कोरेगाव तालुक्यातील एकंबेनजीक असलेल्या एका विश्वस्त संस्थेच्या निवासी शाळेतील 31 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
गेल्या आठवडय़ात सातारा शहरानजीक एका कार्यक्रमासाठी गेल्यानंतर या विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला व ताप जाणवू लागला. त्यातून त्यांची तपासणी केल्यानंतर कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले. शासनाच्या आरोग्य विभागाने तातडीने औषधोपचार केल्याने या विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत आहे.
एकंबेनजीक रामेश्वर डोंगराच्या पायथ्याला असलेल्या एका निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सातारा शहरानजीक असलेल्या त्यांच्या एका शाखेत कार्यक्रमासाठी नेण्यात आले होते. तेथे अन्य विद्यार्थ्यांच्या संपर्कात आल्याने या विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला व ताप जाणवू लागला. त्यामुळे विश्वस्त संस्थेच्या पदाधिकाऱयांनी तातडीने पाचगणी येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविले. तेथे त्यांचे स्वॅब घेतले असता ते पॉझिटिव्ह आले.
त्यानंतर या विश्वस्त संस्थेच्या पदाधिकाऱयांचे धाबे दणाणलेच. त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून, माहिती दिल्यानंतर एकंबे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने सर्वच विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्यात आले, तेदेखील पॉझिटिव्ह आले. त्यानंतर शाळेच्या आवारातच विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांना आणि सेवक वर्गालादेखील क्वारंटाइन करण्यात आले आहे.