प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र या वर्षाच्या अखेरीस आपल्या चाहत्यांना एक सुरेल भेट देणार आहे असे वाटते. कारण याबाबत तिने सोशल माध्यमांवर एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमधल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, २०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच खूप चढउताराचं होतं. या वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी आणि माझ्या सर्व चाहत्यांसाठी मी नवीन गाणं घेऊन येतेय. त्यावर माझं काम सुरु आहे. या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माझ्या ऑफिशीअल युट्यूब चॅनेलवर ते गाणं रिलीज होईल, असे ती स्पष्ट करते.
सावनीने आजवर मराठीसह हिंदी, तमीळ गुजराती, बंगाली, कोंकणी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचा चाहता वर्ग केवळ भारतातच नव्हे तर जगभर आहे हे लक्षात येतेच. या चाहत्यांसाठी सावनी वर्षाअखेरीस आता कोणते नवे गाणे आणणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता लागली आहे. लॉकडाऊननंतर ती प्रथमच सोनी मराठी वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात सहभागी झाली होती. नुकताच त्या कार्यक्रमाचा ग्रॅंड फिनाले सोहळा पार पडला. त्यात अभिनेता आस्ताद काळे उपविजेता ठरला होता. त्याची मेंटॉर गायिका सावनी रवींद्र हीच होती.