प्रबोधनकारांच्या कर्तृत्वाचा आणि विचारांचाही मागोवा घेताना त्यांची आजी बय हिला टाळून पुढे जाता येत नाही. तिनेच प्रबोधनकारांना सामाजिक सुधारणांचे संस्कार दिले आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाचेही. काळाच्या पुढे असणार्या अशा आयाआज्यांनीच महाराष्ट्राला खर्या अर्थाने घडवलं आहे. `माणूसघाणेपणा बरा नाही, हा जीवनातला महामंत्र बयने आम्हा सर्वांना शिकवला. अस्पृश्यतेच्या रूढीबद्दल तर तिला मनस्वी तिटकारा. अस्पृश्यता विध्वंसन काय किंवा हुंडा विध्वंसन काय, ज्या अनेक सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात मी आंदोलने केली, त्याचे बाळकडू लहानपणीच बयने आम्हाला चाटविलेले आहे. तो काही पुस्तकी ज्ञानाचा परिणाम नव्हे.’ (प्रबोधनकार ठाकरे, `माझी जीवनगाथा’)
रामचंद्र ऊर्फ भिकोबा धोडपकर या प्रबोधनकारांच्या आजोबांची गोष्ट `जीवनगाथे’त वाचताना आपल्याला अनेकदा आश्चर्य वाटतंच. एकीकडे देवीवरची अतीव श्रद्धा आणि दुसरीकडे देवाधर्माच्या नावाने चालणार्या ढोंगाविषयी टोकाचा तिटकारा, या दोन्ही गोष्टी तात्यांच्या दीर्घायुष्यात एकत्र नांदताना दिसतात. ते खरं तर ठाकरे घराण्याचंच स्वभाववैशिष्ट्य म्हणायला हवं. खर्याच्या बाजूने उभं राहण्याच्या आग्रहातून ही खासियत घडली असावी.
विशेषतः बयच्या जीवनात हा आग्रह ठळकपणे दिसतो. बय म्हणजे रामचंद्राची जानकी. प्रबोधनकारांची आजी – वडिलांची आई.
देवभक्तीमुळे तात्यांना विरक्त झाले होते. दोन मुलांचा जन्म झाल्यावर त्यांनी एक दिवस अचानक आपल्या बायकोच्या म्हणजे बयच्या पायावर डोकं ठेवलं. सांगितलं, `वंशाला दोन फळं आली, त्यामुळे आता आपण आमच्या मातोश्री.’ तेव्हापासून मरेस्तोवर तात्या आणि बय यांचे संबंध शेजार्यासारखे राहिले, असं प्रबोधनकारांनी लिहून ठेवलं आहे. त्यानंतर जवळपास शंभर – सव्वाशे वर्षांनी बाळासाहेबही त्यांच्या पत्नीला म्हणजे मीनाताईंना अगदी सहजपणे माँ म्हणू शकले. त्या सगळ्या शिवसैनिकांच्या माँसाहेब बनल्या. या संस्काराची मुळं इथे शोधता येतात.
प्रबोधनकारांचं व्यक्तिमत्त्व स्वतंत्र होतं. ते वेगवेगळ्या माणसांचे, घटनांचे आणि विचारांचे संस्कार पचवत स्वतःला घडवत गेले. काळानुसार बदलतही गेले. त्या प्रवासात दोघाजणींचा त्यांच्यावर पक्का प्रभाव दिसतो. एक त्यांची आजी बय आणि दुसरी त्यांची आई ताई. ठाकरेंच्या देव्हार्यात वीराचा आणि ब्राह्मणाचा टाक पूजला जातो खरा, पण ठाकरेंच्या खर्या कुलदेवता बय आणि ताईच म्हणायला हव्यात.
