दरम्यान, यासंदर्भात पुन्हा एकदा जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांच्याशी चर्चा करून लाल पिवळा ध्वज हटविण्याबाबत त्वरित निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा एकदा मोर्चा काढण्याचा निर्वानीचा इशारा देण्यात आला. तर येत्या काही दिवसात निर्णय घेऊन योग्य कारवाई करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी याबाबत माहिती दिली.
मान्चा नसतानाही काही कन्नडिगांनी केवळ मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगाव महानगरपालिके समोर कर्नाटक सरकारचा बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज फडकवला आहे. मराठी भाषिकांनी लोकशाही मार्गाने निवेदनाद्वारे यावर आक्षेप घेऊन सुद्धा कर्नाटक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याने अखेर म.म.एकिकरण समिती आणि शिवसेनेच्या वतीने आज हा लाल पिवळा ध्वज हटविण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार होता.
महाराष्ट्रातूनही हजारो शिवसैनिक मोर्चात सहभागी होणार असल्याने वातावरण तंग बनले होते. त्यामुळे सीमाभागात मराठी भाषिकांना दडपणाखाली ठेवणा-या बेळगाव प्रशासनाला मराठी भाषिकांसोबत बैठक घेणे भाग पडले. आज झालेल्या बैठकीत बेळगांव महापालिकेवर भगवा ध्वज फडकविण्याचा यापूर्वीच ठराव झाला असताना याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे. पण कर्नाटक राज्याचा म्हणून ज्या लाल-पिवळा ध्वजाची मान्यता न्यायालयानेही फेटाळली तो बेकायदेशीर ध्वज फडकविण्यास प्रशासनाने परवानगीकशी दिली? असा सवाल करत मराठी भाषिकांनी यांचे पुरावेच सादर करुन प्रशासनाला धारेवर धरले.
म.एकीकरण समिती, शिवसेना आणि युवा समितीने घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनासमोर पेचप्रसंग उभा राहिला. पण आगामी प्रजासत्ताक दिन आदी सुरक्षेचे कारण पुढे करून,याबाबत येत्या 27 जानेवारी रोजी पुन्हा बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देत तूर्तास मोर्चा रद्द करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. त्यामुळे सध्या पोलीस प्रशासना वरील वाढता ताण आणि ग्रामपंचायत आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आजचा नियोजित मोर्चा तुर्त रद्द केल्याची माहिती म. महाराष्ट्र एकिकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा एकदा यासंदर्भात निवेदन देणाार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसैनिकांचा गनिमी कावा; सीमाभागात भगवा फडकावला
बेळगांव महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेला कर्नाटकचा बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज हटविण्यासाठी सीमाभागात मराठी भाषिकांनी पुकारलेल्या आजच्या मोर्चासाठी कोल्हापूरातुन निघालेल्या शिवसैनिकांना पुणे बेंगलोर महामार्गावर कोगनोळी टोल नाक्यावर कानडी पोलिसांनी अडविले. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यास बंदी आदेश काढण्यात आले. तरीसुद्धा कानडी पोलिसांच्या नाकावर टिच्चून, गनिमी काव्याने बेळगावात घुसून कोनेवाडी गावात युवक मंडळाच्या फलका समोर कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पोवार यांच्यासह गडहिंग्लजचे सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, प्रभाकर खांडेकर आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भगवा ध्वज फडकवला. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या.