
प्रबोधन, गोरेगाव आणि साप्ताहिक मार्मिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनोदी कथा स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावणारी कथा!
आता तुम्हांला मी जे सांगणार आहे त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही हे मला माहीत आहे. खरंतर ते खरंच घडलंय की एक स्वप्न आहे हे मलाच अजून कळलेलं नाहीये. घडलं ते काही इतिहासकाळात नाही, तर अगदी गेल्याच महिन्यात घडलंय.
त्याचं झालं असं की, त्या दिवशी रविवार होता. सकाळी मी सहज बाहेर पडलो तर लक्षात आलं की माझ्या पेनाची रिफिल संपली आहे. आता मी लेखक असलो तरी लिहिणं सुरू केलं तो काळ आता बदललाय. सुरुवातीला सगळं लेखन कागदावर लिहून करत असे. पण आता लॅपटॉप आले. लॅपटॉपवर टाइप करणं सोपं झालं. संपादकही हाती लिहिलेलं घेत नाहीत. त्यांना टाइप केलेलंच लागतं. त्यामुळे पेनाचा वापर तसा खूप कमी झाला. पण तरी नोकरीला जाताना ऑफिसच्या कामासाठी थोडंफार पेन लागतच. त्यामुळे संपलेली रिफिल आणायची होती. मी नेहमीच्या स्टेशनरीच्या दुकानाकडे मोर्चा वळवला. दुकान जरी नेहमीचं असलं, दुकानदार जरी नेहमीचा असला तरी सारखं सारखं त्याच्याकडे जाणं मी टाळतो. त्यालाही एक कारण आहे. स्टेशनरीच्या दुकानात तर्हेतर्हेची पेनं शोकेसमध्ये लावलेली असतात. ती मला खूप अस्वस्थ करतात. ती पेनं दिसली की मला राहावत नाही. सोनाराच्या दुकानात शोकेसमधले दागिने बघणार्या बायका आणि स्टेशनरीच्या दुकानातली पेनं पाहणारा मी, दोघांचीही अवस्था सारखीच. मध्यमवर्गीय बायकांना शोकेसमधले दागिने कितीही आवडले तरी त्यांना ते घेता येत नाहीत आणि तीच अवस्था छंद म्हणून लेखन करणार्या आमच्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी लेखकांची. महागडी पेनं आवडली तरी परवडत नाहीत. आमच्या दोघांचीही अगतिकता सारखीच.
हं! तर सांगत काय होतो की मी रिफिल घ्यायला नेहमीच्या दुकानात गेलो.
‘या लेखक, या! आज बर्याच दिवसांनी आमच्यावर मेहेरबानी केलीत. काय सेवा करू?’
हा दुकानदार मला नावानं हाक मारत नाही, ‘लेखक’ अशी हाक मारतो. पण मी काय लिहितो हे त्याला अजूनही माहीत नाही. माझं एक अक्षरही त्यानं वाचलेलं नाही. माझं सोडा, एकंदर साहित्यविश्वाशीच त्याचा फार पूर्वीच काडीमोड झालाय. पण तरीही मला तो लेखक म्हणतो.
‘अहो, आम्हाला काय लागणार? रिफिल संपली आहे ती घ्यायला आलोय. ह्या पेनात बसेल अशी रिफिल द्या.’ मी त्याला माझ्या खिशाचं पेन काढून दाखवलं.
‘रिफिलचं सोडा हो, तुम्हाला एक झकास पेनच दाखवतो.’
‘पेन झकास असेल हो पण ते परवडायलाही हवं ना. आम्ही हौशी लेखक. आणि दुसरं म्हणजे पेन कितीही झकास असलं तरी त्यामुळे अक्षर थोडंच बदलणार आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडंच राहाणार.’
‘ते खरं हो, पण पेन बघा तरी. माझ्याकडे आलं तेव्हाच मी ते खास तुमच्यासाठी बाजूला काढून ठेवलं.’
दुकानमालकाने आत जाऊन पेन आणलं. मी ते पाहिलं आणि उडालोच. चक्क परदेशी बनावटीचं पेयर कार्डिचं ते पेन होतं. क्षणभर मीही भान विसरून त्या पेनाकडे पाहात राहिलो.
‘काय! आहे की नाही मस्त?’
