कोरोना संकटामुळे बॉलिवुडला २०२० हे वर्ष तसं कठीणच गेलं. या वर्षात एकीकडे काही दिग्गजांनी अखेरचा श्वास घेतला. त्यातच कधी कंगनाच्या कावकावीमुळे तर कधी महानायकाच्या कोरोना पॉझिटीव्ह वृत्तामुळे बॉलिवुड थरथरले. सिनेमागृहेच बंद असल्यामुळे ओटीटी माध्यमांचे आयतेच फावले. पण त्यावरील चित्रपट बहुतांश आपटलेच… या वर्षातील याच घडामोडींचा हा धावता आढावा…
वर्षाच्या प्रारंभी आपण सगळ्यांना ‘हॅपी न्यू इयर’ अशा शुभेच्छा पाठवतो. बाकी सगळेही आपल्याला तशाच सदिच्छा देतात. २०२० वर्षाच्या सुरुवातीलाही आपण त्या शुभेच्छा दिल्या. पण हे वर्ष आता संपताना ते किती वाईट गेले याची सर्वांनाच कल्पना आहे. या वर्षात अनेक संकटांनी जगाला हादरविले. आपल्या देशात बॉलिवुडही याला अपवाद ठरले नाही. कोरोना संकटामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये सिनेमागृहे बंद ठेवावी लागली. यामुळे एकीकडे सिनेमागृहांच्या मालकांचे अतोनात नुकसान झाले, तर सिनेमा बनविणार्यांचेही हाल झाले. पण यातही काहीजणांचे मात्र चांगले फावले. लोक घरातच बसून राहिल्याने ओटीटी माध्यमांना ऊत आला. वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नवनवीन चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. लॉकडाऊनचा त्यांना फायदाच झाला. पण या वर्षभरात आणखीही काही महत्त्वाच्या घटना घडल्या.
सुशांतसिंहचे अकाली जाणे
‘काय पो चे’ स्टार सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे १४ जून रोजी उघड झाले आणि त्याचे चाहते चकित झाले. तो केवळ ३४ वर्षांचा होता. प्रसिद्ध स्टार होता. त्याने आपले जीवन का संपवले असेल याचा सगळेच विचार करायला लागले. म्हणूनच त्याच्या मृत्यूभोवती गूढतेचं वलय निर्माण झालं. लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगायला लागले. त्यातच त्याची गर्लप्रâेण्ड याच प्रकरणात रिया चक्रवर्ती अडकली. सुशांतमुळे तिला घबाड मिळाले असणार अशा वावड्या उठल्या. जणू तिनेच त्याचा खून केला असंही चित्र निर्माण करण्यात आलंय. सुशांतसिंह राजपूत अकाली निघून गेल्याने प्रेक्षक हळहळले. मात्र त्याच्या आत्महत्येचा ठपका बॉलिवुड इंडस्ट्रीवर ठेवण्यात आला आणि बॉलिवुडमधली कंपूशाही लोकांसमोर आली.
‘बॉलिवुड इज डर्टी पिक्चर’ अशा हेडलाईन्स झाल्या. त्याच धामधुमीत बॉलिवुडमधले अमली पदार्थांचे कनेक्शनही समोर आले. सुशांतच्या मृत्यूचा फायदा घेत याच काळात त्याचा अखेरचा ‘दिल बेचारा’ हा सिनेमाही लगोलग ओटीटी माध्यमांवर दाखल झाला. त्याच्या अखेरच्या दर्शनाने चाहते गदगदले. सुशांतच्या मृत्यूचा न्यायनिवाडा कधी व्हायचा तो होईलच, पण कोरोना संकटातच त्याचा हा मृत्यू चटका लावून गेला.
कंगनाची कावकाव
सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच अभिनेत्री कंगना राणौत बकबक करू लागली. एकीकडे रिया चक्रवर्तीला ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर कंगनाने अख्खे बॉलिवुडच ड्रग्स घेणारे आहे असे ट्विटरवर सांगत एका नव्याच मुद्याला वाचा फोडली.
