“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं…” म्हणूनच कदाचित ते सिनेमाकर्त्यांसोबतच रसिकांनाही नेहमी भुरळ घालत असतं असं प्रेमाबद्दल म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आजच्या सोशल मीडियाच्या ‘हॅशटॅग’च्या जमान्यातील ‘प्रेम’ दाखवणारा ‘हॅशटॅग प्रेम’ हा नवीन मराठी सिनेमा लवकरच सिनेमागृहांत दाखल होणार आहे. निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शन या बॅनरखाली बनवलेला हा सिनेमा वितरक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल एंटरटेनमेंटच्या सहकार्याने रिलीज होतोय.
निर्माते अनिल पाटील यांनी या सिनेमाच्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलंय. राजेश जाधव यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. मनोरंजनासोबतच अंडरकरंट एक मेसेजही देणारा असल्यानं प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास निर्माते अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. यात मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यांची अनोखी केमिस्ट्री हे या सिनेमाचं आकर्षण ठरेल. कथा-पटकथा निखिल कटारे यांनी लिहिली असून प्रविण कुवर यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांचे असून कलादिग्दर्शन केशव ठाकूर यांचं आहे. राजा फडतरे यांची सिनेमॅटोग्राफी आहे.