आमच्या घराण्यात प्रत्येकाने काहीना काही लोकसेवेचे व्रत घेऊन हयातभर त्याची पाठपुरवणी केली, असं प्रबोधनकार अभिमानाने सांगतात आणि त्यासाठी बयच्या सुईणपणाचा दाखला देतात. फक्त चिमूटभर साखर आणि नारळ मान म्हणून स्वीकारत बयने तब्बल साठ वर्षं अडलेल्या बायकांची बाळंतपणं केली. डॉक्टरांनाही जमलं नाही तर बयला बोलावत इतकं कौशल्य तिच्याकडे होतं. ती इतकी हुशार आणि बेडर होती की पनवेलचे फौजदार चोरांना पडकण्यासाठी तिचा सल्ला घेत. तिच्यामुळे प्रबोधनकारांना प्रवासाची आवड लागली.
वक्तृत्वकलेवरचं मराठीतलं पहिलं महत्त्वाचं पुस्तक लिहणारे प्रबोधनकार आपल्या आकर्षक भाषणशैलीचं श्रेयही तिलाच देतात. ठाकरेंच्या भाषणशैलीने गेल्या काही पिढ्या तरी महाराष्ट्राला भुरळ पाडली आहेच.
बयला अस्पृश्यतेबद्दल प्रचंड तिटकारा होता. त्या काळात दिवाळीत बालिप्रतिपदेला गावातल्या महार बायका स्वच्छ साडी नेसून आणि पितळी लामणदिवा लावून दारोदार पोस्त मागायला जायच्या. ‘इडापिडा टळो नि बळीचं राज येवो’, या त्यांच्या आरोळीची बोळवण इतर घरांत लांबून आणा पैसा टाकून केली जायची. पण बय त्यांचा सन्मान करायची. पडवीत रांगोळी काढून पाट मांडले यायचे. त्यावर ठाकरेंची मुलं बसायची. महार बायका त्यांना लामणदिव्यांनी ओवाळायच्या चक्क शिवून कुंकवाचा टिळा लावायच्या. मग छोटे ठाकरे या बायकांना ओवाळणी द्याचचे. हे कायस्थांच्या बंडखोर परंपरेतून आलेलं असू शकेलही आणि तरीही असं करणं काळाच्या फार पुढचं होतं. त्याला गावातली मंडळी नाकं मुरडायची. त्यांना बयचं उत्तर असायचं, `तीही आपल्यासारखी माणसंच ना?’
प्रबोधनकारांनी बयची सांगितलेली एक गोष्ट इथे नोंदवायलाच हवी. तेव्हा प्रबोधनकार आठ-नऊ वर्षांचे असतील. शनिवारी शाळा लवकर सुटल्यानंतर ते मित्रांसोबत घरी येत होते. तेवढ्यात लांबलचक झाडू घेऊन जाणार्या अन्या महाराची सावली त्यांच्यावर पडली. हे सोबतच्या मुलांनी पाहिलं. त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली, ठाकर्यावर महाराची सावली पडली. त्याला विटाळ झाला. त्याला शिवू नका. त्यामुळे भेदरलेल्या छोट्या केशवची वरात घराकडे निघाली. बय विरुपाक्षाच्या विहिरीवर पाणी भरत होती. तिला बघताच मुलं सांगू लागली, याला आंघोळ घाला.
त्यावर बय हसली आणि तिने अभ्यंकर नावाच्या मुलाला पुढे ओढून त्याची सावली प्रबोधनकारांवर पाडली. ती म्हणाली, ‘महाराची सावली पडली म्हणून माणूस महार होतो. आता ब्राह्मणाची सावली पडली म्हणून दादा आता ब्राह्मण झाला. कसला हा सावलीचा पाणचटपणा? खातेर्यात लोळणार्या गाढवाला शिवता, तेव्हा विटाळ नाही होत? माणसाच्या सावलीला विटाळ मानणं महापाप आहे. काही आंघोळ घालणार नाही.’
मुलांना ओरडून हाकलून देताना बयने प्रबोधनकारांनाही हा मूर्खपणा सोडून देण्याची तंबी दिली. तेव्हापासून एकट्या प्रबोधनकारांच्यात नाही तर सगळ्या ठाकरेंच्या डोक्यातलं शिवाशिवीचं भूत कायमचं निघून गेलेलं दिसतं. साने गुरुजींचा जन्म प्रबोधनकारांनंतर साधारण पंधरा वर्षांनी. ‘श्यामच्या आई’ची गोष्टही आपल्याला माहीत आहेच. तिने श्यामला एका महार म्हातारीला लाकडाची मोळी उचलण्यास मदत करायला लावली होती. त्यानंतर श्यामला आंघोळ घालून त्याच्या मनाची समजूतही घातली होती. अशा आयाआजांनीच महाराष्ट्राच्या डोक्यातली घाण काढणार्या समाजपुरुषांना घडवलंय.
