आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेतल्यास ती एक भळभळती सोनेरी जखम आहे. सुवर्णपदकांच्या संख्येत झालेली सातची घट आणि एकंदर २१ पदकांची तफावत भारताच्या कामगिरीतील नकारात्मक वास्तव समोर आणणारे ठरली. २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेकडे वाटचाल करताना ह्या कामगिरीचा कसा अन्वयार्थ लावायचा?
चला, आयची-नागोया (जपान) येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चौथे स्थान राखण्यात यश मिळवले. प्रारंभीच्या दिवसांत वणवण सहन केल्यानंतर अखेरच्या दोन दिवसांतील ११ सुवर्णपदकांची लयलूट भारतासाठी दिलासादायी ठरली. भारताने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य अशी एकूण ८५ पदके कमावली. तर हांगझो (चीन) २०२३च्या याआधीच्या स्पर्धेत २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४० कांस्य अशी एकूण १०६ पदके प्राप्त केली होती. म्हणजेच २१ पदके कमी मिळाली. आकडेवारीकडे आणखी गांभीर्याने पाहिल्यास ७ सुवर्ण, ११ रौप्य आणि ३ कांस्य अशी उणावणारी तफावत राहते. सुवर्णपदकांची कमतरता संघाचे स्थान ठरवत असली आणि ते राखण्यात यश आलं असलं तरी एकंदरीत भारताच्या कामगिरीत घसरण झाली, असे म्हणता येऊ शकेल. पण, २०२२च्या आधीच्या एशियाड स्पर्धांशी तुलना केल्यास ह्या दोन स्पर्धांमधील वाटचाल अधिक समाधानकारक आहे, असे म्हणावे लागेल.
भारताने २०१०च्या गुवांगझो एशियाडमध्ये ६५ पदके, २०१४च्या इनचॉन एशियाडमध्ये ५७ पदके आणि २०१८च्या जकार्ता एशियाडमध्ये ७० पदके कमावली होती. तर भारताचे स्थान होते, अनुक्रमे सहावे, आठवे आणि आठवे. यंदाच्या स्पर्धेत भारताने २४.७० टक्के पदकांचे सुवर्णपदकांत रूपांतर केले. मागील एशियाडमध्ये ही टक्केवारी २६.२० टक्के होती. भारताप्रमाणेच चीन, जपान आणि कोरियाने पहिले तीन क्रमांक कायम राखले. अर्थात तिसरा क्रमांक भारतापासून त्यावेळीही दूर होता आणि यावेळीही दूर राहिला. कोरियाने २०२३मध्ये ४२ सुवर्णपदकांसह एकूण १९० पदके कमावली होती, तर यावेळी त्यांनी ३९ सुवर्णपदकांनिशी एकूण १५० पदके जिंकली होती. अॅथलेटिक्स आणि नेमबाजीमधील अपयश यांचा भारताच्या घसरणीत महत्त्वाचा वाटा आहे.
अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक निराशा
भारतीय पथकात सर्वाधिक क्रीडापटू अॅथलेटिक्सचे होते. स्वाभाविकपणे सर्वाधिक निराशाही याच क्रीडा प्रकाराकडून झाली. २०२३च्या हांगझो एशियाडमध्ये भारताने अॅथलेटिक्समध्ये ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण २२ पदके मिळवली होती. यंदा भारताने एकूण २४ पदके कमावली; म्हणजे पदके अधिक. पण यात १ सुवर्ण, ९ रौप्य आणि १४ कांस्यपदकांचा समावेश होता. जे एकमेव सोनरी यश मिळाले, ते ४ बाय ४०० मीटर महिला रिलेमधील आहे. अॅथलेटिक्समध्ये ६ सुवर्णपदके कमी मिळाली, तर कांस्यपदके ८ अधिक कमावली. हीच चिंतेची बाब ठरली. पारूल चौधरीने पाच हजार मीटर शर्यतीत जेतेपद गमावले आणि दोन कांस्यपदके पटकावली. यात ३००० मीटर स्टिपलचेसच्या विक्रमाचाही समावेश होता. अविनाश साबळे पदक मिळवण्यात अपयशी ठरला.
तजिंदरपाल सिंगला रुपेरी पदकावर समाधान मानावे लागले. मागील एशियाडचे दोन सुवर्णपदक विजेते क्रीडापटू नीरज चोप्रा आणि अन्नू राणी यावेळी सहभागीच झाले नाहीत. मुरली श्रीशंकरने रौप्यपदक पटकावले. सावन बरवालने भारताची ४४ वर्षांची मॅरथॉन पदकाची प्रतीक्षा संपवताना रौप्य पदक जिंकले. विठ्या रामराजने पीटी उषाचा १९८४चा विक्रम मोडीत काढत कांस्यपदक मिळवले. अॅथलीट्सची कामगिरी का खालावली, याचे मूल्यमापन भारतीय अॅथलेटिक्स महासंघाकडून होण्याची नितांत आवश्यकता आहे.
‘सुवर्णलक्ष्य’ का चुकले?
