर प्रबोधनकारांनी गर्दीचा ताबा घेतला. जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याच जोरात त्यांनी दहा मिनिटांचं भाषण संपवलं. परांजपेंनी त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली. त्यांच्याच भाषणातला मुद्दा पुढे नेत तासभर भाषण केलं. लोक म्हणत राहिले, `भले भले गेले, पण या पोराने सभा जिंकली.`
सभा जिंकण्याची ही पहिली वेळ होती, पण अर्थातच शेवटची नव्हती. प्रबोधनकारांनी महाराष्ट्रात हजारो भाषणं दिली असतील. कडक वक्ते म्हणून ते गाजले. या सभेनंतर साधारण बारा वर्षांनी त्यांनी वक्तृत्वशास्त्र नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात त्यांचा व्यासंग आणि अनुभव दोन्ही दिसतात. ते पुस्तक या विषयावरचं टेक्स्टबूकच बनलं. लोकमान्य टिळकांसह अनेकांनी त्याचं कौतुक केलं. प्रबोधनकारांच्या काही भाषणांची पुस्तकंही झाली, इतकी ती गाजली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तर त्यांनी संपूर्ण राज्य ढवळून काढलं. त्यातून वक्तृत्वाची शैली विकसित झाली. शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळचं त्यांचं भाषण तर प्रत्येक शिवसैनिकांनी रोज वाचायला हवं असं आहे. या ६५ वर्षांपेक्षा जास्त सुरू राहिलेल्या वक्तृत्वाच्या तुफानाची सुरवात चौपाटीवरच्या रायडिंग स्टोनवरून झाली होती. असे हौशी वक्त्यांना घडवणारे खुले मंच आज आहेत का आणि त्यांना श्रोते मिळणार का, असे दोन्ही प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवेत.
(लेखक प्रबोधनकार डॉट कॉमचे संपादक आहेत.)