पुढे प्रबोधनकार इंग्रजी पाचवीत असताना गंगाराम सुभेदार हे लष्करी पेन्शनर पनवेलमधे राहायला आले. ते महार जातीचे होते. त्यामुळे त्यांना सरकारने बेंच मॅजिस्ट्रेट बनवले तरी ते समाजासाठी अस्पृश्यच राहिले.
मात्र प्रबोधनकार त्याला अपवाद ठरले. ते त्यांच्या महारवाड्यातल्या घरी जाऊ लागले. चहा पिऊ लागले. सुभेदारही ठाकरेंच्या प्रभूआळीतल्या घरी येऊ लागले. प्रभूआळी ते महारवाडा हे अंतर प्रबोधनकारांनी तेव्हाच संपवलं होतं. आज त्यांची तिसरी पिढी या वाड्यांमधली जातींची नावंही काढून टाकतेय. गुलामगिरीच्या या खुणा संपवणं पुढच्या पिढ्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रबोधनकारांच्या या बंडखोरीमुळे तेव्हा पनवेल गावात चहाच्या कपातलं वादळ निर्माण झालं होतं. वरच्या जातीत मानली जाणारी गावातली काही प्रतिष्ठित मंडळी तक्रार घेऊन घरी आली. बयने त्यांना सुनावलं, ‘माणसाच्या हातचा चहा पिण्यात धर्म कसा बुडतो? चहाच्या कपात बुडण्याइतका आपला धर्म म्हणजे काय टोलेगंड्याची कवडी आहे वाटतं?’
१९१०मध्ये ठाकरेंचं बिर्हाड दादरला मिरांडाच्या चाळीत हललं. तिथेही बयने सुईणपणाची सेवा द्यायला सुरवात केली. त्यामुळे इथेही ती बाळंतपणं करण्यासाठी दादर, माटुंगा, माहीम, वरळी अशा भागात जाऊ लागली. तिने त्यात जातधर्म कधी पाहिला नव्हताच. त्यामुळे ती परिसरात खूपच लोकप्रिय झाली. मुंबईत आल्यावर सहाच वर्षांनी ऐंशीव्या वर्षी बयचं निधन झालं. तिच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना पांढरपेशा मित्र नातेवाईकांसोबतच वरळीचे कोळी, माहीमचे ख्रिश्चन आणि मुसलमानही गोळा झाले. ते म्हणू लागले, ‘ही तुमची आजी तशीच आमचीही. पण आम्ही तुमच्या जातधर्माचे नाही. तरीही आमची इच्छा आहे की या म्हातारीला खांदा द्यायचाय.’
प्रबोधनकार सांगतात आम्ही बयच्या अभेदी विचाराच्या शागिर्दीत वाढलेले असल्यामुळे त्याला लगेच होकार दिला आणि बयची सार्वजनिक प्रेतयात्रा निघाली. आपण लक्षात घ्यायला हवं की बयच्या या `अभेदी विचारां’नीच नकळत प्रबोधनकारांचं सर्वांना सोबत घेऊन जाणारं सर्वसमावेशक हिंदुत्वही घडवलं होतं. आमचा धर्म चहाच्या कपात बुडून संपण्याइतका कमजोर नाही, ही बयची शिकवण फार मोलाची आहे. तिचाच विस्तार प्रबोधनकारांनी `हिंदवी नीळकंठीझम’ म्हणून केलेला आहे. बयने प्रबोधनकारांना दिलेलं सेवेतून जन्माला आलेलं होतं. म्हणूनच ते व्यापक होतं आणि म्हणूनच ते आज काळालाही पुरून उरलं आहे. ते आज फक्त शिवसेनेलाच नाही तर महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरतं आहे.
(लेखक प्रबोधनकार डॉट कॉम चे संपादक आहेत.)