मुंबईसह राज्यात आज एकूण 358 लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱयासह फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात आल्या. याअगोदर अनेक ठिकाणी लसीकरण करताना साइड इफेक्ट झाल्याच्या तक्रारी इतर देशांत पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे हिंदुस्थानात विशेष करून महाराष्ट्रात होणाऱया लसीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
अनेकांना या लसीकरणाबाबत मनात साशंकता होती, तर काहींच्या मनात धाकधूक लागून राहिली होती. मात्र या सर्व प्रश्नांना आजच्या लसीकरणानंतर उत्तर मिळाले. लस टोचून घेणाऱया आरोग्य कर्मचाऱयांसह इतरांनी दाखविलेला उत्साह हा वाखणण्याजोगा होता. लस घेतल्यानंतर लसीकरणासाठी कोणतीही शंका न बाळगण्याचा सल्लाही अनेकांनी दिला.
ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आपल्या हितासाठी आहे. त्यामुळे मनात कोणतेही शंका न बाळगता बिनधास्त लसीकरणाला सामोरे जाण्याचा सल्लाही अनेकांनी यावेळी दिला.
नायरमध्ये डॉ. बिलनाझ देवडवाला यांना प्रथम मान
मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात पहिल्या लसीचा मान मसिना रुग्णालयाच्या डॉ. बिलनाझ देवडवाला यांना मिळाला. तर व्हीलचेअरवरून आलेल्या डॉ. आशा सिंगल आणि त्याचे पती डॉ. बी. एस. सिंगल यांनी सर्वांची मने जिंकली. केंद्रात असलेल्या सेल्फी पॉइंट येथे अनेक जणांनी सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड केला.
तर जसलोक रुग्णालयाचे एक्स रे टेक्निशियन अभय देसाई, नायर दंत रुग्णालयाच्या डेंटल हायजेनिस्ट सुचेता गायकवाड, मसिना रुग्णालयाच्या स्त्री रोगतज्ञ डॉ. गीता बलसारकर, सेंट जॉर्जेस रुग्णालयात आंतरवासिता करणाऱया डॉ. अश्विनी बडे, कुलाबा येथील अंगणवाडी प्रकल्पात काम करणाऱया निशा पवार आदींना कोविडची लस टोचण्यात आली.
सेल्फीसाठी धावपळ
लसीकरणाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. अखेर शनिवारी लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तर लस घेतल्याचा आनंद शेअर करण्यासाठी अनेकांनी सेल्फीसाठी धावपळ सुरू केल्याचे चित्र अनेक लसीकरण केंद्रात दिसून आले. तर दुसरीकडे फेसबुक, व्हॉटस्ऍप आणि इतर सोशल नेटवर्किंग साइटवर फक्त आजच्या लसीकरणाची चर्चा रंगली होती.
लसीबद्दल मनात शंका नको
आरोग्य अधिकारी या नात्याने पहिली लस टोचून घेतली आहे. लस घेऊन अर्धा तास उलटला आहे, मात्र कोणताही त्रास होत नाही. नागरिकांनी लसीबद्दल मनात शंका बाळगू नये. निःसंकोचपणे लसीकरण करून घ्यावे. लस सुरक्षित असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे कोणतीही शंका मनात बाळगू नका. – पवन साळवी, आरोग्य अधिकारी, पिंपरी-चिंचवड
नायर रुग्णालयातील लस टोचणी केंद्र हे सुसज्ज आहे. केंद्रात सर्व गोष्टी नियोजन करून करण्यात आल्या आहेत. – डॉ. शैलेश मोहिते, वैद्यकीय अधीक्षक/प्राध्यापक विभागप्रमुख, न्यायवैद्यक शास्त्र, नायर रुग्णालय.