सध्या ओटीटीच्या जगात ‘इज लव्ह इनफ सर’ या सिनेमाची चर्चा आहे… त्याचं ‘सर’ हे लघुरूप जास्त प्रचलित आहे… यंदाच्या व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर प्रेमिकांनी तो एकमेकांच्या सोबतीने पाहायला हवा… प्रेमाचं वय उलटून गेलेल्यांनीही तो खास पाहायला हवा… कारण तो काही निव्वळ प्रेमपट नाही, त्यापलीकडे बरंच काही सांगून जाणारा सिनेमा आहे.
रोहेना गेरा या लेखिका-दिग्दर्शिकेचा हा सिनेमा खरं तर २०१८ साली तयार झाला होता. त्याला सर्वोच्च प्रतिष्ठेच्या कान महोत्सवापासून अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांत सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. पण हा सिनेमा भारतात प्रदर्शित होण्याच्या बेतालाच देशात करोनाच्या संकटाने डोकं वर काढलं, टाळेबंदी लागू झाली आणि ‘सर’ला ओटीटीवर प्रदर्शित व्हावं लागलं. या माध्यमाचे प्रेक्षक चित्रपटगृहांच्या प्रेक्षकांपेक्षा अधिक विचक्षण असल्याने ओटीटीवर त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
‘सर’ ही एक अनोखी प्रेमकथा आहे… लंचबॉक्स, फोटोग्राफ या सिनेमांच्या शैलीतली. सरळ साध्या प्रसंगांमधून उलगडणारी. दृश्यरचनेत, हाताळणीत, संवादांत, अभिनयात कृतक नाट्यमयतेचा मागमूस नसलेली… ती अतिशय महत्त्वाकांक्षी आणि धाडसी कथाही आहे… कारण ती दोन ‘वर्गां’मधल्या प्रेमाची कहाणी सांगते… आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह हे आजच्या सामाजिक वातावरणात फार धाडसी वाटत असले, तरी या देशात ते जुने आहेत, रुळलेले आहेत. देशातले सांस्कृतिक, बौद्धिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वार्थाने मागासलेले प्रांत वगळता अन्यत्र अनेक सर्वसामान्य घरांमध्ये असे बंडखोर विवाह घडतात आणि ९० टक्क्यांहून अधिक ठिकाणी पालक ते या ना त्या टप्प्यावर स्वीकारतात. प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांपायी खाप पंचायती बसवून पोटच्या गोळ्यांचे स्वत:च्या हाताने कोथळे बाहेर काढणारे गतानुगतिक नराधम आजही संपूर्ण देशाच्या संदर्भात कमीच असतात.
पण, ‘सर’मध्ये मांडलेली कथा ही या बंडखोरीच्याही पलीकडची आहे, बंडाच्या कल्पनांच्या पलीकडची आहे. एक अतिश्रीमंत उच्चभ्रू घरमालक आणि त्याच्याकडे काम करणारी मोलकरीण यांच्यातली ही हळुवार प्रेमकथा आहे… मोलकरीण अर्थात मेड आणि ती जिथे काम करते त्या घरातला पुरुष यांच्यात प्रणयसंबंध ही काही फार धाडसी गोष्ट नाही समाजाच्या दृष्टीने. लैंगिक संबंधांच्या फँटसींना वाहिलेल्या पॉर्न साइट्सवर एकेक विभाग ‘मेड’ला किंवा ‘मॅनसर्व्हंट’ला अर्पण केलेले असतात… लैंगिक क्षुधाग्रस्त मालक किंवा मालकीण या मदतनीसांकडून त्या क्षुधेचं शमन करून घेतात, याचं तपशीलवार प्रच्छन्न चित्रण त्यातल्या क्लिप्समध्ये असतं…
…जगाच्या पाठीवर कोणत्याही देशातल्या फँटसींमध्ये मालक आणि नोकर यांच्यातल्या संबंधांची मजल लैंगिकतेपलीकडे जात नाही… मालक किंवा मालकीण नोकरांकडून क्षुधातृप्ती करून घेतात, एवढंच त्यात घडत… फक्त निव्वळ लैंगिक व्यवहार… धाकदपटशाने किंवा पैशांच्या आमिषाने जुळवून आणलेला…. एक मालक आणि नोकर यांच्यात यापेक्षा अधिक, यापेक्षा वेगळं काही घडू शकत नाही, हे आपण किती सहजतेने स्वीकारलेलं आहे. माणूस जातींची, धर्मांची, वर्णांची बंधनं तोडू शकतो आणि प्रेमाचा संबंध प्रस्थापित करू शकतो- पण मोलकरीण आणि मालक यांच्यात प्रेम जुळू शकत नाही, हे आपण मनोमन स्वीकारलं आहे.
