मुंबई, ठाणे, नवी मुंबई वगळता राज्यात इतर जिह्यांत पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. 15 फेब्रुवारीपासून विद्यापीठे व डिग्री कॉलेजही सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लास ओनर्स असोसिएशनने केली आहे. असोसिएशनच्या शिष्टमंडळाने नुकतीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी क्लासचालकांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या ‘एसओपी’ सादर केल्या.
मागील मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्यातील खासगी शिकविण्या बंद आहेत. यामुळे क्लासचालकांबरोबच विद्यार्थ्यांचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी क्लासची लाखो रुपये फी भरली आहे, पण कोरोनामुळे एक दिवसही प्रत्यक्ष क्लासला जाता आलेले नाही. तर क्लासेस बंद असल्याने शिक्षक आणि तेथील इतर कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. काही क्लासेस भाडय़ाच्या जागेवर चालत असल्याने क्लासचालकांना जागेचे भाडे द्यायला पैसे नसल्याने ती जागा सोडावी लागली आहे. अशा असंख्य अडचणींचा पाढाच क्लासचालकांच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्र्यांसमोर वाचला आहे.
क्लासेस सुरू करताना ही खबरदारी घेणार
क्लासेसला येणाऱ्या विद्यार्थी व तेथील शिक्षक, इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल, एक बेंच एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असेल, विद्यार्थ्यांना स्वतःची पाण्याची बाटली, सॅनिटायझर, मास्क लावण्याची सक्ती असणार तसेच एखदा विद्यार्थी किंवा शिक्षकांपैकी कुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांची माहिती प्रशासनाला कळविण्यात येईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष संतोष वासकर यांनी सांगितले.
स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक
शाळांप्रमाणेच क्लासेस सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असून क्लास ओनर्स असोसिएशनच्या वतीने आतापर्यंत वसई-विरार, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी देण्याविषयीचे निवेदन दिल्याचे वासकर यांनी सांगितले तसेच शिक्षणमंत्र्यांकडूनही स्थानिक प्रशासनाला कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी देता येईल का याविषयी माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत