• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

जोडी तुझी माझी!

श्रीकांत आंब्रे विनोदी कथा

Marmik Team by Marmik Team
November 21, 2026
in विनोदी लेख
0
जोडी तुझी माझी!

लग्न ही संकल्पना मला मान्य नाही, कारण एखाद्या युवतीला पत्नी म्हणून घरात आणायचं, तिला तिच्या नावापासून सगळं काही बदलायला लावून दासी किंवा मोलकरणीसारखं वागवायचं; त्यात ती कमावती असेल तर तिच्या कमाईसाठी तिला नोकरीला जुंपायचं हे मला मान्य नाही. पत्नी म्हणजे काही फक्त संतती वाढवायचं मशीन आहे का?

(मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमातील मुला-मुलीची प्रश्नोत्तरे)
तो – नाव काय तुमचं? सरनेम नको, फक्त गुडनेम सांग.
ती – रूपा. पण मला लाडाने सारे रुपी म्हणतात.
तो – छान आहे नाव. रात्री झोप नाही झाली वाटतं पुरेशी. डोळ्यावर झापड असल्यासारखी वाटतेय.
ती – हो. रात्री रील करत बसले होते ना. माझा आवडता छंद आहे तो. पण तुमचेही डोळे तांबारलेले दिसतायत. कुठे पार्टी-बिर्टीला गेला होतात की काय! सहज शंका आली म्हणून विचारलं. मला पण आवडतं पार्ट्यांना जायला. आठवड्यातून एकदा तरी असतेच पार्टी. पार्टीत गेलं की सोवळं ओवळं नाही आवडत मला. अगदी मोकळं व्हायचं. खाणं-पिणं-नाचणं दे धमाल!
तो – म्हणजे पिता तुम्ही? आई शप्पथ, द्या टाळी!
ती – मला अहो जावो नका म्हणू. रूपा म्हणा, रुपडी म्हणा, चालेल मला. मी पण तुम्हाला पम्या म्हणेन. पण टाळी कशासाठी दिलीत?
तो – त्याचा अर्थ आपली पत्रिका जुळली बघ रुपे. मला तर लहानपणापासून पिण्याची आवड आहे. त्याची स्टोरीच सांगतो तुला. बोअर नाही ना होणार? लहानपणी खूप हाडकुळा होतो मी. तेव्हा डॉक्टरांनी बाबांना सांगितलं, याला रोज एक पेग ब्रँडी पाण्यातून देत जा. ती ही त्यात कच्चं अंडं घालून आणि काय सांगू, आठ दिवसात गाल वर आले. तब्बेतही सुधारली. सहावीत असेन तेव्हा मी. ओठावर मिसरुडही फुटली, छान छान स्वप्न पडायला लागली.
डॉक्टरांना भेटलो. डॉक्टर म्हणाले, आता ब्रँडी बंद करा. नुसतं अंडं खात जा. मी हिरमुसलो. आम्ही चाळीत राहणारी माणसं. रविवारी मटणाचा बेत असला की बाबा त्यांच्यासाठी क्वार्टर आणायचे, पण मला हात लावायला द्यायचे नाहीत. आमचा एक जवळचा नातेवाईक होता टंंकूनाना. सावळ्या वर्णाचा आणि गोल तुळतुळीत टकलाचा. तो पोलिसात होता. आमच्या एरियात हातभट्टीवाल्यांकडून हफ्ते वसूल करायला यायचा तो नेमका रविवारचा मुहूर्त साधून. मग चमचमीत जेवणाबरोबर तोही एक-दोन पेग मारायचा आणि जाताना मला म्हणायचा, चल खाली फिरायला माझ्याबरोबर. पहिल्यांदा त्याच्याबरोबर गेलो तेव्हा आमच्या चाळीच्या पुढे असलेल्या मोकळ्या मैदानातील बैठ्या पत्र्याच्या चाळीतील आमच्या एरियातल्या फेमस हातभट्टीवाल्याच्या घरी तो मला घेऊन गेला. त्यांच्यात काही बोलणी झाली आणि आम्ही पुढच्या गल्लीत असलेल्या झोपड्यातील हातभट्टीवाल्याकडे