बाळासाहेबांशी माझा प्रत्यक्ष संबंध आला तो पत्रकार म्हणून. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी वैचारिक संघर्ष कैकदा झाला तरी त्यांच्या अपार मायेचा अनुभवही मी अनेकदा घेतला आहे. महानगर आणि आज दिनांकमध्ये असताना टोकाचा वैचारिक संघर्ष झाला. त्याची किंमतही चुकवावी लागली. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात एक प्रेमळ बाप कायम वसत आला होता. शिवसैनिकांनी त्याचा अनुभव घेतलाच आहे. पण शिवसेना विरोधकांनाही त्याचा अनुभव आलेला आहे.
मार्मिकचं नव्या रूपातलं पुनरागमन मनाला आनंद देणारं आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेल्या प्रबोधनचं हे शताब्दी वर्ष आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीत ज्या पाच शिल्पकारांचा समावेश होतो त्यात प्रबोधनकार ठाकरे महत्त्वाचे नेते होते. फुले, शाहू, आंबेडकर या परंपरेतले प्रबोधनकार एक सत्यशोधक होते. त्यामुळे प्रबोधनकारांशी विचारांचं नातं आहेच. प्रबोधनकारांचं समग्र वाङ्मय जवळपास मी सर्वच वाचलंय. तेही माझ्या चिंचणीजवळच्या वरोर या गावी. गावचं वाचनालय होतं. तिथे बहुतेक पुस्तकं उपलब्ध होती. प्रबोधनकारांचं मला आवडलेलं पुस्तक म्हणजे गाडगेबाबांचं त्यांनी लिहिलेलं चरित्र. त्यांच्या सत्यशोधकी फटकार्यातून त्यांनी लिहिलेले लेख आजही जणू तोंडपाठ आहेत. त्यांच्या अंबाबाईच्या नायट्यावरती आज दिनांकमध्ये मी लेखमाला लिहिली होती. मुंबईत दहिसरला राहायचो. तिथल्या एका वाचनालयात मार्मिक वाचायला मिळायचं. दर आठवड्याला मार्मिक वाचायला मी आवर्जून तिथे जायचो. त्यातली अनेक व्यंगचित्रं आजही मला आठवतात. बाळासाहेब ठाकरेंचं मार्मिक. ते नावही प्रबोधनकारांनी दिलेलं. जसा शिवसेना हा शब्दही प्रबोधनकारांचाच.
प्रबोधनकार शब्दप्रभू होते. अर्थात बाळासाहेबही. पण बाळासाहेबांच्या हाती कुंचला होता. दहा अग्रलेखांना जे जमणार नाही, ते बाळासाहेब ठाकरेंच्या एका व्यंगचित्रातून व्यक्त व्हायचं. जगातल्या आघाडीच्या व्यंगचित्रकारांपैकी ते एक होते. देशात त्याच्या बरोबरीचं नाव घ्यायचं तर आर. के. लक्ष्मण यांचंच घ्यावं लागेल. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्रात राजकारणातली व्यंग नेमकी दाखवली जात. ते बोचकारत पण कुणाला जखमी कधी करत नसत. ती त्यांच्या व्यंगचित्रांची खासियत होती. चित्रपट परीक्षण वाचण्याची गोडीसुद्धा मला मार्मिकमुळेच लागली. मार्मिकचं शेवटचं पान मी कधीच चुकवलं नाही.
आजची चित्रपट परीक्षणं आणि श्रीकांत ठाकरे यांनी लिहिलेली चित्रपट परीक्षणं वाचली की लक्षात येतं आताची परीक्षणं सिनेमाची सुपारी घेतल्यासारखी असतात.
बाळासाहेबांशी माझा प्रत्यक्ष संबंध आला तो पत्रकार म्हणून. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी वैचारिक संघर्ष कैकदा झाला तरी त्यांच्या अपार मायेचा अनुभवही मी अनेकदा घेतला आहे. महानगर आणि आज दिनांकमध्ये असताना टोकाचा वैचारिक संघर्ष झाला. त्याची किंमतही चुकवावी लागली. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात एक प्रेमळ बाप कायम वसत आला होता. शिवसैनिकांनी त्याचा अनुभव घेतलाच आहे. पण शिवसेना विरोधकांनाही त्याचा अनुभव आलेला आहे.
ज्यांच्याशी कायम किंवा अनेकदा राजकीय सामना करावा लागला त्या शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी बाळासाहेब ठाकरेंनी जपलेलं अतूट मैत्र ही दंतकथा नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अमीट वारसा आहे.
मृणालताई गोरे आणि अहिल्याताई रांगणेकर यांचं शिवसेनेशी कधी पटलं नाही. पण मृणालताई गोरे आणि अहिल्याताई रांगणेकर यांच्याबद्दलचं प्रेम आणि आदराचं नातं बाळासाहेबांनी कधी तुटू दिलं नाही. त्या दोघींच्या मृत्यूनंतरचे बाळासाहेबांनी लिहिलेले मृत्यूलेख वाचावेत. मृणाल गोरे आणि अहिल्या रांगणेकर यांच्या लढाईला तोड नसल्याचं बाळासाहेब ठाकरे सांगतात. ही तर झाली मोठी माणसं. पण बाळासाहेबांना कधी नामदेव ढसाळ यांच्यासोबत किंवा कधी एकट्याने मी अनेकदा भेटलो आहे. राजकारणातले, वर्तमानपत्रातले आणि घरातले बाळासाहेब किती वेगळे आहेत, याचं दर्शन त्यावेळी घडायचं.
