दुःखातून वटवृक्ष उभा राहिला
अर्जंट मनीऑर्डर तारेसाठी दीड रुपया मिळाला नाही आणि प्रबोधनकारांची मॅट्रिकची परीक्षा हुकली. कायमची हुकली. मॅट्रिक नाही त्यामुळे प्लीडरची परीक्षा नाही आणि त्यामुळे वकिली नाही. अतोनात गरिबीने गांजलेल्या ठाकरे कुटुंबाने पाहिलेली प्रबोधनकारांच्या वकिलीची स्वप्नं बेचिराख झाली. आता कोरोनाचा काळ हजारो कुटुंबांची स्वप्नं अशीच धुळीला मिळवतोय. तसाच तो प्लेगच्या साथीचा काळ होता. कमाईचे सगळे मार्गच बंद झाले होते. पैसे मिळणार तरी कसे? प्लेग नसता तर जिगरबाज आणि हुन्नरबाज प्रबोधनकारांनी दहा-बारा रुपयांसाठी धावपळ करण्याची पाळी येऊच दिली नसती.
खरं तर प्रबोधनकारांना एडिटर म्हणजे संपादक व्हायचं होतं. देवासमध्ये इंग्रजी सहावीचे पेपर तपासायला आलेल्या गनियन साहेबाला त्यांनी तसंच उत्तर दिलं होतं. पण पत्रकारिता हे उदरनिर्वाहाचं साधन असल्याचं त्यांच्या डोक्यात नव्हतं. देवासला जाण्याआधी काही काळ ते गिरगावात राहायला होते. तेव्हा ‘इंदुप्रकाश’मधल्या लेखनाविषयी त्यांनी तसं नोंदवून ठेवलंय. त्यामुळे पत्रकारिता हा छंद आणि करियर मात्र वकिलीतच, असा त्यांचा विचार असावा. कारण त्या काळात अनेक वकील वृत्तपत्रं काढत होतेच.
अर्थात वकील म्हणून प्रबोधनकार यशस्वी झालेच असते. त्याबद्दल शंका बाळगायचंही कारण नाही. शंका असेल तर आजही त्यांचा कोणताही लेख काढून वाचावा. लक्षात येईल की त्यातला बिनतोड, आक्रमक तरीही आकर्षक युक्तिवाद त्या काळात त्यांच्या विरोधकांना निरुत्तर करत असणार. पण हे फक्त लिहिण्यात नव्हतं तर बोलण्यातही होतं. शाळेत असतानाच गाडगीळ मास्तरांची नोकरी टिकवण्यासाठी त्यांनी म्युन्सिपाल्टीच्या कमिटीसमोर ठोकलेल्या भाषणापासून दिसलेला त्यांच्या वक्तृत्त्वातला वकिली बाणा त्यांच्या शेवटच्या भाषणापर्यंत आढळून येतो. मोठमोठ्या संस्थानिकांपासून परिस्थितीने पिचलेल्या सामान्य माणसांपर्यंत अनेकजण त्यांच्याकडे सल्ला मागण्यासाठी येत असत, असे संदर्भ सापडतात. शिवाय वादांमध्ये प्रबोधनकारांसमोर उभं राहणं इतिहासाचार्य राजवाडेंपासून आचार्य अत्रेंपर्यंत कुणालाही जमलं नाही, हा तर इतिहासच आहे. हे सगळं त्यांनी मॅट्रिक पास नसताना करून दाखवलं. शिक्षण पूर्ण झालं असतं तर ते नक्कीच महाराष्ट्रातले नामवंत वकील झाले असते.
त्या काळात वकिली हा ब्रिटिश भारतातला सर्वाधिक उत्पन्न देणारा व्यवसाय होता. त्यामुळे वकील झाले असते तर प्रबोधनकार एका सुखी मध्यमवर्गीय आयुष्य जगले असते, पण दीड रुपयामुळे तसं झालं नाही. प्रबोधनकारांना आयुष्यभर गरिबीशी झुंजावं लागलं. त्यांनी वाटेत आलेली शेकडो संकटं चारीमुंड्या चीत केली. तर्हेतर्हेचे असंख्य उद्योग व्यवसाय केले, नोकर्या केल्या. समाजासाठी आणि कुटुंबासाठीही प्रचंड संघर्ष केला. इंदूरपासून गोव्यापर्यंतच्या महाराष्ट्रात फिरत राहिले. जमिनीच्या जवळ राहिल्याने त्यांना जग जवळून पाहता आलं. साध्या माणसांशी त्यांची नाळ अधिकाधिक जुळत गेली. साध्या माणसांची दुःख त्यांच्या शब्दात जगाच्या चावडीवर मांडता आली. त्यातून आलेल्या अनुभवांनी ते समृद्ध होत गेले. आगीत जळून प्रबोधनकारांमधलं सोनं अधिक उजळून निघालं. वकील झाले असते तर केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार झाले असते का? शक्यता कमीच वाटते. त्या अर्थाने दीड रुपया मिळाला नाही, ते बरंच झालं.