त्याची काही कारणंही आहेत.
जातीधर्मभाषाभेदांमधला फरकाचा भाग हा बर्याचदा निव्वळ तपशीलात्मक असतो. प्रेमात पडलेली माणसं त्याचा उच्चनीचतेच्या कल्पनेतून विचार करत नाहीत. एखाद्या जातीला, धर्माला उच्च आणि दुसर्याला कनिष्ठ मानणारा कधीच आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेमात पडत नाही. जो अशा प्रेमात पडतो तो आधीपासूनच उच्चनीचतेच्या कल्पनांना तिलांजली देऊन बसलेला असतो. वर्गभेद इतका सोपा नाही, कारण त्यात दरी आहे ती आर्थिक स्तराची. आर्थिक श्रीमंती आणि गरिबी माणसांमध्ये जे भयानक अंतर निर्माण करतं ते दोन्ही बाजूंनी अनुल्लंघ्य असं असतं… साधा विचार करा, आपल्या घरात पूर्णवेळ काम करणार्या मोलकरणीला महिन्याला जेवढा पगार दिला जातो, तेवढा किंवा त्याहून जास्त खर्च उच्चभ्रू घरांमधल्या इम्पोर्टेड कुत्र्यांवर दर दिवसाला होत असतो.
‘गल्लीबॉय’ या सिनेमात रणवीर सिंगने साकारलेला नायक उच्चभ्रू कल्की कोचेलिनच्या घरातलं बाथरूम पाहूनच हिरमुसतो, त्याचं सगळं कुटुंब त्या बाथरूमच्या आकाराच्या घरात राहात असतं. एवढी महाप्रचंड तफावत आहे ही.
‘सर’मधल्या अश्विन आणि रत्नाचंच उदाहरण घ्या. अश्विन हा अमेरिकेत शिकून आलेला, दक्षिण मुंबईत टोलेजंग इमारतीत बंगलेवजा फ्लॅटमध्ये राहणारा अतिश्रीमंत आर्किटेक्ट. रत्ना ही गावात लहानाची मोठी झालेली, अल्पवयात विधवा झालेली मराठी मोलकरीण. अश्विनने लग्नाच्या दिवशी विवाह मोडल्याने त्याच्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहणारी प्रेयसी दुरावली आहे, आईवडील, मित्रपरिवारही स्तंभित झालेले आहेत. पण, सुशिक्षित, सुसंस्कृत माणसं असल्याने सगळेच त्याला वेळ देतायत. त्याच्याकडे काम करणारी रत्ना शिक्षणात, सोफिस्टिकेशनमध्ये त्याच्या बरोबरीची नाही. समाजाने तशी संधीच दिलेली नाही तिला. त्यात ती विधवा. धाकट्या बहिणीच्या शिक्षणाचा, आईवडिलांच्या, सासूसासर्यांच्या प्रतिपाळाची जबाबदारी आहे, म्हणून तिला शहरात नोकरी करायची संधी मिळालेली आहे. तिच्यात वेगळं काही असेल तर ती आहे नशिबाने ज्या टप्प्यावर आणून ठेवलं तिथेच न थांबता तिथून पुढे जाऊ पाहण्याची ऊर्मी, मोठी स्वप्नं पाहण्याची इच्छा. तिला शिवणकामात गती आहे. आपण चांगल्या ठिकाणी शिकलो तर
फॅशन डिझायनर बनू शकू, असं तिला वाटतं. ते तिचं स्वप्न आहे.