‘वादच नाही. पण दुकानात ठेवलेली गाड्यांची नवीन नवीन मॉडेल्स बाहेरून पाहताना आपल्याला किती जरी आवडली तरी खिशाला परवडायला नको का? मी एक साधा मराठी लेखक, तोही हौस म्हणून लिहिणारा. मला हे फॉरेनचं पेन कसं परवडेल?’
‘पण मी कुठे म्हणतोय, तुम्ही पेन विकत घ्या म्हणून!’
माझ्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह.
‘ही माझ्याकडून छोटीशी भेट समजा. आज इतकी वर्षं तुम्ही आमच्याकडून लागेल ती वस्तू नेताय. त्यात तुम्ही लेखक. मला वाचनाची आवड नसली तरी तुम्हाला मिळालेले पुरस्कार माहीत आहेत. हौशी म्हणत असलात तरी साहित्यक्षेत्रात तुमचं स्थान मला माहीत आहे. त्यामुळे तुमच्यासारखा लेखक माझ्या दुकानात येतो, त्याच्याशी माझा स्नेह आहे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळेच त्याची एक आठवण म्हणून हे पेन तुम्हाला माझ्याकडून.’
‘ते ठीक आहे हो पण… एवढं महागडं पेन म्हणजे… मला तर त्याची किंमत विचारायचंही धाडस होत नाहीये.’
‘आता पण नाही आणि परंतु नाही. काही बोलू नका. तुमच्या साहित्यसेवेला आमचा एवढा मान समजा.’
…आणि माझाही त्यांच्या आग्रहापुढे नाईलाज झाला. शेवटी खिशात पेन आणि मनात त्यांच्याबद्दल अपार आदर घेऊन मी घरी निघालो. आजच्या जमान्यात मराठी लेखकाला मान म्हणून पाकळीएवढंही धन देण्याचं सौजन्य बरेच संपादक, प्रकाशक दाखवत नाहीत. तिथे हे दुकानदार महाशय मला चक्क पेयर कार्डिचं परदेशी पेन देत होते, तेही चक्क फुकट. माझं मन अगदी भरून आलं.
त्याच आनंदात घरी निघालो तोच समोरून एक व्यक्ती येताना दिसली. चेहरा ओळखीचा वाटला. आणि एकदम आठवलं, अरे, ही तर शर्वरी!
शर्वरी आणि मी कॉलेजमध्ये क्लासमेट होतो. तिचं नाव हृदयावर कोरणार्यांपैकी मीही एक होतो. आणि अर्थातच ते कोरीव काम कालांतरानं फुकट गेलेल्यांतही. तिचं लग्न ठरल्याची बातमी समजली तेव्हा काही दिवस उसासे टाकत मीही इतरांसारखा फिरलो होतो. आणि आज इतक्या वर्षांनी तीच शर्वरी अशी अचानक समोरून येत होती, तिच्या नवर्याबरोबर.
‘काय रे, कसा आहेस? किती वर्षांनी भेटतो आहेस?’ अगदी रोज भेटत असल्यासारखी तिनं सुरुवात केली.
‘हे बरं आहे, लग्न करून तुम्हीच बेपत्ता व्हा आणि आता आम्हालाच विचारा.’
तिनं नवर्याशी ओळख करून दिली. इतक्या वर्षांनी पुन्हा मनात कुठेतरी काहीतरी करपल्यासारखं वाटलं.
‘वा! म्हणजे लेखक ते तुम्हीच का?’ तिच्या नवर्यापर्यंत माझी कीर्ती पोहोचली होती तर. पण पुढच्याच वाक्यानं शर्वरीनं विकेट काढली.
‘होय, आता लेखक म्हणून भाव खातोय. पण कॉलेजला असताना पेपर काही लिहीत नसे. ह्याचे कॉलेजचे सगळ्या वर्षांचे सगळे पेपर एकत्र केले तरी त्याच्या एका पुस्तकाएवढीही पानं भरणार नाहीत.’
‘असूदे गं; आज एवढे मोठे लेखक झाले आहेत ते. एवढी पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी. तेव्हा पेपर लिहिले नाहीत म्हणूनच आता पुस्तकं लिहीत आहेत.’ शेवटी पुरुषच पुरुषाला समजून घेतो हेच खरं.
‘ते जाऊदे, आता घरी कधी येतो आहेस ते सांग. आमच्या लग्नाला काही तू आला नाहीस, तुमच्यापैकी कोणीच आलं नाही. त्यानंतर कोणीच भेटलंही नाही. सगळेच अज्ञातवासात गेल्यासारखे गायब झालात. आज पहिला भेटतो आहेस तो तूच. तेव्हा आता घरी ये.’
