मोठ्या पडद्यावर चमकल्यानंतर अभिनेत्री शिवांगी खेडकर आता स्टार प्लस वाहिनीवरील ‘मेहंदी है रचनेवाली’ या आगामी मालिकेतून छोट्या पडद्यावर अवतरणार आहे. मुळात शिवांगी कॉम्प्युटर इंजीनियर झाली आहे, पण आपला ओढा अभिनयाकडे आहे हे तिला उमगले. यानंतर तिने थेट अभिनय क्षेत्रात उडी घेतली. या मालिकेत ती अभिनेता साई केतन राव याच्यासोबत येतेय. तोही कॉम्प्युटर सायन्सचा पदवीधर आहे. त्यानेही यंत्रामध्ये डोके घालण्यापेक्षा अभिनय क्षेत्रच जवळ केले.
या मालिकेत हे दोघेजण पल्लवी देशमुख आणि राघव राव या मुख्य व्यक्तिरेखा साकारताना दिसतील. आपल्या अभिनय प्रवासाबाबत शिवांगी खेडकर म्हणते, माझ्या आईवडिलांचे पक्के मत आहे की, माणसाच्या जीवनात शिक्षणाला खूपच महत्त्व आहे. त्यामुळेच त्यांनी मला कॉम्प्युटर इंजीनियरींग शिकवले. पण हे शिक्षण घेत असतानाच मला माझा कल अभिनयाकडे आहे हे जाणवलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काय करावं हे आईबाबांनी सर्वस्वी माझ्यावर सोडलं. त्यामुळेच आता मी हिंदी मालिकेत माझा प्रवास सुरू करतेय, असेही ती म्हणाली.