संतोषराव, माणसांना हसविणे सोपे असते की गाढवांना? तुमचा काय अनुभव आहे? -संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव, पुणे
माणसांना हसवणं खूप कठीण असतं, कारण त्यांना विनोदाच्या आधी भाषा कळावी लागते… मग तो विनोद समजावा लागतो… गाढव कुचीपूची असतं… समोरच्याची भाषा जरी नाही कळली तरीही समोरच्याने विनोद केल्यासारखं खिंकाळत हसतं. पण भाषा आणि विनोदही कळणारे त्या गाढवाच्या हसण्यावर हसतात.
माझा एक मित्र उसने घेतलेले पैसे परत देतच नाही. त्यामुळे मी त्याला पैसे देणंच बंद केलं. तर आता म्हणतो, तू पूर्वीसारखा मित्र राहिला नाहीस, कोण होतास तू, काय झालास तू? त्याला काय उत्तर देऊ? -शार्दूल चव्हाण, विक्रोळी
त्याला प्रामाणिकपणे सांगा बाबा रे मी वेडा होतो, तू मला मामा बनवलंस, आता यापुढे अजून ‘तात्या’ बनवू नकोस. मामाच्या पुढची पायरी ‘तात्या’ बनणं असतं हे लक्षात ठेवा. स्वानुभवावरून सांगतो आहोत…
मुंबईत औषधापुरताही भोंडला सापडत नाही, ‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा’चे सूर ऐकू येत नाहीत. सगळीकडे मराठीजनही उत्साहाने दांडिया घेऊन गरबो रमत असतात. ही महाराष्ट्राची राजधानी आहे की गुजरातची? -रवींद्र सातपुते, काळा चौकी
कोणाला काय करायचे ते करू देत. तुम्ही स्वतः भोंडला सुरू करा, फुगड्या घाला, झिम्मा खेळा, स्वतःपासून सुरू करा… पाहू दुसर्यांच्या मागून जाणारी मेंढरं तुमच्यामागून सुद्धा येतात का ते! आणि राजधानी गुजरातची आहे, असं वाटलं, तरी ती महाराष्ट्राची राजधानी आहे असं म्हणा… कारण कामं तर देशाच्या राजधानीच्या हुकुमाप्रमाणे होतायेत ना!
मुंबईचे रिक्षावाले आणि टॅक्सीवाले यांना मराठी बोलता येतं की नाही, याची परीक्षा राज्य सरकार घेतंय. पण मुळात त्यांना आणि अशा अनेकजणांना महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचा एक शब्दही न बोलता पिढ्यानपिढ्या राहता येतं, याला जबाबदार कोण? -सुरेश वाणी, बदलापूर
आम्ही जबाबदार असणार्याचं नाव सांगितलं तरी कुणी जबाबदारी घेणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर २०४७ साली देऊ… तेव्हा हा प्रश्न तुम्ही विचारू शकत नाही आणि आम्ही उत्तर देऊ शकत नाही. नाही नाही… तेव्हा तुम्ही आम्ही असू… पण तेव्हा आपण पूर्ण विकसित झालेले असू. म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारू शकत नाही… वाट बघा… तोवर… तोपर्यंत एक मंत्र जपा we will do it.
हिंदू खतरे में है, अशी बोंब ठोकणार्या परिवाराचे गुंड दिल्लीच्या रस्त्यांवर हिंदूंच्याच मुलामुलींना कुत्र्यासारखे मारण्याचा पराक्रम गाजवताना दिसतायत पोलिसांच्या साक्षीने. हिंदूंना आता तरी कळलं असेल का त्यांना खरा खतरा कोणापासून आहे ते? -चित्रा जोशी, डोंबिवली
पोरीबाळींचं सोडा, हिंदू खतर्यात आहे त्याबद्दल बोला. धर्म सलामत तर पोरीबाळी पचास… पोरीबाळींच केशवपन करणार्या, त्यांना सती पाठवणार्यांना असल्या धमक्या देऊ नका… असल्या धमक्यांना भीक घालत नाहीत ते. भीक मागून खाणार्याच्याच पाठीशी उभे राहणार ते…
संतोषराव, ज्ञानू एकटाच जाणार की आणखी दोनतीन जणांना सोबत घेऊन जाणार? तुमचा काय अंदाज? -मुकुंद पाटणकर, केडगाव
का असं विचारताय? जे जाणार आहेत त्यांच्यात आपलं नाव आहे का? असेल अशी भीती वाटतेय का? तसं असेल किंवा नसेल तरी तुमच्याबरोबर काम करणार्या लोकांपासून सावध राहा… नाहीतर माफीचे साक्षीदार व्हा आणि त्यांनाच लटकवा. जे जातील ते आपल्या कर्माने जातील. बाकी भाकीत करायला आपण कुठे देवाचा अंश आहोत? आम्ही तुमच्यासारखेच सर्वसामान्य आणि बायोलॉजिकल!