आम्ही कोणीच तिच्या लग्नाला का गेलो नाही हे तिला काय सांगायचं?
‘येईन, एक दिवस नक्की येईन.’
‘तसं नको, कधी येणार ते नक्की कळवा. छान काहीतरी प्लॅन करू. माझ्या घरी येणारे तुम्ही पहिलेच लेखक असणार आहात. तो दिवस खास झाला पाहिजे,’ शर्वरीचा नवरा म्हणाला.
‘हो कळवूनच येईन.’
‘ते याल ते यालच पण आज मला तुमची सही हवी आहे,’ शर्वरीच्या नवर्यानं खिशातून एक छोटी डायरी काढली आणि माझ्यासमोर धरली.
‘खरंच लाजवताय मला.’
‘नाही हो, खरंच मला तुमची सही हवी आहे. तुमची बरीचशी पुस्तकं मी वाचली आहेत. माझ्या घरीही काही पुस्तकं आहेत तुमची. त्यावर तुमची सही घेणारच आहे तुम्ही घरी याल तेव्हा. पण आज निदान ह्या डायरीत तरी सही द्या, आजच्या दिवसाची आठवण म्हणून.’
त्याच्या एवढ्या आग्रहापुढे माझाही नाईलाज झाला. मी खिशातून पेन काढलं; तेच, काही वेळापूर्वी दुकानदारानं फुकट दिलेलं. त्याचं उद्घाटन असं कोणालातरी सही देऊन होणार याची कल्पनाच नव्हती. त्यानं सही करणार तेवढ्यात शर्वरीनं त्या पेनावर झडप घालून माझ्या हातातून ते काढून घेतलं.
‘हे पेन तुझं आहे? कुठे मिळालं तुला?’
पेनाचा सगळा इतिहास मी तिला सांगितला.
‘तू फसलास. हे पेन त्या दुकानदारानं तुला उगाच नाही फुकट दिलं. त्यानं स्वत:वरचं संकट गोड बोलून तुझ्या गळ्यात मारलं. आता ह्या पेनाचे प्रताप तुला भोगायला लागतील.’
‘म्हणजे? मी नाही समजलो.’
पण शर्वरीनं माझ्याकडे दुर्लक्ष करत विचारलं, ‘मला एक सांग, हे पेन दुकानदार तुला देत होता, तेव्हा तुला काही वेगळं, विचित्र जाणवलं?’
आणि मला एकदम आठवलं, तसं झालं होतं खरं. माझ्या डाव्या हाताच्या तळव्याला अचानक खाज सुटली होती. एक विचित्र प्रकारची खाज, काहीतरी आतून सळसळत यावं तसं झालं होतं. ती खाज आतून सळसळत आली होती, एखादी लाट यावी तशी. विचित्रच जाणीव होती ती.
‘पण… हे सगळं… तुला कसं समजलं?’
‘ते महत्त्वाचं नाहीये. पण शहाणा असलास तर माझं ऐक, हे पेन साधं नाहीये. हे पेन ज्याच्याकडे असेल त्याच्या घरी भांडणं होतील, त्याला सतत कसले ना कसले फटके बसतील, नुकसान सोसावं लागेल, आणखी काय काय होईल. त्या दुकानदारानं उगाच नाही तुला हे पेन दिलं. त्यालाही असे फटाके बसले असणार. म्हणूनच एवढं महाग पेन त्यानं तुला फुकट दिलं. त्यानं दिलं आणि तू घेतलंस. त्यानं त्याची ब्याद तुझ्या गळ्यात टाकली. आता तरी शहाणा हो, हे पेन लवकरात लवकर कोणालातरी देऊन टाक. ते पेन आपला रंग दाखवायला लागायच्या आत ते तुझ्याकडून नाहीसं कर.’
शर्वरीचं बोलणं मनात घोळवतच मी घरी आलो. घरी आलो तो सौभाग्यवती दारातच उभी.
‘कुठे गेला होतात इतका वेळ? कोपर्यावर जाऊन येतो म्हणून गेलात ते आता दोन तासांनी येताय. काय समजायचं माणसानं? वर मोबाईलही घरीच ठेवून गेला होतात.’
