जम्मू-कश्मीरच्या सीमेवरील गनौरी टांटा गाव गेली अनेक वर्षे सुविधांपासून वंचित होते. या गावातील गावकऱयांना देशाच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत घरातील वीज कसली त्याचा पत्ताच नव्हता. डोडा जिह्याचे मराठमोळे जिल्हाधिकारी सागर डोईफोडे यांनी या गावाची दुर्गती बघितली आणि गावात वीज आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
त्यांनी हालचाली सुरू केल्यापासून 15 दिवसांतच हे गाव लखलखत्या विजेने उजळले आणि गावकऱयांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. जिल्हाधिकारी डोईफोडे यांना या गावचे गावकरी या सुधारणेबद्दल मोठा दुवा देत आहेत.
सागर डोईफोडे हे कश्मीरच्या डोडामध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डिसेंबर महिन्यात प्रशासनाच्या एका आढावा बैठकीत गनौरी टांटा गावात अद्याप वीज पोहोचली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. जिल्हाधिकारी डोईफोडे यांच्या पाठपुराव्यानंतर कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ही समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश दिले होते.
गावकऱयांनी केला एकच जल्लोष
कश्मीर खोऱयात सध्या बर्फ पडत असल्याने हाडे थिजवणारी कडाक्याची थंडी आहे. अशा बिकट परिस्थितीत डोईफोडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने अगदी वेगाने वायरिंगचे काम पूर्ण केले. रविवारी जिल्हाधिकारी डोईफोडे यांच्या उपस्थितीत गावात पहिला बल्ब पेटला तेव्हा डोईफोडे आणि त्यांच्या टीमचा जयजयकार करीत गनौरी टांटा गावच्या नागरिकांनी मोठा जल्लोष केला. कश्मीर सीमेवरील हे गाव दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इतकी वर्षे विजेपासून वंचित राहिले होते.
सौजन्य : दैनिक सामना