अश्विनच्या पोळलेल्या मनावर ती नकळत फुंकर घालते, त्याची काळजी घेते. तोही तिच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालतो, तिचा शिक्षणाचा मार्ग सुकर करतो. हळुहळू तिच्यात गुंतत जातो. ते गुंतणं त्याच्याकडून अभावितपणे, पण उत्कटतेने व्यक्त होतं तेव्हा ती त्यांच्यातल्या संभाव्य नात्यातली अशक्यता ओळखून त्याच्यापासून दूर निघून जाते… इथून पुढचा कथाभाग सांगितला तर तो अजून हा चित्रपट न पाहिलेल्या वाचकांसाठी रसभंग करणारा ठरेल… पण, हा सिनेमा ज्या टप्प्यावर संपतो तो टप्पा फार महत्त्वाचा आहे… तिथे टिपिकल हिंदी सिनेमांप्रमाणे अंशुमन काही समाज की रिवायतों को और खानदान की इज्जत को ठुकराकर रत्नाबरोबर लग्न वगैरे करत नाही… त्याने तिला दिलेली दिशा ती स्वीकारते आणि त्याच्याबरोबर पहिल्यांदा बरोबरीच्या नात्यावर येते, तिथे सिनेमा संपतो… कथा अर्थातच संपत नाही, ती आपल्या मनात पुढे चालत राहते… सिनेमा संपल्यानंतर सिनेमाच्या शीर्षकाचा अर्थ आपल्याला उलगडतो…
अश्विन आयुष्यात निव्वळ आर्थिक स्तरामुळे अशा उंचीवर आहे, जिथून तो कोणावरही प्रेम करू शकतो… रत्नासारख्या समाजातल्या निम्नस्तरातल्या, कष्टकरी समाजातल्या मुलीवर त्याचं प्रेम जडणं हे तर भाग्यच आहे… उपकार आहेत ते… कारण तो ‘आहे रे’ वर्गातला आहे, ती ‘नाही रे’ वर्गातली आहे… जगभरात या वर्गांमधली तफावत अतिप्रचंड आहे… पिढीजात, खानदानी श्रीमंतांचं बोलणं, चालणं, आवडीनिवडी, अभिजातता, सोफिस्टिकेशन हे त्यांच्या वर्गात जन्मजात आलेलं असतं, त्याचं नवश्रीमंतांवरही कलम करता येत नाही, तर दरिद्री वर्गातल्या, अर्धशिक्षित मोलकरणीवर ते कलम कसं होऊ शकेल?… अश्विनच्या वर्गाने रत्नाच्या वर्गावर केलेलं प्रेम ही कोणत्याही स्थितीत फक्त मेहेरबानीच असेल, त्यातून बरोबरीचं नातंच साकारलं जाणार नाही… अश्विनची पत्नीकडूनची अपेक्षा मोलकरणीची आहे की काय, अशीही शंका एका टप्प्याला येते. समाजात अजूनही पत्नीला दासी मानणार्या पतींची संख्या कमी नाही.
