दसरा चार दिवसांवर आलाय. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला मी विचारले, पोक्या, येत्या दसर्याला काय बेत ठरवलायस? कोणते संकल्प करायचे पक्के केले आहेस? त्यावर पोक्या म्हणाला, मी फक्त माझा विचार कधीच करत नाही. जगाचा विचार करतो. देशाच्या, जगाच्या उद्धारासाठी जे नेते प्राण पणाला लावून जनतेच्या भल्यासाठी जे जे काम हाती घेतील, त्यांना मी नेहमी सपोर्ट करतो. २०१४ला त्यासाठीच मी विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सपोर्ट केला होता. पण गेल्या दहा वर्षात त्यांनी जनतेला असे काही वेठीस धरले की त्यांना सपोर्ट करणार्यांची स्वप्ने त्यांनी सपाट करून टाकली. तेव्हापासून या देशात कधीकाळी जनतेचे भले होईल, ती महागाईमुक्त होईल, सुखासमाधानने जीवन जगेल, महिलांना, पोरीबाळींना, सामान्य नागरिकांना भयमुक्त जीवन जगता येईल, कोणावर अन्याय-अत्याचार होणार नाहीत, मारामार्या बलात्कार थांबतील या आशेवर मी होतो. पण गेल्या दहा वर्षांत अशा वाईट घटना वाढीसच लागलेल्या दिसतात. सत्ताधारी गब्बर झालेत, भ्रष्टाचाराला उत आलाय. नवे पूल कोसळत्यात, महामार्गाची दुर्दशा झालीय. खड्डेच खड्डे चोहीकडे असे वातावरण निर्माण झालेय. अपघातांना सुमार राहिलेला नाही. रेल्वेच्या दारात लोंबकळणारे महिला-पुरुष प्रवासी टपाटप पडत असतात. त्याची कुणालाच पर्वा नाही. कधी झाड कोसळून तर कधी काहीही कोसळून रस्त्यावरील पादचार्याचा मृत्यू केव्हा ओढवेल हे सांगता येत नाही. त्यात महाराष्ट्रात ओला सुका दुष्काळ आणि आश्वासनांचा सुकाळ…
मी पोक्याला म्हटलं, हे तू मला काय सांगत बसलायस. याचा जाब तू दसर्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विचारायला हवास… पोक्याने माझे म्हणणे मनावर घेतले आणि तो तडक मुलाखती घ्यायला निघाला…
-नमस्कार फडणवीस साहेब, येत्या दसर्याच्या शुभेच्छा. कोणते नवे संकल्प करणार आहात दसर्यानिमित्त?
-संकल्पच संकल्प आहेत माझ्या मनात. पण दिल्लीच मनात माझ्याबद्दल काय संकल्प आहेत त्यावर सारे अवलंबून आहे. तुला म्हणून सांगतो, माझ्या मुलायम मार्गातला मोठा अडथळा आहे तो स्वत:ला ठाणे-कल्याण-डोंबिवलीचे संयुक्त मुख्यमंत्री समजणार्या दाढीवाल्यांचा. सध्या ठाण्यात किती आणि कशी खुनाखुनी चाललीय हे सारी दुनिया पाहतेय. आपल्या मारकुट्या बगलबच्चांना कसं सांभाळायचे याचाच विचार ते सतत करत असतात. लोकहिताची कामे गेली खड्ड्यात. जनतेमध्ये आपली प्रतिमा उजळ व्हावी म्हणून या माणसाने काय आणि किती उपद्व्याप केले हे जगाला माहीताय. स्वत:वर पिक्चर काय काढले, मतांसाठी लाडक्यांना दरमहा हप्ता देण्याची शक्कल काय लढवली, ज्यांचे खाल्ले त्यांच्याशी दगाबाजी कशी केली, गरजवंतांना मदत देण्याची नाटकं ते कशी करत असतात हे जनता पाहात असते. हा माणूस म्हणजे माझ्या वाटेतला मोठा अडसर आहे.
-मग तुम्ही संरक्षण का देता त्यांना आणि त्याच्या बगलबच्च्यांना?
-काय करणार? तिकडे दिल्लीला जाऊन काय कान भरतात तेच कळत नाही. त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारीही तसेच. एकेक नुसते नमुने आहेत, नमुने!
-तुम्ही काहीतरी करायला हवे त्यांच्याविरुद्ध.
-दिल्लीचा दबाव असतो ना आमच्यावर. ते म्हणतील ती पूर्वदिशा. दिल्लीश्वरांविरुद्ध जाण्याची आमच्या पक्षातील कुणाचीच हिंमत नाही.
-गेल्या दहा वर्षांत या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय, याचे काहीच वाटत नाही तुम्हाला? राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहात ना तुम्ही?
-सगळे हाताबाहेर चाललेय. कळते पण वळत नाही. माझ्या जागी दुसरा कुणी असता तर आजच्यापेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती. म्हणून तर दिल्लीने मला ठेवलेय इथे. गृहमंत्रीपदाचे बोलशील तर शेवटी सगळी पॉवर त्या एका पदातच असते. ते सहजासहजी नाही सोडणार मी. दसर्याच्या उत्सवी वातावरणात मी एकच संकल्प करीन की माझ्या आणि माझ्या पक्षाच्या हितासाठी मी काहीही करीन. जनतेला नेहमी आपली आणि आपल्या पक्षाची चांगली बाजू दाखवण्याचा आणि विरोधकांवर खोटेनाटे आरोप करून जनतेच्या मनातून त्यांना उतरविण्याचा प्रयत्न करीन.
त्यानंतर पोक्याने दिल्लीला जाऊन पंतप्रधानांची मुलाखत घेतली.
-नमस्कार मोदीजी.
-नमस्कार पोक्याजी. क्या हाल है?
-हालच हाल आहेत मोदीजी. महागाई इतकी वाढलीय की जनतेला जगणे मुश्कील झालेय. निदान येत्या दसर्याच्या मुहुर्तावर आपण जनतेसाठी काही दिलासा देणारा संदेश द्याल अशी आशा आहे. नाहीतर दसर्यानंतर दिवाळे निघेल दिवाळीत.
-संदेसा बिंदेसा हम कुछ नही देंगे. आम्ही जनतेसाठी दहा वर्षात इतके काही केलेय की आता करण्यासारखी एकही गोष्ट उरलेली नाही. जबाबदारीने न वागणार्या जनतेसाठी आम्ही का म्हणून काही करावे? मी तर सांगितलेय की जनतेने कमीत कमी पैशात सुखाने कसे जगता येतील हे पाहावे. सोन्याचे दागिने खरेदी करू नका. महागडे कपडे खरेदी करू नका. साधे अन्न खा. वायफळ खर्च करू नका. भरपूर पाणी प्या. बचत केलीत तर हाच पैसा उद्या तुमच्या कामी येईल. लग्नसमारंभातला डामडौल टाळा, परदेशवार्यांवर खर्च करू नका. आपले घर हाच आपला स्वर्ग आहे. माता-पित्यांची, पत्नीची, मुलाबाळांची, नातेवाईकांची, मित्रमंडळींची काळजी घ्या. माझा आदर्श ठेवा. आज सगळे जग माझ्यासमोर नतमस्तक होते. फक्त ती जेन झी वाली पोरे ऐकत नाहीत. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतायत म्हणे! इतकी सोपी गोष्ट नाही ती. औकातीत राहा. ते सोडून बाकी सर्वांना दसर्याच्या शुभेच्छा!