गेलो. त्याने आमच्या टंकूनानांपुढे पितळेच्या मोठ्या टोपात बर्फ घालून त्यात बीअरच्या चार-पाच बाटल्या ओतल्या. मला म्हणाला, थांब तुझ्यासाठी कोकाकोला देतो. टंकूनाना म्हणाला, नको नको. त्याला टेस्ट करू दे बीअर. तो छोटा ग्लास दे. त्याने तो ग्लास भरून दिल्यावर मी ओठाला लावला आणि कडू कडू लागल्याने ओतून टाकला. पण कॉलेजात गेल्यावर हीच बीअर आपली मैत्रीण झाली. अशी आहे आमची पियक्कड स्टोरी. पण तू कधी सुरू केलीस?
ती – मी कॉलेजात गेल्यानंतर ल्युसी नावाची माझी मैत्रीण होती
कॉलेजात. तिला कसलेच पाश नव्हते. एकटीच राहायची ती घरी. मग मी कधी कधी रात्री तिच्या सोबतीला, गप्पाटप्पा करायला जायचे. माझ्या घरी अभ्यासाचं नाव सांगून. तेव्हा एकदा तिने मला सरबत म्हणून जिन दिली प्यायला. नंतर रेड वाईन, बीअर अशा एकेक पायर्‍या चढत ब्ल्यू लेबलपर्यंत सगळ्या पायर्‍या पार केल्या मी. काय मजा असते ना झिंग आल्यावर. तिचे आईवडील होते
ऑस्ट्रेलियाला. ते तिथून नवनवीन
स्टॉक पाठवायचे. मग जी चटक लागली ती अजून सुटली नाही.
तो – तुझ्या घरी कोणकोण असतं?
ती – मी एकटीच. आईने घटस्फोट घेतला आणि सहा महिन्यांत ती गेली. खूप आजारी होती. सगळी मालमत्ता माझ्या नावावर करून गेली. तेव्हापासून ठरवले. प्रत्येक दिवस आनंदात आपल्याला हवा तसा जगायचा. आजचा दिवस आपला म्हणायचा. उद्याचं कोणी सांगितलंय! तो नाना बघ कसा फटाककन् गेला. दु:खं सगळ्यांना असतात, पण त्यातही सुख शोधायचं हे तत्त्वज्ञान पटतं मला. इथे कुणी कुणाचं नसतं. स्वार्थापुरते लोक पुढे येतात. कोण काय बोलेल इकडे लक्ष द्यायचं नाही. कुणावर फार विश्वास ठेवायचा नाही. उद्या तूही मला फसवणार नाहीस कशावरून?
तो – मुळीच नाही. अगं तुझ्यासारखाच मीही सडाफटिंगच आहे. लग्न या शब्दावर माझा विश्वास नाही. आपण रिलेशनशिपमध्ये राहायचं. कधी तू माझ्या घरी, कधी मी तुझ्या घरी. लग्नाचं लोढणं गळ्यात बांधून घ्यायचंय नाही मुळी. सध्याची तर तीच फॅशन आहे.
ती – म्हणजे आपले विचार आणि अँगल जुळताहेत तर! मला असाच मित्र, पार्टनर हवा होता. आता आपण आपल्या आवडी-निवडी बघू. आपण जेन झीच्या जगातले. कुणाची कसलीही अन्यायकारक बंधनं झुगारुन देऊन लढण्यासाठी मैदानात उतरणारे. सगळी व्यवस्थाच बदलायचीय आपल्याला. त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करायला हवी. भीती हा शब्द आपल्या शब्दकोशात नाही. यावर कुणाबरोबरही वाद-विवाद करायला मी तयार आहे. लग्न ही संकल्पना मला मान्य नाही. कारण एखाद्या युवतीला पत्नी म्हणून घरात आणायच, तिला तिच्या नावापासून सगळं बदलायला लावून दासी किंवा मोलकरणीसारखं वागवायचं; त्यात ती कमावती असेल तर तिच्या कमाईसाठी तिला नोकरीला जुंपायचं हे मला मान्य नाही. पत्नी म्हणजे काही फक्त संतती वाढवायचं मशीन आहे का? पूर्वी नवरा मेला की केशवपन करायची क्रूर पद्धत होती. पुरुषसत्ताक समाज होता. आजही ती