महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषकांना डिवचण्यासाठी कानडी पोलिसांच्या वरदहस्ताने कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव महापालिकेसमोर उभारलेला बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज तातडीने हटवावा, अन्यथा 21 जानेवारीला भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीसह बेळगाव शिवसेनेकडून देण्यात आला आहे. याबाबत बेळगाव जिल्हाधिकारी हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले आहे.
यासंदर्भात आज अधिकाऱयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची घोर उपेक्षा करण्यात आली. त्यांना तब्बल तासभर ताटकळत ठेवण्यात आले. त्यामुळे कानडी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. लोकशाहीत आपले म्हणणे मांडण्याचा अधिकारसुद्धा नाही का, असा संतप्त सवाल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांनी केला. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.