बॉलिवुडमधले अनेक बडे अभिनेते आपापल्या घरात पार्ट्या करतात, तेव्हा कोकेनचा सर्रास वापर करतात असे तिचे म्हणणे होते. यामुळे दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या नट्यांचीही चौकशी झाली. कॉमेडियन भारती सिंह हिला तिच्या पतीसोबत याच प्रकरणात अटक झाली. मग कुठे महिनाभराने रिया चक्रवर्तीला जामीन मिळाला. कंगनाने बॉलिवुडमधल्या कंपूशाहीवर टिवटिव सुरू केली. त्यामुळे करण जोहर, जावेद अख्तर, करीना कपूर, आमीर खान वगैरेंशी तिने पंगा घेतला. सुशांतसिंह मृत्यू, बॉलिवुडमधली कंपूशाही यामुळे कंगनाला चांगलीच कावकाव करता आली.
‘तानाजी’ने इतिहास जागवला
अजय देवगणच्या ‘तानाजी : दी अनसंग वॉरियर’ या सिनेमामुळे कोरोना संकटातही बॉलिवुडमध्ये ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले. त्याच दरम्यान आयुष्मान खुराना, गजराज राव, नीना गुप्ता वगैरेंच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या सिनेमाने प्रेक्षकांच्या चेहर्यावर हसू उमटवले.
कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाही या चित्रपटाने दिलेल्या सामाजिक संदेशामुळे लोक थोडे रिलॅक्स झाले. सगळं व्यवस्थित होईल, आपण सगळेजण या संकटातून बाहेर पडू अशी शक्यता निर्माण झाली. आता लोक २०२१ या वर्षाकडे डोळे लावून बसले आहेत. निदान येत्या वर्षात तरी सगळं खरोखरच सुरळीत होवो अशीच त्यांची इच्छा आहे.
सोनू सूद ठरला नायक
दुसर्याला मदत करणारा, संकटातून वाचवणारा माणूस हीरो ठरतो. नायक होतो. चित्रपटांमध्ये खलनायकी करणारा अभिनेता सोनू सूदही वास्तवात नायक ठरला. कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, रोजगार गेला. त्यात आपलेच लोक आपल्या माणसाकडे पाठ फिरवायला लागले होते.
याच कठीण दिवसांत सोनू सूदने अनेक लोकांना मदत केली. परराज्यांतून आलेल्या मजुरांसाठी सोनू सूद मसीहा बनला. त्याने या मजुरांना आपापल्या राज्यात जायला मदत केली. भारत-चीन सीमेवर संघर्ष सुरू झाला, तेव्हा ‘सोनू सूदला सीमेवर पाठवा, तो परदेशी लोकांना बाहेर पाठवून देईल’, अशी कार्टुन्स येथे येऊ लागली.
ओटीटी माध्यमांचे फावले
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढायला लागला आणि देशात, राज्यात सरकारला लॉकडाऊन जाहीर करावे लागले. गर्दी करू नका, एकमेकांमध्ये अंतर राखा असे सांगत गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली. यातच सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद झाली. लोकही घरातच बसून राहिले. येत्या काही दिवसांत प्रदर्शनासाठी तयार असलेले नवनवे चित्रपट पेटीतच पडून राहिले. यातच आमीर खानचा ‘लालसिंह चढ्ढा’, रणवीर-दीपिकाचा ‘८३’ आणि अक्षयकुमारचा ‘सूर्यवंशी’ हे बडे चित्रपट रखडले. यामुळे बॉलिवुड इंडस्ट्रीचे जवळपास ३ हजार कोटींचे नुकसान झाले असे आकडेवारी सांगते. कोरोनाकाळातच दिवाळी, ईद, स्वातंत्र्यदिन, ख्रिसमस आणि अशाच मोठ्या सुट्ट्या येऊन गेल्या, पण बडे चित्रपट प्रदर्शित होऊच शकले नाहीत. ओटीटी माध्यमांनी यातच आपली पोळी भाजून घेतली. त्यांनी नवनव्या चित्रपटांना आपल्याकडे ओढायला सुरुवात केली. वेगवेगळ्या ओटीटी माध्यमांवर मोठमोठे चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. लॉकडाऊन जसजसे वाढत गेले, तसतशी ओटीटी माध्यमांमध्ये चुरसच निर्माण झाली. आपल्याकडे बडा चित्रपट कसा येईल याकडे प्रत्येक ओटीटी माध्यम पाहू लागले.