तिच्या चेहर्यावरच्या काळजीनं मलाही अपराध्यासारखं झालं. बाहेर काय काय घडलं ते तिला सगळं सांगितलं. दुकानातला प्रकार, ते पेन, शर्वरीचं भेटणं आणि त्यामुळे झालेला उशीर… सगळं सांगून टाकलं. आणि एकदम रंगचं पालटला तिचा.
‘मग बरोबर आहे, उशीर होणारच. कॉलेजची मैत्रीण भेटली ना. तीही इतक्या वर्षांनी. मग दोन काय चार तासही सहज गेले असते. घरी बायको वाट बघत असेल याची आठवण कशाला होईल?’

मला एकदम शर्वरीचे शब्द आठवले, घरी भांडणं होतील. मी एकदम सावध झालो. खरंच पेनाचा परिणाम की योगायोग? पण मग वाटलं, छे… हा बायकांचा स्वभावच आहे. नवर्याची मैत्रीण म्हणजे… त्यासाठी कोणत्या पेनाची काय गरज?
दिवसभर मी शर्वरीच्या बोलण्याचाच विचार करत होतो. तिचं बोलणं मनातून जात नव्हतं. दुसरीकडे सौ ची धुसफुस सुरू होतीच. ‘आता कुठे असणार बायकोशी बोलायला वेळ? मैत्रिणीचाच विचार असणार मनात. कानात तिचेच शब्द घुमत असणार.’
खरं होतं म्हणा ते एका अर्थी. पण शर्वरीचे कोणते शब्द कशा अर्थानं कानात घुमत होते ते कसं सांगणार होतो मी तिला? दुपारी जेवणाचं बोलावणं आलं तेही, गिळा एकदाचे, ह्या अर्थीच होतं. बाकी सगळा मूकपटच सुरू होता. दुपार कशीबशी सरली आणि संध्याकाळी चिरंजीव खेळून घरी आले ते लंगडतच.
‘काय झालं..?’ मी आणि सौ धावतच दरवाजात गेलो.
‘जिन्यात पडलो.’
‘असा कसा पडलास? बघून नाही का जिना चढता येत? एक पायरी सोडून धावत चढला असशील. मग पायरी चुकून पडायला होणारच.’
‘नाही गं आई. जिना चढताना नाही पडलो. जिन्याच्या खालीच पडलो. मी आणि राहुल दोघे बरोबरच आलो खेळून. खाली गप्पा मारत उभे होतो आम्ही. मग तो घरी गेला आणि मी जिना चढायला वळणार, तोच अचानक पाय घसरला. काय झालं कळलंच नाही. कोणीतरी ढकलून देताय असं वाटलं. उभ्या उभ्याच पडलो.’
कोणीतरी ढकललं? मी विचारात पडलो. कसं शक्य आहे हे?
…आणि एकदम मला जाणवलं, माझ्या डाव्या हाताला खाज सुटतेय… तीच विचित्र खाज… आतून सळसळत आल्यासारखी… सकाळी दुकानात पेन घेताना आली होती तशीच… आणि मी ठरवलं, ते पेन आता घरात ठेवायचं नाही. आधी सौशी भांडण, आता चिरंजीवांचं पडणं… हे दोन प्रसंग बोलाफुलाला गाठ असतीलही कदाचित. पण अशा गाठी मला झेपणार नव्हत्या.
ती रात्र तशीच तळमळून काढली, पेन कसं नाहीसं करायचं ह्याचा विचार करत. दुसर्या दिवशी सोमवार, ऑफिसला जायची घाई, घरात धुसफूस चालूच. थोडंसं दुर्लक्ष करत सगळं आवरून मी घर सोडलं. डोक्यात पेनाचेच विचार. त्याच विचारात ट्रेनच्या गर्दीत स्वत:ला झोकून दिलं. वाटलं ट्रेनच्या गर्दीत पेन खिशातून पडेल, नाहीतर कोणीतरी काढून तरी घेईल. पण तसं काहीही झालं नाही. ट्रेनमधून उतरलो तेव्हा पेन खिशाला तसंच सुखरूप होतं. धावतपळत ऑफिस गाठलं. थंब मशीनवर अंगठा चेपून वळणार तोच पाठून गोखले आला. आला तोच ट्रेनच्या गर्दीला शिव्या देत.
‘काय रे, काय झालं?’