खरं तर त्या काळात जात हीच सोशल सिक्युरिटी होती. अडचण झाल्यावर आपल्या जातभाईंकडे हात पसरणं, हे तसं समाजाच्या रितीला धरूनच होतं. पण प्रबोधनकारांच्या स्वाभिमानाला ते मान्य नव्हतं. या दीड रुपयाच्या भानगडीत प्रबोधनकारांना जातीच्या संस्थांचं खरं रूप कळलं. आजी बयने जातिभेद नाकारण्याच्या केलेल्या संस्कारांना या प्रसंगामुळे भान मिळालं असावं. त्यामुळे प्रबोधनकार आपल्याच जातीच्या लोकांचं भलं करण्याच्या चक्रात अडकून बसले नाहीत. किंबहुना असं म्हणावं लागेल की त्यांनी स्वतःला जातीच्या परिघात अडकवून घेतलं नाही. ते स्वतःची जात ओलांडून समग्रतेने महाराष्ट्राकडे बघू शकले.
प्रबोधनकारांनी या प्रसंगाविषयी लिहिलंय ते महत्त्वाचं आहे, `त्या प्रकरणाची आठवण झाली की त्या पांडोबा वैद्यांच्या स्नेहाळ सहाय्याबद्दल आजही माझ्या डोळ्यांतून कृतज्ञतेची आसवे घळाघळ ओघळतात. कोठे तो साधासुध्या राहणीतला शिंपी कामावर पोट भरणारा पांडोबा आणि कोठे ते चांद्रसेनीय कायस्थ माध्यमिक शिक्षणोत्तेजक फत्तरी काळजाचे कारभारी नि पुढारी.
स्वतः कारकुंडे तर कारकुंडे, पण दिमाख कडककॉलर रावबहाद्दुरकीचा!’ प्रबोधनकारांना फीसाठी दारोदार फिरवण्याच्या तयारीत असलेल्या जातीच्या पुढार्यांचा अनुभव पाठीशी असल्याने प्रबोधनकारांनी अशांना कधीच आपल्या आसपास भटकू दिलेलं दिसत नाही. उलट त्यांची कायम सालटी काढलेली आहेत. यात त्यांच्या लेखणीचा प्रसाद सगळ्यात आधी त्यांच्याच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या पुढार्यांना बसलेला आहे. विशेषतः ‘प्रबोधन’मध्ये त्याचे दाखले वाचायला मिळतात. अर्थात पुढे ‘प्रबोधन’ दादरऐवजी सातारा रोड आणि पुण्याहून निघायला लागल्यावर त्याचं प्रमाण कमी झालेलं दिसतं.
आपले समाजबांधव म्हणजे जातीचे पुढारी नाहीत आणि पुढार्यांची प्रतिष्ठा म्हणजे आपल्या समाजाची प्रतिष्ठा नाही, हे आजही लोकांना कळत नाही, पण प्रबोधनकारांना ते अगदी नेमक्या वयात कळलं. या प्रसंगामुळेच ते पक्कं झालं. मॅट्रिकची फी भरण्यासाठी प्रबोधनकारांना मदत करणारे पांडोबा वैद्य किंवा पोष्टमास्तर देशपांडे हे तेव्हाच्या पनवेल परिसरातल्या आडनावांचा विचार करता चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपीच असावेत. त्यामुळे प्रबोधनकारांची चीड ही फक्त जातीच्या पुढार्यांविषयी सीमित राहिली. आपल्या व्यापक सामाजिक बांधिलकीच्या परिघात आपल्या जातीच्या लोकांना ते सहजपणे सामावून घेऊ शकले. आपल्या जातीच्या लोकांपासून ते फटकून राहिले नाहीत, उलट कायम त्यांच्या सुखदुःखात सोबत राहिले.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचा इतिहास डागाळण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा इतिहासाचार्य राजवाडेंसारख्या दिग्गजासमोर उभं राहण्याची हिम्मत महाराष्ट्रात फक्त प्रबोधनकारांनीच दाखवली. त्यामुळे साहजिकच देशभरातले मराठी कायस्थ त्यांच्यासोबत जोडले गेले. प्रबोधनकारांनीही कायस्थ असण्याचं कधी लपवलं नाही. उलट कायस्थांच्या लेखणी-तलवारीच्या कौशल्याचा आणि स्वराज्यनिष्ठेचा वारसा अभिमानाने सांगितला. बाजीप्रभू देशपांडे आणि रंगो बापूजी असे आदर्श त्यांनी या समाजासमोर उभे केले. त्यामुळे सीकेपींचं नेतृत्त्व त्यांच्याकडे आपसूक चालत आलं होतं, पण त्यांनी त्यांना समकालीन असणार्या बहुजन नेत्यांसारखे आपल्या समाजाची संघटना उभारण्याच्या फंदात पडले नाहीत. उलट जातीच्या नावावर असलेल्या सामाजिक संस्थाच नाही, तर शिक्षणसंस्था आणि बोर्डिंगही फारसं काही घडवू शकणार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांना जातीच्या संघटनांची मर्यादा माहीत होती. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक उपक्रमात सीकेपी जातीचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पण त्यांचे उपक्रम फक्त सीकेपींपुरते मर्यादित राहिले नाहीत. ते त्यांचं वेगळेपण ठरलं.