पद्धत बंद झाली तरी हुंडाबळी, क्रूरपणे हत्येचे प्रकार होतातच ना. कुठे गेली ती स्त्री-पुरुष समानता! नुसते कायदे करून काही होत नाही. जिथे एकाधिकारशाही, हुकूमशाही अगदी जनतेला भोळं समजून नकळत लादली जाते, तेव्हा या सत्ताधीशांना आवाज देणं, त्यांना सळो की पळो करून सोडणं आपल्या पिढीच्या हातात असतं. सत्ता म्हणजे फक्त विकासाच्या कृत्रिम चकचकाट. पुन्हा त्यातही भ्रष्टाचार करून मलिदा खाणारे काही नेते असतातच. आपण कशाला जपान आणि अमेरिकेशी स्पर्धा करायची? यांना धड नागरिकांना संरक्षण देता येत नाही त्यांनी कशाला शौर्याच्या आणि युद्धसामुग्रीने सज्ज असल्याच्या गप्पा मारायच्या. आपलं नौदल, हवाईदल, पायदळ पूर्वीइतकं आजही सक्षम आहे. पाकिस्तानच्या तर क्षणात आपण चिंधड्या उडवू शकतो. पण सत्ताधार्‍यांना कुठे संरक्षणसज्जता ठेवायची याचंच ज्ञान नसेल तर काय उपयोग त्या संरक्षणसिद्धतेचा? गेल्या वर्षी आपल्या निष्पाप पर्यटकांचा धर्म विचारून त्यांचा गोळ्या घालून जीव घेतलाच ना? पहेलगाममध्ये इतकी बेफिकीरी दाखवणारे राज्यकर्ते असले तर हेच होणार. एक नेते तर फिरताहेत विदेशांमध्ये उंची कपडे घालून. जनतेला उपदेश करणं सोपं असतं की हे करू नका आणि ते करू नका, स्वत: मात्र मौजमजा करत हिंडायचं जगभर. हे कुठे तरी संपलं पाहिजे, संपवलं पाहिजे आणि ते आपल्या पिढीच्याच हाती आहे.
तो – पटले मला तुझे विचार. या नेते मंडळींकडे इतका पैसा आहे की त्यातला एकजण तर लंडनही विकत घेऊ शकेल. जनता चाललीय रिक्षा मोटारी आणि बसमधून रस्त्यावरचे खड्डे चुकवत. मी मंत्री असतो ना तर अशा सगळ्या नेत्यांना खड्ड्यात टाकलं असतं.
ती – माझ्याबरोबर राहिलास तर होशील तू मंत्री. मला वाटत नाही पुढच्या निवडणुकीत हेच सरकार निवडून येईल म्हणून. आताही ओढून ताणून एकमेकांच्या पायात पाय घालून पुढे पळण्याचा प्रयत्न करताहेत. पण आता शेवट जवळ येत चाललाय. कधी आदळतील याचा नेम नाही.
तो – खूप बोललो आपण राजकारणावर. आता थोडं संस्कृतीविषयी बोलूया. आपल्या संस्कृतीतल्या सगळ्याच गोष्टी वाईट नाहीत गं. जातिभेद, धर्मभेद, अस्पृश्यता हे घटक आजही जिवंत असले तरी त्याला प्रामुख्याने समाजच जबाबदार आहे, असं नाही तुला वाटत? आपल्या संतांनी सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारून सर्व जातींना वारकरी पंथाखाली एकत्र आणलं. आजही ती परंपरा चालू आहे, ही त्यातल्या त्यात मोठा दिलासा देणारी बाब. पण हे पुढारीच खुर्चीसाठी जाती-जातीत भेद पाडत चाललेत. माणूस ही एकच जात आणि मानवता हा एकच धर्म असला पाहिजे. सण उत्सवांची परंपरा आणि त्यांचा थाट यामुळे समाजात चैतन्य असल्यासारखं वाटतं. पण डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने कान बधीर होतात. एक विद्याधर उठतो आणि डीजेवाल्यांना आवाज देतो तेव्हा त्याचीच जिरवण्याची चढाओढ लागते ही आपली वृत्ती. उत्सवांना गालबोट कसं लागेल यासाठी काही लोक मुद्दाम प्रयत्नशील होतात अशावेळी. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करायला कचरतात ते.