या पार्श्वभूमीवर रत्नाच्या मनातली नेमकी भावना व्यक्त करणारं शीर्षक आहे या सिनेमाचं… फक्त प्रेम पुरेसं आहे का हो सर?… या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘नाही, फक्त प्रेम पुरेसं नाही.’ प्रिय व्यक्तीला आपल्या बरोबरीला आणणारा समानतेचा दिलासा अधिक महत्त्वाचा आहे… तसं झालं तर प्रेम ही मेहेरबानी उरत नाही, ती दोन समकक्ष माणसांमधली परिपक्व देवाणघेवाण ठरते… तेव्हाच ते ‘प्रेम’ असू शकतं… ‘सर’मध्ये रत्ना निघून गेल्यानंतर तिच्या जाण्याचा अर्थ अश्विन परिपक्वपणे समजून घेतो आणि त्यांच्यातलं सामाजिक अंतर मिटवण्याच्या दृष्टीने तिच्या सक्षमीकरणासाठी, मैत्रीच्या, स्नेहाच्या भावनेतून सच्चे प्रयत्न करतो… तो दिलासा रत्नाला मिळतो तेव्हा ती त्याच्याशी पहिल्यांदा बरोबरीच्या नात्यातून बोलते… इथून पुढे काय होत असेल तो ज्याच्या त्याच्या कल्पनेने फुलवण्याचा विषय आहे…
रोहेना गेरा यांनी अतिशय संयतपणे मांडलेल्या आणि विवेक गोंबर आणि तिलोत्तमा शोम यांनी तेवढ्याच अकृत्रिमतेने व्यक्तिरेखा रंगवलेल्या या सिनेमाचा हा गाभा खरं सांगायचं तर प्रेमाच्या म्हणवणार्या सगळ्याच नात्यांना लागू पडणारा आहे. प्रेमात माणसं सगळं काही देतात, अगदी जीवही देतात, पण ती बहुतेक वेळा स्वार्थप्रेरित ‘वन अपमनशिप’ असते… माझ्यासारख्या व्यक्तीने तुझ्यावर प्रेम केलं हे तुझं भाग्य, असं तरी सांगणं असतं किंवा तू माझ्याकडे मेहेरबान होऊन पाहिलंस आणि माझ्यासारख्या य:कश्चित धूलिकणाला सोन्याचं मोल आलं, अशी लोळणफुगडी तरी घातली जाते. प्रेमात यातलं काहीतरी एक घडलंच पाहिजे, असं प्रेमाविषयीचं फिल्मी बालिश आकलन सांगतं… हे असलं काहीतरी बुद्धीने ‘तिसरी ड’मध्ये असलेल्या माणसांच्या संदर्भातच घडू शकतं.
वयाने आणि बुद्धीने वाढलेल्या माणसांना प्रेमात समान अधिकार हवा असतो… माणसाने माणसाला माणसासारखा वागवण्याचा अधिकार… नुसतं प्रेम पुरेसं नाही कोणत्याही नात्यात… माणूस म्हणून आपण सगळे एकसमानच आहोत, कामं वेगवेगळी असली, व्यवहारातले दर्जे वेगवेगळे असले, समाजातलं स्थान वेगवेगळं असलं तरी निखळ माणूसपणाच्या नात्यात कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, असा विश्वास जिथे दिला जाईल ते खरं प्रेम!
अशा समंजस समाजात जो साजरा होईल तो खरा प्रेमदिन.
यानिमित्ताने देशात आज घडत असलेल्या, घडवल्या जात असलेल्या घटना तपासून पाहायलाही हरकत नाही. आज समाजाच्या सगळ्या घटकांमध्ये परस्परांविरोधात वाढीला लागलेला अविश्वास काय सांगतो? देशाची एकात्मता जिच्यावर आधारलेली आहे, ती प्रेमभावना समानतेच्या नात्यातूनच निर्माण होऊ शकते. मर्जीतले श्रीमंत उद्योगपती आणि गरीब कष्टकरी, शेतकरी यांच्यातली आर्थिक विषमतेची दरी वाढवण्याचा प्रयत्न असाच सुरू राहिला, तर या दोन घटकांमधलं उरलं सुरलं प्रेमही आटून जाईल आणि समानता प्रस्थापित करण्याची लढाई पुन्हा नव्या जोमाने सुरू होईल… कारण फक्त एकतर्फी, उपकारभावनेचं मतलबी प्रेम कधीच पुरेसं नसतं, नात्यातही आणि समाजातही.