पूर्व लडाखच्या सीमेवर हिंदुस्थान आणि चीनमधील तणाव कायम असतानाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी युद्धाचे संकेत दिले आहेत. सोमवारी त्यांनी आपल्या सैन्याला कुठल्याही क्षणी युद्धासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला. तसेच पूर्णवेळ युद्धाच्या तयारीवर भर देत प्रत्यक्ष युद्ध वातावरणात सराव आणखी वाढवा, अशा सूचनाही सैन्याला केल्या. त्यामुळे लडाखचा सीमावाद भडकण्याची चिन्हे आहेत.
जिनपिंग यांनी सोमवारी 2021 च्या सेंट्रल मिलिट्री कमिशनच्या पहिल्या आदेशावर स्वाक्षरी केली. याचवेळी चीनी सैन्याला युद्ध जिंकण्यासाठी क्षमता वाढवण्याचा आदेश दिला. 2012 मध्ये सेंट्रल मिलिट्री कमिशनचे चेअरमन बनल्यापासून ते अधूनमधून पीपुल्स लिबरेशन आर्मीला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश देत आहेत. सध्या चीनने पूर्व लडाखच्या सीमेवर हिंदुस्थानविरोधात पुरापती सुरू ठेवल्या आहेत. अशातच जिनपिंग यांनी सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. पीपुल्स लिबरेशन आर्मी कुठल्याही क्षणी कारवाईसाठी तयार असली पाहिजे. सैन्याने पूर्णवेळ युद्धजन्य परिस्थितीसाठी स्वतःला तयार केले पाहिजे. प्रशिक्षण सरावामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश केला पाहिजे, अशा अपेक्षा जिनपिंग यांनी सैन्य दलाकडून बाळगल्या आहेत.
सौजन्य : दैनिक सामना