ती – त्यांच्याविरुद्धच कशाला, कुणाविरुद्ध कसलीही कारवाई करायला डरतात आपले मुख्यमंत्री फक्त दिल्लीची री ओढत असतात. दाढीवाल्याचं विचारूच नका. कुठल्या जगात वावरत असतात ते त्यांचं त्यांनाही कळत नसावे. आता ते लंडनवर पिक्चर काढताहेत अशी अफवा आहे. त्याचं नाव ठरवण्यासाठी त्यांनी स्पर्धा जाहीर केलीय. विजेत्याला लंडनची आणि ठाण्याची सैर असं बक्षीस आहे. मी पण दोन नावं पाठवलीत. पहिलं `लव्ह इन लंडन’ आणि दुसरं `अ‍ॅन इव्हनिंग इन लंडन’ बघूया काय होतं ते.
तो – बाकी, तुला कसले छंद आहेत!
ती – मी रांगोळी काढते. चित्र काढते. फोटोग्राफी करते. पॅराग्लायडिंग करते. कविता करते. गाणी लिहिते. उखाणे घ्यायला मला खूप आवडतं. त्या `होम मिनिस्टर’मधल्या जोडप्यांसाठी मी खूप उखाणे लिहिलेयत. पती-पत्नी असल्याचं सांगून जाऊया आपण भाऊजींकडे. घेतील ते आपल्याला बोल्ड जोडपं म्हणून. पैठणी नाही मिळाली तरी चालेल, पण मी लिहिलेले तुझे आणि माझे उखाणे पाठ करून वाचायचे आपण. तुला दाखवते पाच-सहा उखाणे म्हणून. मात्र नेहमीसारखे नाहीत ते. त्याला आपल्या आजूबाजूची राजकीय झलक आहे. पाठ आहेत माझे. ऐक.
जेन झीच्या मोर्चात
तरुणाईची लाट
पम्याचे नाव घेते
दिल्लीत लावली वाट
आता हा उखाणा तू घ्यायचा.
नेत्यात नेता
डोनाल्ड ट्रम्प
रूपा माझी लाडकी
सार्‍यांना मारी पंप
त्यानंतर मी घेणार-
रस्त्यात खड्डे
खड्ड्यात रस्ता
पम्याचं नाव घेते
उठता-बसता
आता हा तुझा उखाणा-
अच्छे दिन येता येता
कच्चे दिन आले
रूपाशी लिव्ह इन करून
लव्ह सक्सेस झाले
आता माझा उखाणा-
इकडून आले सीएम
तिकडून दाढीवाले
दोघांची टक्कर होता
पम्या माझे भ्याले
आता तुझा –
लंडनच्या म्युझियमात
ठाणेकरांची दाढी
सणासाठी घेईन मी
शंभर कोटींची गाडी
आता माझा –
असे कसे पेपर फुटतात
परीक्षेच्या आधी
पम्यासाठी शिवेन मी
मखमलीची गादी
-रूपा, आता पुरे झाला तुझा चावटपणा.
-अरे, लाजतोस कशाला? त्या चावटपणातूनच तर माणसं जन्माला येतात. आपली खजुराहोची शिल्प पाहा. सगळं खुल्लम खुल्ला. ती पाहून त्यावेळच्या शिल्पकलेवरून तेव्हाच्या समाजाच्या प्रगतीची कल्पना येते. आणि आपण बसतो नाकं मुरडत, असलं काही पाहिलं तर शाळेत असताना आमच्या विज्ञानाच्या बाई पुनरुत्पादनाचा धडा शिकवताना किती गंभीर होऊन शिकवायच्या हे आठवून आजही हसू येतं. माझं तर स्पष्ट मत आहे, माध्यमिक वर्गापासून विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण कंपल्सरी दिलंच पाहिजे. ती गरज आहे काळाची. घरी मुलांना नको नको ते प्रश्न पडतात तेव्हा उत्तरं न देता पालक वेळ मारून नेतात आणि मग मुलं वयात येत असताना कुतूहलापोटी मित्रमंडळींकडून चुकीची माहिती मिळवून भविष्यात आयुष्याची नासाडी करून घेतात. तुला काय वाटतं?