‘काय होणार? गर्दीत खिशातलं पेन मारलं कोणीतरी. गेल्याच आठवड्यात घेतलं होतं. कधी नव्हे ते थोडं महाग पेन घेण्याचा मोह झाला होता. आता बसा बोंबलत. आम्हीच गाढव, महागडं पेन बॅगेत ठेऊन आलो असतो तर बिघडलं असतं? पण नाही, निघालो आम्ही खिशाला लावून, जगाला दाखवत. आता आली ना पंचाईत? आज आता काम कसं करणार?’ मला क्षणभर गोखलेच्या नशिबाचा हेवा वाटला. आणि एकदम कल्पना सुचली. खिशातलं पेन काढून गोखलेच्या हातावर ठेवलं.
‘हे घे, तुझ्याकडे आज पेन नाहीये ना, माझ्याकडे दोन आहेत. लागलं तर ठेव तुझ्याकडे.’
गोखले त्या इंपोर्टेड पेनाकडे डोळे फाडून बघत होता. मी मनातून खूश झालो. ठरवलं, आता तीन-चार दिवस गोखलेच्या समोर जायचंच नाही. मी त्याला पेन दिलाय हे माझ्या लक्षात आहे, असं दाखवायचच नाही. तो कशाला मग एवढं इंपोर्टेड पेन परत करतोय! मनातल्या मनात खूश होत मी कामाला लागलो… आणि तेवढ्यात माझं लक्ष गेलं… गोखले डाव्या हाताचा तळवा खाजवत होता.
संध्याकाळी मी गोखलेच्या नकळत ऑफिसमधून निघालो. स्टेशनवर येतोय तोच पाठून हाक आली. वळून पाहिलं तर गोखले हजर.
‘अरे तुझं पेन माझ्याकडेच राहिलं.’
‘राहूदे रे, तू कुठे पळून जातो आहेस. उद्या परत यायचच आहे आपल्याला ऑफिसला.’ मनातल्या मनात मी चरफडत होतो.
‘तसं नाही. तुम्ही लेखक, ऑफिस संपलं की आमचा पेनाशी संबंध संपला. तुमचं तसं नाही, घरी जाऊन तू काही लिहिणार असशील. तेव्हा तुला लागलं तर. महागडं पेन गेल्याचं दु:ख आजच सकाळी मी भोगलंय. तेव्हा म्हटलं ज्याची दौलत त्याला देऊन टाकलेली बरी.’
‘दौलत कसली त्यात. राहिलं असतं तरी काही फरक पडत नव्हता. हल्ली पेनानं कागदावर कोण लिहितो? ते दिवस गेले. आता सगळं लिहितो ते लॅपटॉपवर. कागद झाले इतिहासजमा. पेनाचीही तीच गत आहे.’
‘तसं नाही रे, आहे हेच धड सांभाळता येत नाहीये. त्यात दुसर्याचे ऋण वाढवा कशाला?’ त्याचा चेहरा खूप निराश वाटला.
‘का रे, काय झालं?’
‘काय सांगू, आज साहेबांनी मेमो दिला.’
‘कशाबद्दल?’
‘गेल्या आठवड्यात रजेवर होतो ना. तो अर्ज मी दिला नाही म्हणून.’
‘मग बरोबर आहे लेका. रजा घेऊन मजा करा. हक्काची रजा असली म्हणून काय झालं? ऑफिसला कळवायला नको? मग मेमो मिळणारच.’
‘तसं नाही रे. मी सिक लीव्ह घेतली होती आणि खरंच सिक होतो. गेल्या सोमवारचीच गोष्ट. सगळं आवरून मी
ऑफिसला यायला निघालो तोच चक्कर आली. थोडा वेळ वाट पाहिली. म्हटलं, थांबली तर निदान लेट तरी ऑफिसला जाता येईल. पण कसलं काय, चक्कर वाढायलाच लागली. डॉक्टरांकडे गेलो तर ब्लड प्रेशर वाढलेलं. मग काय, इलाज नव्हता. लगेच घरी आलो आणि दुपारी ऑफिसच्या मेल
अॅड्रेसवर मेल टाकली. पण दुर्दैव बघ, ती मेल पोचलीच नाही. अॅड्रेस चुकीचा म्हणून बाऊन्स झाली. आणि ती पोचली असेल ह्या विचारात मी ही गाफिल राहिलो. दुपारी साहेबांनी केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि विचारलं. मी म्हटलं अर्ज मेल केलाय म्हणून. शेवटी मोबाइलवर मेल बॉक्स उघडून पाहिला तर मेल बाऊन्स होऊन परत आलेली. मग काय, साहेबांचं ऐकून घ्यावं लागलं. वर म्हणतो कसा, जास्त बोलून चालणार नाही, तुमचं बीपी वाढेल लगेच. काय करणार?’
