बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास करून मराठी रंगमंच कलादालनाची निर्मिती करण्यात येत आहे. यातून मराठी रंगभूमीचा गौरवशाली इतिहास, वैशिष्टय़े आणि वैभवशाली वाटचाल उलगडायला हवी, अशा पद्धतीने रंगमंच कला दालनाचे काम करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी रंगमंच कला दालनाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कलादालनाचे काम इतके आकर्षित असावे की बाहेरच्या व्यक्तीस आत यावेसे वाटायला हवे. आत आलेल्या व्यक्तीला मराठी रंगभूमीची देदीप्यमान वाटचाल अनुभवल्याचा आनंद मिळावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कलादालनाच्या निर्मितीमध्ये नाटय़क्षेत्रातील नामवंत तज्ञ आणि मान्यवरांचा सहभाग घेण्यात यावा.
या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषपुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱहाड यांच्यासह विविध विभागांचे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कलादालनाच्या निर्मितीसाठी समिती
कलादालनाच्या निर्मितीकरिता मुंबई महापालिकेचे पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विषय वस्तू समितीची (पंटेंट डेव्हलपमेंट कमिटी) स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्वश्री आदेश बांदेकर, विजय पेंकरे, सुबोध भावे, राजन भिसे, ऋषिकेश जोशी, मुक्ता बर्वे, संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालय, मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग, उपायुक्त परिमंडळ 1 बृहन्मुंबई महानगरपालिका आदींचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त नाटय़ क्षेत्रातील अन्य तज्ञांना आमंत्रित म्हणून समितीमध्ये निमंत्रित करता येणार आहे. कला दालनाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटी रु चा निधीही देण्यात येणार आहे. विषय वस्तू समितीची पहिली बैठक 27 फेब्रुवारी रोजी असल्याची माहिती ही बैठकीत देण्यात आली.
सौजन्य : दैनिक सामना