देशातील पहिली स्वयंचलित मेट्रो सोमवारपासून राजधानी दिल्लीत धावू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या विशेष मेट्रोचे उद्घाटन केले. 37 किमी लांब मजेंटा लाईनवर ही सेवा सुरू झाली आहे. ड्रायव्हरविना धावणाऱया या मेट्रोत सुरक्षेचे अर्थात अपघाताचे कसलेही टेन्शन नसेल. या सेवेमुळे प्रवाशांना मेट्रो सफरचा अनोखा आनंद मिळणार आहे.
नवीन मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वयंचलित असतील. यात मनुष्यबळाचा हस्तक्षेप कमीत कमी असेल, तसेच मानवी चुका होण्याचीही शक्यता नाही. मजेंटा लाईनवर सेवा सुरळीत सुरू राहिल्यानंतर मे-जूनपर्यंत पिंक लाईनवर शिव विहार ते मजलिस पार्पदरम्यान ही ड्रायव्हरलेस मेट्रो चालवली जाईल, असे दिल्ली मेट्रो रेल्वे का@र्पेरेशनचे कार्यकारी संचालक (कम्युनिकेशन) अनुज दयाल यांनी सांगितले. या मेट्रोमध्ये कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टम आहे. ही सिस्टम वायफायप्रमाणेच काम करते. या सिस्टममधून सिग्नल मिळाल्यानंतर मेट्रो सुरू होते. जगात 46 शहरांत स्वयंचलित मेट्रो सेवा सुरू आहे.
ट्रेनची तीन प्रमुख वैशिष्टय़े
– ट्रेनची सिस्टम अत्यंत सुरक्षित आहे. दोन ट्रेन एकाच ट्रकवर समोरासमोर येत असतील, तर एक ट्रेन विशिष्ट अंतरावर आपोआप थांबेल.
– सध्याच्या मेट्रो प्रवासात प्रवाशांना अधूनमधून झटके बसल्याचा अनुभव घ्यावा लागतो. स्वयंचलित मेट्रोत हा त्रास नसेल.
– ट्रेनमध्ये चढता-उतरताना प्रवाशांना पुठलाही त्रास वा गैरसोय नसेल.
2025 पर्यंत 25 हून अधिक शहरांत मेट्रो पोहोचणार
2025 पर्यंत 25 हून अधिक शहरांत मेट्रो पोहोचवू, या सेवेचा 1700 किमीपर्यंत विस्तार करण्याचा विचार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी जाहीर केले. पूर्वी केवळ घोषणा केल्या जात होत्या, परंतु आम्ही मेट्रोबाबत धोरण बनवले व रणनिती लागू केली, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रयत्नांतून दिल्लीत पहिली मेट्रो सुरू झाली. 2014 साली आमचे सरकार आले, त्यावेळी फक्त 5 शहरांत मेट्रो होती. सध्या 18 शहरांत ही सेवा आहे. आजच्या घडीला 25 लाख लोक रोज मेट्रोतून प्रवास करतात. हा ईज ऑफ लिव्हिंगचा पुरावा आहे. मेट्रोमुळे रस्त्यावरची वाहने कमी होऊन प्रदूषण घटले. देशातील चार मोठय़ा कंपन्या मेट्रो कोचवर काम करीत आहेत. यातून आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना मिळाली आहे, असेही ते म्हणाले.
सौजन्य- सामना