घरातून बाहेर पडताच येत नव्हते म्हणून लोक तासनतास टीव्हीला, मोबाइलला चिकटून बसले. याचा फायदा घेत ओटीटी माध्यमांनी नवनवे चित्रपट प्रदर्शित करून कमाई केली. याच काळात ‘सुटेबल बॉय’, ‘मिर्झापूर-२’, ‘पाताललोक’ अशा असंख्य वेबसिरीज तुफान प्रसिद्ध झाल्या. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम डिस्ने प्लस हॉटस्टार, सोनी लिव, झी-फाइव्ह, वूट… अशा कितीतरी ओटीटी सबस्क्रिप्शनने ओसंडून वाहू लागल्या. मुळात टीव्ही हा सिनेमाचा छोटा भाऊ मानला जात होता. पण अमिताभ बच्चन यांनी कोरोना संकटापूर्वीच ‘कौन बनेगा करोडपती’मुळे टीव्हीवरही कलाकारांना रग्गड कमाई करता येते हे दाखवून दिले होते. त्यात आता कोरोना संकटामुळे लोक टीव्ही आणि मोबाइलवरच राहायला लागले होते. याच काळात पहिला बडा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी माध्यमावर दाखल झाला तो बिग बींची प्रमुख भूमिका असलेला शूजित सरकार यांचा ‘गुलाबो सिताबो’. १२ जूनला तो स्ट्रीम झाला. त्यानंतर बड्या चित्रपटांचा ओघच ओटीटींवर सुरू झाला. यातच जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना : दी कारगिल गर्ल’, सुधीर मिश्रांचा ‘सीरियस मॅन’, अक्षयकुमारचा ‘लक्ष्मी’, अनुराग बसूंचा ‘लुडो’, भूमी पेडणेकरचा ‘दुर्गामती’ अशा चित्रपटांचा समावेश आहे.
ओटीटीवर अपयशच
ठरावीक रक्कम वर्षभरासाठी घेऊन ओटीटी माध्यमे वेगवेगळे चित्रपट आपल्या ग्राहकांना वर्षभर दाखवतात. लोकांना ते कधीही, कुठेही आणि आपल्या वेळेनुसार बघता येतात. असे असतानाही ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित झालेले बहुतांश चित्रपट अपयशीच झाल्याचे दिसून येतेय. हॉटस्टारवर ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला `लक्ष्मी’ ही सपशेल नाकारला. त्याआधीही ऑगस्ट महिन्यात आलेले ‘गुंजन सक्सेना’ (नेटफ्लिक्स १२ ऑगस्ट), ‘खुदा हाफिझ’ (हॉटस्टार १४ ऑगस्ट) आणि ‘सडक-२’ (हॉटस्टार २८ ऑगस्ट) या तीन चित्रपटांना अक्षरश: १ किंवा उणे-१ रेटिंग मिळाले. प्रेक्षकांनाही ते मुळीच आवडले नाहीत. आजही या चित्रपटांबद्दल आपल्याला काहीच जास्त माहिती नाही. त्यातली गाणी हिट झाली नाहीत की सिनेमा पाहिल्याचे कुणी अभिमानाने सांगताना दिसत नाही. जुलैमध्ये ‘दिल बेचारा’ (हॉटस्टार २४ जुलै), ‘शकुंतला देवी’ (अॅमेझॉन प्राईम ३० जुलै) आणि ‘लुटकेस’ (हॉटस्टार ३१ जुलै) प्रदर्शित झाले. पण ते कधी आले आणि कधी गेले कुणाला कळलेही नाही. या सिनेमांनी सपशेल धूळ चाखली. कोरोनाची दहशत सुरुवातीच्या दिवसांत होती, तेव्हा म्हणजे मार्च व एप्रिलमध्ये ‘जवानी जानेमन’, ‘शुभ मंगल जादा सावधान’, ‘हॅक्ड’, ‘जय मम्मी दी’, ‘पंगा’, ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’, ‘छपाक’, ‘गुड न्यूज’, ‘कमांडो-३’, ‘मर्दानी-२’, ‘दबंग-३’, ‘पानिपत’, ‘पती पत्नी और वो’, ‘बाला’ असे कितीतरी चित्रपट आले आणि नाहीसे झाले. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटांना जे यश मिळालं असतं ते ओटीटी माध्यमांवर मिळालं नाही असंच म्हणावं लागेल.