कपिल देव फीचरसाठी मी त्यांची एकदा मुलाखत घेतली होती. ती हिंदीतून गेल्यामुळे देशभर गाजली. बाळासाहेबांनाही ती आवडली होती. एकदा पत्रकार मित्रांच्यासमवेत माझ्या पाठीवर हात मारत ते म्हणाले, ‘हा तुमच्यातला कपिल देव आहे.’ समाजवादी असल्यामुळे आमच्यासोबत येत नाही.’ अशी तक्रारही ते करायचे. महानगरमधून बाहेर पडल्यानंतर मी आज दिनांक सुरू केलं होतं. तो चांगलाच पॉप्युलर झाला होता. त्यावेळी कुणाचा विश्वास बसणार नाही, पण त्यांनी दादर लोकसभेचं तिकीट मला देऊ केलं होतं. आताचे मुख्यमंत्री म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी दोनदा फोन करून मला विचारणा केली होती. मी त्यांना एवढंच म्हणालो की, ‘मी कृतज्ञ आहे. पण वैचारिक मतभिन्नतेमुळे मला स्वीकारता येणार नाही.’
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर विधान परिषदेत त्यांना पाठिंबा देणारं भाषण मी केलं. तेव्हा आवर्जून मी म्हणालो होतो, ‘एका कृतज्ञतेपोटी हा पाठिंबा आहे. महात्मा गांधीचे प्राण नथुराम गोडसेने घेतले. पण त्याआधी गोडसेवाद्यांनी अनेक प्राणघातक हल्ले गांधीजींवर केले होते. गांधीजींवर अकोला येथे पहिला हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी महात्माजींचे प्राण प्रबोधनकार ठाकरे यांनी वाचवले होते. गांधीजींवरच्या हल्ल्याचं पुण्यातलं दुसरं कारस्थान प्रबोधनकारांनीच वेळीच भांडाफोड करून उधळून लावलं होतं. अगदी सुरवातीच्या काळात गोडसे अग्रणी नावाचं नियतकालिक सुरू करण्यासाठी म्हणून प्रबोधनकारांकडे लेख मागायला आला होता. प्रबोधनकारांनी त्याला लेखही दिला होता. पण त्यात गांधीजींचा उल्लेख महात्माजी असा होता.
गोडसे म्हणाला, ‘ठाकरे, गांधींना मिस्टर गांधी म्हणा. महात्माजी म्हणू नका. तुम्ही लेखात दुरूस्ती करा.’ प्रबोधनकार ठाकरे भडकले. आणि त्यांनी गोडसेला हाकलून दिलं. ‘माझ्या लेखातला मी कानामात्राही बदलत नाही.’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं. प्रबोधनकार ठाकरेंनी गांधीजींचे प्राण वाचवले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला मी हा पाठिंबा देतो आहे.’ असं मी म्हणालो होतो.
प्रबोधनकारांचं गांधीशी असलेलं हे नातं बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्त्वाचा कैवार घेतल्यानंतरही कधी नाकारलं नाही. गांधीजींना सनातनी हिंदुत्ववादी फाळणीसाठी जबाबदार धरतात. पण फाळणीला गांधी नव्हे जिनांच्या बरोबरीने नेहरू, पटेल जबाबदार होते, हे सांगण्याचं धारिष्ट्य बाळासाहेब ठाकरेच दाखवू शकत होते. आपलं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं नाही असं सांगायला शिवसेना प्रमुख कधी कचरले नाहीत. म्हणून आज उद्धव ठाकरे यांच्या सरकारशी सोयरीक करायला सोनियाजींची कॉंग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी कचरली नाही.
सरहद्द गांधी गेले त्यावेळचा बाळासाहेब ठाकरे यांचा मार्मिकमधला मृत्यूलेख आवर्जून वाचला पाहिजे. गफार खानांबद्दलचं प्रेम आणि आणि त्यांचं मोठेपण बाळासाहेबांनी ज्या शब्दात त्या मृत्यूलेखात वर्णन केलं होतं, ते आजही समोर लख्ख आहे.
या सगळ्या आठवणी आज यासाठी समोर आल्या की नव्या मार्मिकच्या नव्या अंकात गोडसेवाद्यांनी प्रचलित केलेल्या ‘गांधी वध’ या शब्दाचा झालेला प्रयोग. तो खटकला. गोडसेवाद्यांनी हा शब्द इतका पसरवलाय की कधी कधी गांधीवादीही तो शब्द वापरतात. तो वध नव्हता ती हत्या होती. विचारांचा खून होता. पण विचार मरत नसतात.
बाळासाहेब ठाकरेंच्याच नव्हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सामनात आणि संजय राऊतांच्या संपादकीयात सुद्धा गांधीजींबद्दलचं प्रेम आणि त्यांचं मोठेपण कधीही नाकारलं गेलेलं नाही. गांधींचं राम प्रेम आणि ठाकरेंचं राम प्रेम हे वेगळ्या जातकुळीतलं आहे. तो दोघांसाठी श्रद्धेचा विषय आहे. राजकारणातल्या बाजारातला बिकाऊ माल नाही.
कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. ते कुठेही संयम सोडत नाहीत आणि मर्यादा ओलांडत नाहीत. याचं नक्कीच अप्रूप वाटतं. अर्थात कसोटीचा काळ पुढे आहे. त्यासाठी त्यांना आणि मार्मिकच्या या नव्या रूपाला मनापासून शुभेच्छा!