प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल शनिवारी आला.
मनसुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा अथवा जखमा नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून मृतदेह सापडण्याच्या 12 ते 14 तास आधी त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अधिक तपासणीसाठी त्यांचा व्हिसेरा कलिना येथील फॉरेन्सिक लॅब येथे पाठवण्यात आला आहे. आठवडाभरात त्याचा अहवाल अपेक्षित असून त्यानंतरच मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होईल, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेल्या स्कॉर्पिओच्या मालकाचा तपास केल्यानंतर ती गाडी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधीच मनसुख यांनी आपली गाडी ऐरोली येथून चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी मनसुख यांची चौकशी सुरू केली होती. दरम्यान, गुरुवारी एका अज्ञात इसमाचा फोन आल्यानंतर मनसुख हे त्याला भेटण्यासाठी गेले ते परतलेच नाहीत. त्यांचा मृतदेह दुसऱया दिवशी शुक्रवारी सकाळी दहा वाजता मुंब्य्राच्या खाडीत सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांचे शवविच्छेदन कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करण्यात आले.
दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख यांची हत्या झाल्याचा दावा केला. परंतु शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिक स्पष्टता होईल, अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतली होती. आज मनसुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आला. त्यात त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नव्हत्या, असे नमूद करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय येनपुरे यांनी पत्रकारांना दिली.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
शवविच्छेदनाचा अहवाल सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे यांनी हिरेन कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सुपूर्द केला. त्यानंतर हिरेन कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मनसुख यांचा मृतदेह खोपट येथील विकास पाल्म सोसायटीत आणण्यात आला. तेथे कुटुंबीय व नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर जवाहरबाग येथील वैकुंठभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिरेन कुटुंबालाही अहवाल सोपवला
दरम्यान, जोपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल हाती येत नाही तोपर्यंत मनसुख यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा हिरेन कुटुंबीयांनी घेतला होता. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना पोलीस आणि डॉक्टरांनी बोलावून त्यांचे शंकानिरसन केले. तसेच व्हिसेराचे केमिकल ऍनेलिसीस करणार असल्याचीही माहिती दिली.
एटीएसचे पथक मुंब्रा खाडीत घटनास्थळी
हा तपास एटीएसकडे सोपवण्यात आल्याची घोषणा सरकारने केल्यानंतर आज सकाळीच एटीएसचे पथक मुंब्रा रेतीबंदर खाडीतील घटनास्थळी पोहोचले. एटीएसचे अधिकारी श्रीपाद काळे यांनी टीमसह घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच आसपास राहणाऱया रहिवाशांशी संवाद साधला. परिस्थितीजन्य पुरावे जमा करण्यासाठी घटनास्थळी जाऊन प्राथमिक तपास करण्यात आल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱयांनी दिली.
गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर उच्चस्तरीय बैठक
‘अँटिलियबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाचे गूढ काढले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. शनिवारी सायंकाळी गृहमंत्र्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यावर संबंधित पोलीस अधिकाऱयांची उच्चस्तरीय बैठक झाली.
या बैठकीत आतापर्यंत झालेला तपास, तपासाची पुढील दिशा कशी असेल. ‘अँटिलिया’ ते हिरेन मृत्यू या घटनाक्रमाची सविस्तर माहिती गृहमंत्र्यांनी तपास अधिकाऱयांकडून जाणून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, ठाण्यातील पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सौजन्य : दैनिक सामना