• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मानसी

प्राजक्ता पांगारकर

Marmik Team by Marmik Team
November 21, 2026
in दिवाळी स्पेशल
0
मानसी

‘प्रबोधन गोरेगाव’ आणि ‘साप्ताहिक मार्मिक’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती लघुतम कथा स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची कथा.

‘मानसी, थोडा कालचा उपमा घेशील का? शिवाय, पोहे सुद्धा केलेत’.
‘हो, चालेल ना. अगं सुषमा, हा उपमा गरम तरी करून आणायचा. अगदीच थंड आहे गं’.
‘घे ना प्लीज. कंटाळा आला आता गरम वगैरे करायचा. सकाळपासून स्वयंपाक घरातच आहे ना. कधी एकदा बसते असं झालं होतं’. मानसीला सुषमाची धावपळ दिसत होती, म्हणून गपचूप तिने उपमा खाऊन घेतला.
दुपारी सगळं आवरून झाल्यावर सुषमाला मानसी म्हणाली, ‘झालं ना आवरून. ये छान गप्पा मारू’. तेवढ्यात सासूबाईंनी सुषमाला कसल्या तरी कामासाठी हाक मारली.
‘आलेच हं मानसी’.
‘तू बघावं तेव्हा कामातच असतेस. माझ्यासाठी तुझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. घरातले तर कोणी माझ्याशी साधं बोलतही नाहीत. मी सुद्धा घरची एक सदस्य आहे, हे जणू त्यांच्या लेखी नाहीच आहे. पण किमान तू तरी माझ्याकडे दुर्लक्ष करू नयेस, इतकी साधी अपेक्षा सुद्धा धरू नये का?’.
‘नाही गं मानसी, तू उगाचच गैरसमज करून घेत्येस. मी आलेच. मग बोलते’.
मानसी आपली वाट बघत बसली, पण सुषमा मात्र नेहमीप्रमाणे कामाच्या गडबडीत विसरून गेली.
सकाळी नवर्‍याचा डबा, शिवाय मीनल आणि अमेयचा डबा, त्यांना वेगवेगळ्या वेळी शाळेत सोडणं, आणणं, त्यांच्या एक्स्ट्रा क्लासच्या वेळा सांभाळणं, सुषमाला हे सगळं नित्याचच होतं. कुठेही जायचं तर मानसीला सोबत घेऊनच जावं लागायचं. एकदा मानसी म्हणाली, ‘मी शिकू का गं स्विमिंग मीनल सारखं?’
‘नको गं बाई, या वयात स्विमिंग? लोकं काय म्हणतील आणि एवढं करून आलं तर ठीक. नाही आलं तर हसं होईल ते वेगळंच’.
‘बघावं तेव्हा तुझी नकार घंटाच असते’, म्हणून मानसी जरा हिरमुसलीच.
‘माझं काहीच अस्तित्व नाहीये. तू आहेस म्हणून मी आहे. वाटतं नोकरी करावी आणि स्वतःला सिद्ध करावं’
‘मानसी, नोकरी करायला काही हरकत नाही गं. पण माझ्याशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाहीस आणि मला अजिबात वेळ नाहीये. देवधर्म, रूढी परंपरा, पूर्वीच्या चालीरीती आणि घरच्या कामामध्ये मी अगदी गुरफटून गेले आहे गं. तू बघतेस ना’.
‘सुषमा, जरा आरशात बघ स्वतःला. कशी काळवंडली आहेस. पार्लरला वगैरे जाऊन ये’.
‘मी आणि पार्लर?’
त्यादिवशी मात्र सुषमाचा दिवसच खराब होता, असं म्हणायला हवं. सुषमाच्या सासूबाईंनी तिच्यासमोर तिच्या एका मैत्रिणीचं अगदी तोंड भरून कौतुक केलं. सुषमाच्या मनाने घेतलं. मी ह्यांचं एवढं मरमरून करते, पण कौतुक मात्र माझ्या मैत्रिणीचं. मुलांना तर काय शिंगच फुटली आहेत. येता जाता तुला कसं काहीच कळत नाही, म्हणून नावं ठेवतच असतात आणि त्यात भर म्हणून की काय सुषमाच्या नवर्‍यानेही आज जेवताना ऑफिसमधला राग सुषमावर काढला होता.
