– संजय वामन पाटील
पाण्याच्या पिशव्या, फुगे डोक्यावर, पाठीवर येऊन आदळले, की खुशाल समजावं, होळी हा सण जवळ आलाय.
सणांपासून आम्ही काहीच बोध घेत नाही, याचा प्रत्यय होळी या सणाने वारंवार येतो. नुसतं भसाड्या आवाजात ओरडायचं, शिव्यांची लाखोली वाहायची, पाण्याने भरलेले फुगे लपूनछपून मुलींवर मारायचे, यापलीकडे होळीला आम्ही काहीच करत नाही.
गेल्या वर्षी कोरोनाच्या जीवघेण्या साथीमुळे आपण कोणतेच सण, उत्सव साजरे केले नाहीत. पण गेल्या ऑक्टोबरपासून कोरोना साथीचं, रोग्यांचं प्रमाण जसं निवळलं, तसं आपण परत पूर्व पदावर येत चाललोय. कोरोनाचे नियम पायदळी तुडवू लागलो. दिवाळीत शासनाने फटाक्यांवर निर्बंध घातलेले असतानाही, काहींनी त्याकडे साफ दुर्लक्ष करून हट्टाने फटाके फोडले.
आता कोरोना आपलं डोकं परत वर काढतोय. आता सण उत्सव साधेपणाने, शासनाने आखून दिलेल्या नियमावलीत साजरे करायला हवेत. पण आपल्याला साधेपणाने सण साजरे करता येतच नाही असेच दिसून येते. कसंय ना, आपल्या सण साजरे करण्यात ‘उत्साह’ कमी आणि ‘उन्माद’ जास्त दिसून येतो. आपल्या प्रत्येक सणाचा इतिहास, त्यामागील पावित्र्य, ध्येय धोरणं समजून न घेता आपण सण साजरे करतो. हे कुठे तरी बदलले पाहिजे असे कोणालाच का वाटत नाही?
प्रत्येक सणात समाजाच्या दृष्टीने, राष्ट्रहिताच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचा काही भाग असतो. सणांच्या बाबतीत लोकांना व्हावी त्या प्रमाणात जाणीव झालेली बघायला मिळत नाही. फक्त आनंद लुटायचा, धम्माल मस्ती करायची इतकाच संकुचित अर्थ मनात ठेवून, आज सण साजरे केले जातायत. पण तसे न करता सणांचे महत्त्व जाणून ते साजरे केले तर त्याला एक अर्थ प्राप्त होईल!
हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला, उत्सवाला एक विधायक, वैचारिक अधिष्ठान आहे. सण आणि उत्सव हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दैनंदिन जीवनातील कंटाळवाण्या परिस्थितीतून बाहेर पडण्याकरता माणसांना सणांची, उत्सवांची गरज असते. हाही सण साजरे करण्यामागचा एक हेतू आहे. तेव्हा प्रत्येक सणाचा हेतू शुद्ध असतो! समाजाच्या भल्याचा असतो!!
मराठी वर्षाचा होळी हा शेवटचा सण! काही वर्षांपासून ३१ डिसेंबरप्रमाणे याही सणाला दारू पिऊन हल्लागुल्ला करण्याची प्रतिष्ठा प्राप्त होत आहे ही फार चिंताजनक बाब आहे. वाईट विचारांची, विकारांची राख रांगोळी करण्याचा सण म्हणजे होळी. शत्रूत्व विसरण्याचा, समाजघातक प्रवृत्तीला तिलांजली देण्याचा, मांगल्याचे चिंतन, मनन, आत्मपरीक्षण करण्याचा दिवस म्हणजे होळी!
होळीसंबंधी अनेक कथा आहेत. शंकराने कामदेव मदनाला जाळले ते याच दिवशी. शंकराच्या मनात विकार जागृत करण्यासाठी मदन आला; पण शंकराने त्याला जाळून टाकले. कृष्णाने कपटी पुतना मावशीचा वध याच दिवशी केला. बालकांना मटकावणारी ढुंढी राक्षसीण होळीच्याच दिवशी मेली. भक्त प्रल्हादाला ठार मारण्यासाठी त्याचा दुष्ट पिता हिरण्यकश्यपू याने अग्निपासून भय नसलेल्या आपल्या होलिका नावाच्या बहिणीला प्रल्हादासह पेटवून दिले. होलिका जळून खाक झाली, पण तप सामर्थ्याने भक्त प्रल्हाद सुखरूप राहिला, तोही हाच दिवस. या कथांमधून आपल्याला काय दिसून येते, तर होळी म्हणजे वाईट विचारांची, विकारांची होळी! सत्याचा विजय!!
माणसातली माणुसकी हरवत चालली आहे. नीतिमत्ता घसरत चालली आहे. धर्म, संस्कृतीचा माणसाला विसर पडत चालला आहे. भोगवाद उरावर बसून थयथया नाचत आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर समाजात थैमान घालत आहेत. अविश्वास बोकाळला आहे. बेशिस्तीचा सुकाळ आहे. कायदा व नियम पायदळी तुडवले जात आहेत. भ्रष्टाचार जागोजागी उफाळलाय! थोडक्यात, समाज पोखरून निघाला आहे. सणांच्या पावित्र्याला हरताळ फासण्यात आला आहे.
आज होळी या सणामागच्या खर्या उद्देशाकडे साफ दुर्लक्ष होताना दिसते. या उत्सवात सर्वधर्मीय भाग घेतात. धुळवड साजरी होते. पण त्यातून फलित काय? होळ्या पेटतात, त्यातून गगनभेदी ज्वाळा उसळतात; परंतु पेटविणार्याच्या मनातला कचरा या होळीत जळत नाही. यावेळी दुष्मनीची राख करायची, मद्य मदिरेत बेभान व्हायचे! निर्लज्ज, अश्लील भाषेत एकमेकांना शिव्या द्यायच्या, मुलींवर पाण्याने भरलेले फुगे मारून पुरुषार्थ गाजवायचा, अनिष्ट आचरण संस्कृतीच्या नावावर खपावयाचे. यापलीकडे होळी या सणापासून माणसं बोध घेतांना दिसत नाहीत.
होळी या सणाची दुर्दशा थांबवायची असेल, तर प्रत्येकाने होळीचा मूळ उद्देश आचरण्याची गरज आहे. नुसत्या होळ्या पेटवल्या, पूजन केले, प्रसाद खाल्ला म्हणजे झाले नाही. होळीचे औचित्य साधून जर प्रत्येकाने ठरवले, की यापुढे दुराचरण करणार नाही, लाच घेणार नाही लाच देणार नाही, सत्याने वागेन. विनाकारण कुणाशी शत्रुत्व पत्करणार नाही. घातक व्यसने, सवयी सोडेन. अनिष्ट रुढींविरुद्ध लढेन. अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवेन; तरच सणांपासून काही तरी बोध घेतल्याचे समाधान लाभेल व सणांचे पावित्र्य राखले जाईल. नाही तर सणांचा अर्थ फक्त मजा, करमणुकीपुरताच उरेल!