हिंदुस्थानातील अनमोल रत्न म्हणून जगाला परिचित असलेल्या रतन टाटा यांनी त्यांच्या कृतीतून पुन्हा एकदा असंख्य लोकांचे हृदय जिंकले आहे. समाजमाध्यमावर रतन टाटा यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मानाने म्हणजेच ‘भारतरत्न’ ने गौरविण्यात यावे यासाठी एक मोहीम सुरू करण्यात आली होती. ही मोहीम थांबवावी अशी नम्र विनंती रतन टाटा यांनी केली आहे.
टाटा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की “मी लोकांच्या भावनांचा सन्मान करतो. समाज माध्यमावरील एका वर्गाने मला सन्मानित केलं जावं यासाठी व्यक्त केलेल्या त्या भावना आहेत. मात्र मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण चालवलेली मोहीम आता थांबवावी. सन्मानापेक्षा मी स्वत:ला हिंदुस्थानी असल्याबद्दल भाग्यशाली समजतो आणि देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी हातभार लावत राहीन”
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आपल्या समाजसेवेमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन अनेकांना झालेले आहे. काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी त्यांच्या माजी कर्मचाऱ्याची विचारपूस करण्यासाठी त्याचे घर गाठले होते. कोणताही गाजावाजा न करता 83 वर्षीय रतन टाटा यांनी मुंबईहून थेट पुण्यातील फ्रेंड्स सोसायटी गाठली होती. त्यांच्या या भेटीचा फोटो शेजारील सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने ट्विटरवर टाकला होता, ज्यामुळे या भेटीबद्दल सगळ्यांना कळाले. ज्या कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा गेले होते तो गेली दोन वर्ष आजारी आहे. विशेष म्हणजे हा कर्मचारी आता रतन टाटा यांच्यासाठी काम करत नाही. तरीदेखील टाटा यांनी या कर्मचाऱ्यांची आठवण ठेवली आणि त्याची प्रत्यक्ष भेटून विचारपूस केली. यावेळी त्यांनी संपूर्ण कुटुंबाचा खर्च उचलण्यासोबत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील घेतली आहे.
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात टाटा समूहाचे अनेक कर्मचारी जखमी झाले होते. त्या वेळीही रतन टाटा तब्बल 80 कर्मचा-यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. इतकंच नाही तर त्यांना सर्वतोपरी मदत केली होती. कोरोना संकटात सरकारला कोटय़वधी रूपयांची सढळ हस्ते मदतदेखील केली होती.