सकाळी पेन घेतल्यावर गोखले हात का खाजवत होता त्याचा उलगडा आत्ता मला झाला.
‘चल, निघतो. नेहमीची ट्रेन चुकली तर घरी पोचायला उशीर होईल. ह्या बीपी प्रकरणापासून बायको जास्तच काळजी करते. तुझं पेन द्यायचं राहिलं म्हणून थांबवलं तुला.’
माझा खिशाला डोकेदुखी लावून स्वत: निर्धास्त होऊन गोखले निघून गेला. ती रात्र मी तशीच जागून काढली. घराचं वातावरण तसंच होतं.
दुसर्या दिवशी ऑफिसला जायला निघालो तर दारात कुलकर्णी हजर. हा माणूस म्हणजे मला कोडं आहे. मला एकट्यालाच नाही, अख्ख्या कॉलनीला कोडं आहे. लौकिक अर्थानं कुलकर्णी बँकेत नोकरी करतो. पण ते सोडून इतरच सगळ्या गोष्टी करताना तो दिसतो. त्याचा एकमेव आवडता उद्योग म्हणजे स्वयंसेवा. कॉलनीत कोणताही कार्यक्रम ठरला की हा स्वयंसेवक म्हणून पहिला हजर. कॉलनीतच नाही तर आसपास कुठेही कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असला की कुलकर्णी तिथे हजर होतो आणि घरचा सत्यनारायण असल्यासारखा राबतो. साहित्यातलं बरंच काही आपल्याला समजतं असा त्याचा समज आहे. साहित्यातलंच काय, एकूणच त्याला कशातलं किती समजतं हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. पण साहित्यिक, सांगितिक, सांस्कृतिक कार्यक्रमातलं आपल्याला खूप काही समजतं आणि त्यामुळे अशा कार्यक्रमांना जाणं आपलं कर्तव्य आहे असं तो मनापासून मानतो. तर असा हा कुलकर्णी सकाळी सकाळी मांजरासारखा आडवा आला.
‘काय लेखक, निघालात का ऑफिसला?’
‘तर, तुमच्यासारखा रिकामा थोडाच आहे.’
‘करा लेको टिंगल तुम्ही. पण लक्षात ठेवा, आम्ही आहोत म्हणून साहित्य टिकून आहे, तुमच्यासारखे लेखक टिकून आहेत.’
‘अगदी मान्य. पण आज आमच्यावर काय उपकार करण्यासाठी आगमन झालं आहे ते सांगा.’
‘सांगतो. आधी हजार रुपये काढ.’
‘काय…..?’ मी उडालोच.
‘अरे पुढच्या आठवड्यात इथे वैभव जोशींच्या कवितांचा कार्यक्रम होणार आहे. त्याचं तिकीट आहे.’
‘ते ठीक आहे रे, पण एकदम हजार रुपये म्हणजे…’
‘ते तर द्यावेच लागणार तुला. अरे पहिल्या रांगेचं बसण्याची संधी देतोय मी तुला. आणि असं बघ, वैभव जोशी येणार म्हटल्यावर तुझ्यासारखा लेखक सगळ्यात पुढे नको का? अरे आपण दोघे तर पाहिजेच समोर, नाहीतर त्याच्या कवितेला दाद कोण देणार?’
‘ते ठीक आहे कुलकर्णी, पण कॅलेंडर पाहिलंस का? आजची तारीख काय? चार दिवस उरलेत महिना संपायला. महिनाअखेरीला हजार रुपयांची चैन परवडेल का?’
‘घ्या, ह्याला म्हणतात नशीब. लोकं तुमच्यासाठी सोन्याच्या ग्लासात पाणी घेऊन उभे आहेत तरी तुम्ही तुमचा हात स्टीलच्या ग्लासाकडेच जाणार. अरे, आपल्या कॉलनीच्या प्रेस्टिजचा सवाल आहे. आपल्या दोघांशिवाय कोणाला काय कळतंय कवितेतलं! तेव्हा हे तिकीट तुला घ्यावंच लागेल.’ कुलकर्णीपुढे इलाज नव्हता. गपचूप पाचशेच्या दोन नोटा काढून त्याला दिल्या.