दीड रुपया न मिळाल्याने त्यांच्या हातात औपचारिक पदवी पडली नाही. त्याचा सल त्यांना आयुष्यभर राहिला. पण त्याचबरोबर जिंदगी नावाच्या खुल्या विद्यापीठात शिकताना औपचारिक शिक्षणाच्या मर्यादाही त्यांच्या लक्षात आल्या. डिग्र्या घेऊन नोकरी करण्याऐवजी कारागिरी, मेहनत आणि उद्योजकतेची कास धरण्याचाच उपदेश त्यांनी कायम केला. त्यांनी स्वतःच्या जीवनातही त्याचा आदर्श घालून दिला. खानदेशातले शिक्षक त्यांच्याकडे बेरोजगारीची समस्या घेऊन आले तेव्हा त्यांनी सांगितलं की मास्तरकीच्या मागे लागण्यापेक्षा स्टोव्ह रिपेरिंगची दुकानं टाका. तो दीड रुपया गमावल्याने त्यांना हे जगावेगळं शहाणपण कमावता आलं होतं. त्यामुळेच आपल्या मुलांच्या औपचारिक उच्च शिक्षणासाठी ते आग्रही असलेले दिसत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चित्रकलेचा `हात’ जपावा म्हणून त्यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जाऊ दिलं नाही. श्रीकांतजी ठाकरेही कुठे कॉलेजमध्ये गेले नाहीत, पण कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या पायावर उभं राहता येईल अशी हुन्नरांची दीक्षा मात्र प्रबोधनकारांनी आपल्या मुलांना पुरेपूर दिली होती. त्याच जोरावर त्यांनी स्वतःला घडवलं आणि अनेक पिढ्याही घडवल्या.
दीड रुपयामुळे आपलं शिक्षण अपूर्ण राहिलं तसं इतर मुलांचं होऊ नये, यासाठी त्यांनी केलेलं एक मोठं काम कायमच नजरेआड राहतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी रयत शिक्षण संस्था सुरू केली. आज ही संस्था
शाळाकॉलेजांचं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं जाळं म्हणून ओळखली जाते. या संस्थेने महाराष्ट्राला शिकवलं, घडवलं. त्या रयत शिक्षण संस्थेला आणि कर्मवीर अण्णांना घडवण्यात प्रबोधनकारांचा भरीव वाटा होता. इतर कुणी सोबत नसताना प्रबोधनकार कर्मवीरांच्या सोबत उभे राहिले. रयतला हरिजन फंडातला निधी मिळावा म्हणून थेट गांधीजींबरोबरही भांडले. त्यामुळेच कर्मवीर हे प्रबोधनकारांना फक्त गुरूच नाही तर पितृतुल्य मानत. दीड रुपयामुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या प्रबोधनकारांनी कर्मवीरांच्या कार्यात महत्त्वाचं योगदान देऊन एक वर्तुळ पूर्ण केलं. फक्त गरिबीमुळे अडकलेलं लाखो विद्यार्थ्यांचं शिक्षण यामुळे पूर्ण होऊ शकलं. प्रबोधनकारांच्या दुःखाने पेरलेल्या दीड रुपयातून शिक्षणाचा वटवृक्ष उभा राहिला.
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)