आता मात्र सुषमाला रडू आवरलं नाही. मानसी तिला सावरत म्हणाली,
‘लोक काय म्हणतील, याचा विचार करू नकोस. तू आणि मी आपण दोघी मिळून खूप काही करू शकतो. फक्त एक सुरुवात कर. आत्तापर्यंत जे जगली नाहीस ते जग. कारण आत्ताची वेळ परत कधीच येणार नाही. मलाही जगायचंय. पण कुढत नाही, आनंदाने. मला साथ दे. आता नाही म्हणू नकोस. पहिलं पाऊल टाक, पुढची पावलं आपोआप पडतील. देवा समोरच्या दिव्यावरची काजळी काढतेस ना, तशी तुझ्या आयुष्यावर जमलेली काजळी सुद्धा काढ. सुषमा, एका ठिणगीत अख्खं रान पेटवण्याची क्षमता असते. तुझ्यातली एक ठिणगी तुझं सगळं आयुष्य उजळवून टाकेल. पेटवलेला एक फटाका माळीतल्या अनेक फटाक्यांना पेटवायला कारणीभूत ठरतो आणि माझं म्हणशील तर, माझं अस्तित्व जोपर्यंत तू इतरांना पटवून देत नाहीस, तोपर्यंत कोणीही ते स्वीकारणार नाही. आपला मान आपणच राखावा लागतो आणि बदल हा नेहमी आधी मनामध्ये घडवावा लागतो’.
त्यादिवशी सुषमाने खूप विचार केला. दुसर्‍या दिवशी रविवारी काहीतरी अंगात संचारावं तसं, सकाळी सुषमा मानसीला घेऊन पिकनिकला निघून गेली. मानसीने विचारल्यावर सुषमा म्हणाली, ‘माझं ठरलंय मानसी. आता मी जगणार आहे, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. तुझी स्वप्न आता मी पूर्ण करणार आहे. तू आणि मी काही वेगळे नाहीत. तुझी स्वप्न तीच माझी स्वप्न आणि घरच्यांना मी काही वार्‍यावर टाकलं नाहीये. त्यांची सगळी व्यवस्था करूनच मी निघाले आहे आणि काही गोष्टी आता त्यांनाही त्यांच्या करायला हव्यात ना. हळूहळू त्यांना पटवून देईन. त्यांनाही कळलं पाहिजे, की आमचंही आयुष्य आहे आणि ते जगण्याचा अधिकारही आम्हाला आहे’.
सुषमा खूप खंबीर दिसत होती. तिने घरच्यांना सांगितल्यावर घरच्यांना साहजिकच धक्का बसला. घरच्यांनी शंका कुशंकाही घेतल्या. पण आता सुषमाला थांबायचं नव्हतं. तिला मानसीला न्याय मिळवून द्यायचा होता आणि स्वतःलाही. हे तिच्यासाठी सोपं नक्कीच नव्हतं. हळूहळू दोघी मिळून हॉटेलमध्ये जाऊ लागल्या, पार्लरला जाऊ लागल्या, स्वतःचे छंद जोपासू लागल्या. सुषमा आणि मानसी दोघींनी मिळून आपल्या स्वप्नपूर्तीकडे पाऊल टाकलं होतं आणि त्यातून येणारा आत्मविश्वास पुढच्या स्वप्नपूर्तीला बळ देत होता.
एक वेगळीच सुषमा बघायला मिळाली होती. तिच्या नवर्‍याला तिच्यामध्ये झालेला बदल आवडत होता. त्याने सहज विषय छेडला असता सुषमा म्हणाली, ‘माझं मन गेले कित्येक दिवस खात होतं. आतून पोखरत होतं, पण मी माझ्या मनाचं ऐकायचं ठरवलं. आता मी खुश आहे आणि माझं मनही म्हणजेच माझी ‘मानसी”.

Previous Post

जोडी तुझी माझी!

Next Post

अकलेचा दुष्काळ!

Next Post
अकलेचा दुष्काळ!

अकलेचा दुष्काळ!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.