‘जरा तुझं पेन दे रे. रिसिट बुक घेतलं पण पेन घ्यायला विसरलो.’
हजार रुपये गेल्याचं झालेलं दु:ख मी क्षणात विसरलो आणि खिशातलं इंपोर्टेड पेन कुलकर्णीच्या हातात ठेवलं. एवढं महागडं पेन पाहून त्याचे डोळे विस्फारले.
‘वा! बरं झालं पेन विसरलो ते. आमची पेनं म्हणजे काय विचारता. दहा रुपयांची पेनं ती. लिहायला कागदावर टेकवली की मागून रिफिल उडते. बरं, आता हे पेन आजच्या दिवस माझ्याकडे राहूदे. तू लेखक, तुझ्याकडे अशी दहा पेनं असतील. अजून कॉलनीत बरंच फिरायचंय तिकीटं वाटत. संध्याकाळी देतो तुझं पेन परत.’
‘सावकाश, काही घाई नाही. ठेव तुझ्याकडेच.’
कुलकर्णी गेला आणि मी हळूच दारातून डोकावून बघितलं. जिन्यापर्यंत जाऊन कुलकर्णी थांबला आणि डावा हात कठड्यावर ठेवून जोरजोरात घासू लागला. मी गालातल्या गालात हसून घरात आलो.
संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो तो माझ्याआधी कुलकर्णी कॉलनीच्या गेटजवळ उभा, माझीच वाट बघत. पडलेला चेहरा, हताश नजर….. मला काही कळेना.
‘काय रे, काय झालं? असा का उभा आहेस?’
‘काय सांगू! तुझ्याकडून सकाळी पैसे नेले. कॉलनीत आणखी काही तिकिटं खपली. त्या सगळ्या भानगडीत उशीर झाला. बँकेत जायचं म्हणून घाईघाईत निघालो. निघताना विकलेल्या तिकीटांचे पैसे घरात काढून ठेवायला विसरलो. ते खिशात तसेच राहिले. आणि ट्रेनमध्ये कोणीतरी खिसा कापला. साडेसात हजारांची कॅश होती. सगळी गेली. आता आला ना खड्डा. इतकी वर्षे ट्रेनने प्रवास करतोय, रिटायरमेन्ट जवळ आली पण कधी खिसा कापला गेला नाही. आजच नेमकं असं व्हावं? तेही लोकांचे पैसे माझ्याकडे असताना! आता भरून द्यायला हवेत पैसे.’
मी काय ते समजलो. सकाळी जिन्यात हात घासणारा कुलकर्णी डोळ्यासमोर आला.
‘बरं, मी थांबलोय ते दुसर्याच कारणानं. हे तुझं पेन घे. आलाय तो खड्डा आधीच खूप आहे. आणखी हे हरवलं तर ह्याचे पैसे कुठून आणू? चांगलं इंपोर्टेड आहे. किंमत काय थोडी असेल!’
कुलकर्णी पेन देऊन गेला आणि मी पुन्हा अस्वस्थ झालो.
दोन दिवस तसेच गेले. अस्वस्थपणा वाढत होता. घरातला अबोलाही तसाच होता.
…आणि एक दिवस मला कल्पना सुचली. नवीन महिना सुरू झाला होता. सामानाची यादी वाण्याकडे द्यायची मी ठरवली. घरातलं काम केलं म्हणून सौ खूश होणार होती. तडक वाण्याच्या दुकानात गेलो. वाण्याकडून कागद घेतला. खिशात अर्थातच ते पेन होतच. दुकानात बर्यापैकी गर्दी होती. यादी मीच लिहिली आणि ती वाण्याला दिली. गर्दीचा फायदा घेत पेन विसरल्याचं नाटक वâरत तिथेच काउंटरवर ठेवलं आणि घरी परत आलो. दुकानातून बाहेर पडताना हळूच पाहिलं, वाणी डावा तळवा खाजवत होता.
