
सकाळी कार्यालयात पोहोचल्यावर एखाद्या कर्मचार्याने संगणक सुरू केला, ई-मेल तपासले आणि दिवसाचे काम सुरू केले, असे दृश्य आता फारसे वेगळे वाटत नाही. मात्र त्या संगणकात आता एक नवा सहकारीही आला आहे. तो कागदपत्रांचा सारांश तयार करतो, आकडे तपासतो, पत्राचा मसुदा लिहितो, चित्रे बनवतो आणि काही क्षणांत माहितीचे विश्लेषण करतो. या सहकार्याला सुट्टी लागत नाही, तो थकत नाही आणि त्याला पगारही द्यावा लागत नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे— उद्या हा सहकारी आपलीच नोकरी घेणार का? कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेग पाहता ही भीती अनाठायी नाही; पण संपूर्ण चित्र पाहिले तर उत्तर इतके सरळ नाही.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे माणसासारखे विचार करणारे यंत्र, अशी सोपी व्याख्या केली जाते. प्रत्यक्षात आजच्या बहुतांश प्रणाली मोठ्या प्रमाणातील माहितीतील नमुने ओळखून त्यावरून उत्तर, अंदाज किंवा मजकूर तयार करतात. जनरेटिव्ह एआयमुळे ही क्षमता सर्वसामान्यांच्या हातात आली आहे. पूर्वी संगणकाला ठरावीक सूचना दिल्याशिवाय तो काम करू शकत नसे; आता साध्या भाषेत प्रश्न विचारला तरी तो अहवालाचा मसुदा, भाषांतर, संगणकीय सूचना किंवा चित्र तयार करू शकतो. त्यामुळे कार्यालयीन काम, ग्राहकसेवा, जाहिरात, माध्यमे, शिक्षण, बँकिंग आणि माहिती-तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांतील कामांची पद्धत बदलू लागली आहे. मात्र एखादे काम यंत्र करू शकते याचा अर्थ त्या कामाशी संबंधित संपूर्ण नोकरी नाहीशी होईल, असा होत नाही. एका नोकरीत अनेक प्रकारची कामे असतात. त्यांपैकी काही यंत्राकडे जातात, तर काहींसाठी माणसाचा अनुभव, निर्णयक्षमता आणि संवाद आवश्यक राहतो.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) मे २०२५मध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार जगातील प्रत्येक चार कामगारांपैकी साधारण एक जण अशा व्यवसायात काम करतो, ज्यातील काही कामांवर जनरेटिव्ह एआयचा परिणाम होऊ शकतो. मात्र संघटनेचा महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की बहुतेक नोकर्या पूर्णपणे संपण्यापेक्षा त्यांचे स्वरूप बदलण्याची शक्यता अधिक आहे. या अभ्यासात जवळपास तीस हजार कामांचा तपशीलवार विचार करण्यात आला. मजकूर, आवाज, चित्र आणि व्हिडिओ तयार करण्याची एआयची क्षमता वाढल्यामुळे माध्यमे आणि इंटरनेटशी संबंधित काही कामांवरील परिणामाची शक्यता वाढली आहे. तरीही प्रत्येक व्यवसायातील सर्व कामे स्वयंचलित होतील असे नाही. एखाद्या पत्रकाराला माहितीचा प्राथमिक आढावा घेण्यासाठी एआय मदत करू शकते; पण बातमीची सत्यता तपासणे, स्रोताशी बोलणे, स्थानिक संदर्भ समजून घेणे आणि सार्वजनिक हिताचा निर्णय घेणे ही जबाबदारी पत्रकाराचीच राहते.
जागतिक आर्थिक मंचाच्या ‘फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२५’मध्येही बदलत्या रोजगारविश्वाचे चित्र मांडले आहे. २०३०पर्यंत तंत्रज्ञानामुळे काही पारंपरिक कामांची मागणी कमी होईल, तर कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती विश्लेषण, सायबर सुरक्षा आणि संगणकीय कौशल्यांशी संबंधित कामांची मागणी वाढेल, असा नियोत्तäयांयांचा अंदाज आहे. अहवालानुसार सध्याच्या कामगारांपैकी सुमारे ३९ टक्के लोकांची कौशल्ये पुढील पाच वर्षांत बदलण्याची किंवा कालबाह्य होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ प्रत्येकाची नोकरी जाणार असा नाही; मात्र आज जे कौशल्य पुरेसे आहे ते उद्या पुरेसे राहीलच असे नाही. हिंदुस्थानच्या संदर्भातही माहिती-तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, ग्राहकसेवा, उत्पादन आणि प्रशासन अशा क्षेत्रांत एआयचा वापर वाढण्याची शक्यता आहे. त्याच वेळी एआय व मशीन लर्निंग तज्ज्ञ, माहिती विश्लेषक आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञ यांसारख्या नव्या भूमिका महत्त्वाच्या ठरत आहेत.
या बदलाचा परिणाम सर्वांवर सारखा होणार नाही. मोठ्या कंपन्यांकडे नवी साधने स्वीकारण्यासाठी पैसा, प्रशिक्षण आणि तज्ज्ञ असतात; लहान उद्योग किंवा स्वयंरोजगार करणार्यांना ही साधने समजून घेण्यासाठी वेळ आणि खर्च दोन्ही लागतात. शहरातील संगणकावर काम करणार्या कर्मचार्याला एआयचा परिणाम लवकर जाणवू शकतो; परंतु शेती, बांधकाम, वाहतूक, आरोग्यसेवा आणि प्रत्यक्ष मानवी संपर्कावर आधारलेल्या कामांमध्ये बदल वेगळ्या गतीने होईल. तरीही कोणतेही क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित आहे असे मानणे चुकीचे ठरेल. शेतकर्याला हवामानाचा अंदाज, पिकांवरील रोग ओळखणे किंवा बाजारभाव समजून घेण्यासाठी एआय मदत करू शकते; पण शेतातील माती, पाणी, स्थानिक परिस्थिती आणि प्रत्यक्ष अनुभव यांची जागा केवळ संगणकीय उत्तर घेऊ शकत नाही.