तो – मला काय वाटणार! मी तर शाळेत असताना जत्रेत मिळणार्‍या पिवळ्या पुस्तकातली माहिती मिळवून सज्ञान झालो होतो. पुढे मग एखाद्या रिकाम्या खोलीत कोणीही नसताना सामुदायिक फिल्म शो आयोजित केले जायचे. कसले ते तुला माहित असेलच. कॉलेजात गेल्यावर तर ज्ञानात आणखी भर पडत गेली. तात्पर्य, लैंगिक शिक्षण विद्यार्थ्यांचा जन्मसिद्ध हक्क असतो आणि तो ती मिळवतातच. सरकार त्यासाठी काही करत नाही. फक्त बाता मारते. लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे मुले विकृतीला बळी पडतात. मुलं-मुलीं पळून जातात आणि आयुष्याचं वाटोळं करून घेतात. सध्या अशा घटनांचं प्रमाण वाढलंय. हे केवळ आकर्षणामुळे होतं.
ती – वयात आलं की ते होणारच. पण प्रेम वेगळं आणि वासना वेगळी. त्यातला फरक तरुण पिढीला कळायला हवा. नाहीतर जातात पळून आणि बोंबलत बसतात आयुष्यभर. मला ना काळजी वाटते असं पळून जाऊन लग्न करणार्‍यांची. ना धड माहेरचे राहात ना सासरचे. ना घरका ना घाटका अशी स्थिती होते त्यांची. त्यांच्यासाठी शाळेत पळून जाऊन लग्न या विषयावर समुपदेशन की काय म्हणता त्याचा आठवड्यातून एक तास तरी हवा. एकूण या विषयावर तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित करायला हवीत शाळेने. पुढच्या पिढीचं भवितव्य तरी चांगलं घडेल त्यामुळे. तू एका कंपनीचा मालक आहेस हे तर आधीच कळलं होतं मला तू बघायला येण्यापूर्वी. तुझं काही उत्पन्न या कामासाठी खर्च करू आपण. अशा विषयावर परिसंवाद आयोजित करू. तज्ज्ञांची भाषणे ठेवू. काही पुस्तकंही प्रकाशित करू.
तो – पक्का. तू एवढी म्यॅच्युअर्ड असशील असं वाटलं नव्हतं मला. पण तू तर माझ्या अपेक्षांपेक्षा खूपच टॉप ठरलीस.
ती – पण मला मागणी घालायला कोणी पाठवलं तुला?
तो – ते मी नाही सांगणार, पण जिने पाठवलं ते तुझ्या एकंदर सामाजिक अ‍ॅप्रोचकडे पाहूनच पाठवलं. तू अनेक क्षेत्रांत तुझं योगदान देतेस असं सांगत होती ती. तू नाही तिला ओळखत पण ती ओळखते तुला. तुझ्या शाळेत होती ती. तुझ्या डॅशिंगपणाला मानते ती. माझ्याच कंपनीत आहे मार्वेâटिंग मॅनेजर म्हणून. विवाहित आहे. तिचा नवराही एका कंपनीचा मॅनेजर आहे. माझाच मित्र आहे तो.
ती – अय्या. ती वर्षा गोडबोलेच असणार. तिच होती माझी जिवलग मैत्रीण. पुढे शाळा संपल्यावर पुन्हा काही गाठ नाही झाली तिची. पिंगट केसांची. गाणी सुरेख गायची. एकदा भेटू आपण तिला तिच्या नवर्‍यासह. करू मस्त पार्टी एखाद्या हॉटेलात.
तो – पण प्यायला लावू नकोस तिला. पक्की व्हेजिटिरियन होती तेव्हा. आता काय खाते माहीत नाही.
ती – तिचा नवराही शाकाहारी आहे. मस्त जोडी आहे दोघांची.
तो – आपली पण तशीच होईल. चल चांगल्या हॉटेलात जाऊ आणि खूप गप्पा मारू पुढच्या प्लॅनिंगच्या. चल निघू.

Previous Post

बस

Next Post

मानसी

Next Post
मानसी

मानसी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.