संध्याकाळी दुकानातला माणूस सामान घेऊन घरी आला. माझ्या छातीत पुन्हा धडधडायला लागलं. न जाणो वाण्यानं त्याच्याबरोबर पेन पाठवलं असलं तर! मी डाव्या हाताचा तळवा चाचपून पाहिला, पण सगळं ठीकठाक होतं. दुकानाचा माणूस सामान ठेवून निघून गेला. दोन दिवस तसेच गेले. एकीकडे डोकं शांत झालं होतं. दुसरीकडे उगाच डोक्याला भुंगा लागून राहिला होता, वाण्याला त्या पेनानं इंगा दाखवला असेल का, हे जाणून घेतल्याशिवाय स्वस्थही बसवत नव्हतं. शेवटी काहीतरी काम काढून पुन्हा दुकानात गेलो. तिथे पाहतो तर वेगळच वातावरण. पोलिस आले होते. काही पोलिसांची आत बाहेर धावपळ सुरू होती. एक
व्हॅन बाहेर उभी होती. आजूबाजूचे दुकानदार, तिथून जाणारी लोकं अलिप्तपणे ती धावपळ पाहात होते. मी सावधपणे पुढे गेलो. वाणी त्याच्या नेहमीच्या खुर्चीत निराश होऊन बसला होता.
‘काय हो, काय झालं?’ मी त्याला विचारलं.
‘काय सांगू साहेब, काल रात्री चोरांनी दुकान फोडलं.’
‘काय सांगता? खूप नुकसान झालं का? काय काय गेलं चोरीला?’
‘काल रात्री दुकान बंद करून मी आमच्या एका नातेवाईकाकडे जाणार होतो. म्हणून दिवसभराची
कॅश दुकानातच ठेऊन गेलो. एरवी रोज कॅश मी घरी नेतो. दुकानात काही ठेवत नाही. काल पहिल्यांदाच कॅश दुकानात ठेवली आणि हा प्रकार घडला.’
मी काय ते समजलो. वाण्याचं सांत्वन करून मी काढता पाय घेतला.
…आणि तेवढ्यात डाव्या तळहाताला पुन्हा ती परिचित खाज सुटली. मी हादरलो. पाठोपाठ वाण्याची हाक आलीच.
‘साहेब, एक मिनिट थांबा. परवा तुम्ही सामानाची यादी दिलीत तेव्हा तुमचं पेन इथेच विसरलात. हे घ्या.’ त्यानं टेबलाच्या खणातून पेन काढलं, तेच ते पेन.
‘काय नशीब आहे बघा, काल इथे गल्ल्यात दोनच वस्तू होत्या. रोजची कॅश. ती तर चोरीला गेली. तुमचं पेन तेवढं राहिलं. हे घ्या.’
काय बोलणार मी ह्यावर? आपल्याच हातांनी आपल्या थोबाडात मारावी असं वाटलं. काय गरज होती का मला मुद्दाम वाण्याकडे जाण्याची आज? स्वत:वर चरफडत घरी आलो आणि ठरवलं, आपणच आता ह्या पेनाची विल्हेवाट लावायची, कोणाच्याही गळ्यात आता ते मारायचा प्रयत्न करायचा नाही. तसाच उठून गॅलरीत गेलो आणि ते पेन समोरच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये फेकून दिलं. त्या रात्री मी पुन्हा शांत झोपलो. आता कोणी ते पेन पुन्हा परत आणून देईल ही भीतीच नव्हती.
पण दुसर्या दिवशी दुपारपासून हात खाजतोय असं सारखं वाटायला लागलं. पण मी दुर्लक्ष केलं. वाटलं, भास असावा.फेकून दिलेलं पेन कोण परत आणून देईल? संध्याकाळी चिरंजीव खेळून आले तर त्यांच्या हातात तेच पेन.
‘बाबा, आज आम्ही सगळे संध्याकाळी समोरच्या बिल्डिंगमध्ये खेळायला गेलो होतो. क्रिकेट खेळताना बॉल झाडात गेला म्हणून मी तो आणायला गेलो तर तिथे तुमचं पेन पडलेलं दिसलं. मी लगेच ओळखलं ते आणि घेऊन आलो. पण बाबा, तुमचं पेन तिकडे कसं गेलं?’
आता काय सांगणार मी त्याला? डाव्या तळहाताची खाज वाढत होती. ती असह्य झाली आणि मी बसलो होतो त्या पलंगाच्या दांडीवर हात ठेऊन जोरजोरात घासायला सुरुवात केली. सौ आणि चिरंजीव दोघेही चमत्कारिक नजरेनं माझ्याकडे पाहात होते.
emailed : [email protected]