डॉक्टरांना तपासणीतील माहिती समजून घेण्यासाठी मदत मिळू शकते; पण रुग्णाशी संवाद, नैतिक निर्णय आणि उपचाराची अंतिम जबाबदारी वैद्यकीय तज्ज्ञांकडेच असते.
मात्र एआयमुळे निर्माण होणार्या संधींबरोबर काही गंभीर प्रश्नही आहेत. कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कमी केले, तर त्या बदलाचा फटका कोणाला बसणार? एआयने तयार केलेल्या चुकीच्या माहितीमुळे आर्थिक किंवा वैद्यकीय नुकसान झाले, तर जबाबदार कोण? कर्मचार्यांच्या कामगिरीवर सतत नजर ठेवण्यासाठी ही साधने वापरली गेली, तर गोपनीयता आणि कामगारांचे अधिकार कसे जपले जाणार? एआय प्रणालींना शिकवण्यासाठी वापरलेली माहिती चुकीची किंवा पक्षपाती असेल, तर त्यांचे निर्णयही अन्यायकारक ठरू शकतात. शिवाय या तंत्रज्ञानाचा फायदा काही मोठ्या कंपन्यांकडेच केंद्रित झाला, तर आर्थिक विषमता वाढण्याचा धोका आहे. म्हणून एआयचा स्वीकार म्हणजे केवळ नवे संगणकीय साधन खरेदी करणे नव्हे; त्यासाठी पारदर्शक नियम, माहितीची सुरक्षितता, मानवी देखरेख आणि कामगारांना प्रशिक्षण देण्याची धोरणे आवश्यक आहेत.
या नव्या काळात शिक्षण आणि कौशल्यविकासाची जबाबदारीही बदलणार आहे. केवळ पदवी मिळवणे किंवा एखादे संगणकीय साधन वापरता येणे पुरेसे ठरणार नाही. प्रश्न विचारण्याची क्षमता, माहितीची सत्यता तपासणे, तर्कशुद्ध विचार, सर्जनशीलता, संवादकौशल्य आणि सतत नवे शिकण्याची तयारी अधिक महत्त्वाची होईल. शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना एआय वापरण्यास शिकवतानाच त्याच्या उत्तरांवर आंधळा विश्वास ठेवू नये, हेही शिकवले पाहिजे. कंपन्यांनी कर्मचार्यांना बदलत्या कामांसाठी प्रशिक्षण द्यावे. सरकारनेही ग्रामीण भागापर्यंत डिजीटल सुविधा, परवडणारे प्रशिक्षण आणि नव्या रोजगारांसाठी संधी पोहोचवण्यावर भर द्यायला हवा. अन्यथा तंत्रज्ञान पुढे जाईल; पण त्याचा लाभ घेण्याची संधी समाजातील काही घटकांपुरतीच मर्यादित राहील.
हिंदुस्थानसारख्या तरुण लोकसंख्या असलेल्या देशासाठी हा बदल विशेष महत्त्वाचा आहे. येथे लाखो तरुण दरवर्षी रोजगाराच्या बाजारात प्रवेश करतात. त्यांच्यासाठी एआय हे केवळ नोकरी कमी करणारे तंत्रज्ञान न ठरता नव्या संधी निर्माण करणारे साधन ठरू शकते. उदाहरणार्थ, एखादा छोटा व्यावसायिक एआयच्या मदतीने जाहिरात तयार करू शकतो, ग्राहकांच्या मागणीचा अंदाज घेऊ शकतो किंवा परदेशातील ग्राहकांशी संवाद साधू शकतो. मात्र त्यासाठी इंटरनेट, प्रशिक्षण आणि परवडणारी साधने उपलब्ध असणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाची संधी सर्वांपर्यंत पोहोचवणे हेच खरे आव्हान आहे.
औद्योगिक क्रांतीच्या काळात यंत्रांनी अनेक हातांची कामे घेतली, पण त्याचबरोबर नवे उद्योग आणि व्यवसायही निर्माण केले. संगणक आल्यावर काही जुन्या भूमिका बदलल्या, तर माहिती-तंत्रज्ञानासारखी नवी क्षेत्रे उभी राहिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही असा बदल घडू शकतो; मात्र त्याचा वेग आणि व्याप्ती अधिक मोठी असू शकते. त्यामुळे भीतीपोटी तंत्रज्ञान नाकारणे योग्य नाही आणि त्याच्या क्षमतेवर आंधळा विश्वास ठेवणेही धोकादायक आहे. एआय माणसाची जागा घेईल की नाही, यापेक्षा माणूस एआयचा वापर करून स्वतःचे काम किती चांगले करतो, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटी यंत्राकडे माहिती आणि वेग असू शकतो; पण त्या माहितीचा उपयोग कशासाठी करायचा, कोणता निर्णय न्याय्य आहे आणि त्याचे परिणाम कोण भोगणार, हे ठरवण्याची जबाबदारी समाजाची आणि माणसाचीच आहे. भविष्यात नोकर्या टिकवण्याची गुरुकिल्ली यंत्रांशी स्पर्धा करण्यात आहे, की त्यांच्यासोबत नवे कौशल्य शिकण्यात?
