केंद्रातील सत्ताधारी भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातले असले तरी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल कॉँग्रेस तिसऱयांदा सत्तेत येईल, तर आसाममध्ये भाजप सत्ता राखेल. तामीळनाडून द्रमुक आणि काँग्रेस आघाडी सत्तेत येईल, असा अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘टाइम्स नाऊ-सी व्होटर’ने ओपिनियन पोल जाहीर केले आहेत. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप नव्हे तर पुन्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येणार आहे. तृणमूलची सत्ता आली तरी यावेळी मात्र त्यांच्या जागांत घट होऊन भाजपच्या जागांत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
तृणमूलचे 57 जागांचे नुकसान
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 294 पैकी 154 जागा मिळू शकतात. तर भाजपला 107 जागा मिळतील असा अंदाज आहे. 2016 मध्ये तृणमूलला 211 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला फक्त 3 जागांवर विजय मिळवता आला होता. यावेळी मात्र त्यांच्या 57 जागा कमी होतील, तर भाजपला 104 जागांचा फायदा होईल. काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या पदरात फक्त 33 जागा पडण्याची शक्यता आहे.
आसाममध्ये पुन्हा भाजप, पण जागा घटणार
आसाममध्ये पुन्हा भाजप सत्तेत येईल, मात्र त्यांच्या जागांमध्ये घट होईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 126 पैकी 67 जागा मिळतील, तर काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीला 57 जागा मिळू शकतात. दोन जागा इतर पक्षांच्या खात्यात जातील. 2016 च्या निवडणुकीत भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस आघाडीने 39 जागा काबीज केल्या होत्या.
केरळमध्ये पुन्हा डावी आघाडी
केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (एलडीएफ) पुन्हा सत्तेत येणार आहे. 140 पैकी 82 जागा डाव्यांना मिळतील. तर युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ) ला 56 जागा मिळतील. भाजपला या ठिकाणी केवळ एकच जागा मिळेल असा अंदाज आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफने 20 जागांपैकी 19 जागा जिंकल्या होत्या.
तामीळनाडूत द्रमुक-काँग्रेसची सत्ता
तामीळनाडूत सत्ता परिवर्तन होणार असून अण्णा द्रमुक-भाजप आघाडीला धक्का देत द्रमुक-कॉँग्रेस सत्तेत येईल. विधानसभेच्या 234 जागांपैकी द्रमुक-कॉँग्रेस आघाडीला 158 जागा मिळतील, तर 2016 मध्ये 136 जागा जिंकणाऱया अण्णा द्रमुक-भाजप आघाडीला यावेळी केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज आहे.
पुद्दुचेरीत काँग्रेसला नुकसान, भाजपला फायदा
पुद्दुचेरीत कॉँग्रेस आमदारांनी साथ सोडल्याने नारायणसामी यांना निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. विधानसभा निवडणुकीतदेखील कॉँग्रेसला याचे नुकसान होताना दिसत असून 30 जागांपैकी केवळ 12 जागा त्यांच्या पदरात पडतील. तर भाजप आघाडीला 16 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे.
सौजन्य : दैनिक सामना