अमेरिकेत व्हायरल झालेल्या एका ऑडिओ टेपमुळे राजकीय भूकंप झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीचे निकाल बदलण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचे या टेपमधील संभाषणावरून दिसून येत आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्यावर आरोप होत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणाची तुलना वॉटरगेट प्रकरणाशी करण्यात येत आहे.
जॉर्जियाचे सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि रिपब्लिकन नेते ब्राड रफेनस्पेर्गर यांना ट्रम्प यांनी फोन केला होता. ट्रम्प यांनी निवडणुकीचे निकाल बदलण्यासाठी ब्राड यांच्यावर दबाव टाकल्याचे या ऑडिओतून उघड झाले आहे. मी सांगत असलेले काम तुम्ही करा. मला फक्त 11,780 मतांची गरज आहे. आमच्याकडे असलेल्या मताधिक्य यापेक्षा जास्त आहे, असे ट्रम्प ब्राड यांना सांगत आहेत. ही ऑडिओ टेप व्हायरल झाल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
जॉर्जियाचे निवडणूक निकाल योग्य आहेत. आता त्यात काहीही बदल होऊ शकत नाही, असे ब्राड यांनी ट्रम्प यांना सांगितले. माझे काम तुम्ही केले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही ट्रम्प यांनी ब्राड यांना देत असल्याचे ऑडिओ टेपमधून स्पष्ट होत आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडन यांनी जॉर्जिया राज्यातून विजय मिळवला आहे.
सौजन्य : दैनिक सामना