अॅथलेटिक्समध्ये एकूण पदकसंख्येत वाढ दिसली; पण नेमबाजीतील अपयश प्रकर्षाने जाणवते आहे. कारण भारताने यंदा ३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण १५ पदके प्राप्त केली. तर मागील एशियाडमध्ये ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण २२ पदकांची कमाई केली होती. एकंदर वजावट ही सात पदकांची. ४ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदकांची ही घसरण ही नेमकी कशामुळे झाली? ईलाव्हेनील व्हॅलारव्हियानचे सुवर्णपदक निसटले. तिलोत्तमा सेनला पदकाने हुलकावणी दिली. कमलजित आणि सुरूची जोडीने मिश्र एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले. कयान चेनायने वैयक्तिक ट्रॅपसह मिश्र गटातही सुवर्णपदक मिळवले. पण रायफल चमू आणि वैयक्तिक पिस्तूल प्रकारातील कामगिरी सहज दिसून येते. यातून धडा घेण्याची आवश्यकता आहे.
अन्य अपयशी क्रीडा प्रकार
स्क्वॉशमध्ये २०२३च्या एशियाडप्रमाणेच पाच पदके मिळवली. पण त्यावेळी दोन सुवर्णपदकेही त्यात होती. यावेळी ती जागा शून्याने घेतली. एकेरीत अनाहत सिंग आणि अभय सिंग यांना आपल्याहून क्रमवारीत सरस असलेल्या खेळाडूंविरुद्ध अंतिम अडथळा ओलांडता आला नाही. उपांत्य फेरीत गतविजेत्या पुरुष संघाने मलेशियाकडून हार पत्करली, तर महिला संघाने हाँगकाँगकडून पराभव पत्करला. त्यामुळे दोन कांस्य पदके पदरी पडली. बॅडमिंटनमध्ये २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके खात्यावर होती. यावेळी फक्त एक कांस्यपदक पुरुष संघाने मिळवले. सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी सलामीच्या लढतीतच गारद झाले. आयुष शेट्टीने सहज शरणागती पत्करली, तर लक्ष्य सेन खडतर झुंज देऊन पराभूत झाला. पीव्ही सिंधू, उन्नती हुडा, त्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, तनिशा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला हे बॅडमिंटनपटू क्रमवारीत उच्च असलेल्या खेळाडूंकडून हरल्याने किमान कांस्यपदकही कमावू शकले नाहीत.
कॅनोइंग, सायकलिंग, अश्वशर्यत, ई-स्पोर्ट्स, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, ज्युडो, कराटे, रग्बी, स्पोर्ट्स क्लायम्बिंग, सर्फिंग, जलतरण, तायक्वांडो, टेनिस, टेकबॉल, व्हॉलीबॉल ह्या क्रीडा प्रकारांच्या क्रीडापटूंनी फक्त जपानवारी केली. ते पदकापासून वंचित राहिले. 
यशस्वी वीर!
भारताच्या यशाचा आढावा घेतल्यास सर्वाधिक पाच सुवर्णपदके तिरंदाजीत कमावलेली आहेत. याशिवाय प्रत्येकी दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण नऊ पदके. म्हणजेच २०२३ची पुनरावृत्ती. महिला वैयक्तिक आणि सांघिक रिकर्व्ह प्रकारातील दोन सुवर्णपदके ही १७ वर्षीय कुमकुम मोहोदही किमया. तिने कोरियाविरुद्ध लक्षवेधी पराक्रम गाजवला. कुस्तीमध्ये २०२३प्रमाणेच सहा पदके मिळवली. पण यावेळी त्यात अमन शेरावत आणि सुजीत कलकल यांनी मिळवलेली दोन सुवर्णपदकेही होती. हांगझोपेक्षा तीन कुस्तीपटू कमी गेले असतानाही ही कामगिरी कौतुकास्पद म्हणायला हवी. क्रिकेटमधील वर्चस्वाला साजेशी सुवर्णपदके राखणारी कामगिरी भारताने केली. पुरुषांची आंतरराष्ट्रीय मालिका सुरू असतानाही श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराचा समावेश असलेला भक्कम संघ भारताने तिथे पाठवला. जपानविरुद्धच्या सामन्यात भारताला झगडायला लागले; पण, पाकिस्तानविरुद्धचा अंतिम सामना आरामात जिंकत भारताने सोनेरी कर्तृत्व दाखवले. त्याआधी महिला संघाने श्रीलंकेवर मात करीत सुवर्णपदकाची नोंद केली. हॉकीमधील दुहेरी सुवर्णभरारीसुद्धा अशीच प्रेरणादायी. उपांत्य सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ४-३ असा रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर अंतिम सामन्यात मलेशियाला आपण ५-१ अशी आरामात धूळ चारली. भारतीय महिला संघाने तब्बल ४४ वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. वर्षारंभी शोर्ड मरिन परतल्यापासून भारतीय संघाने कात टाकली आहे. अंतिम सामन्यात भारताने चक्क ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या आणि गतविजेत्या चीनला १-० असे नामोहरम केले. कबड्डीत सुवर्णपदके हक्काचीच मानली जात होती. पण, २०१८च्या कटू अनुभूतीनंतर इराणी अडथळा ओलांडणे, हे क्रमप्राप्त होते. अपेक्षेप्रमाणे दोन्ही अंतिम सामन्यांत इराणच प्रतिस्पर्धी संघ होता. भारतीय पुरुष संघाने फजल अत्राचाली आणि मोहम्मदरेजा शादलूचा समावेश असलेली इराणी भिंत ४०-३४ अशी भेदत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या कबड्डीमध्ये आतापर्यंतचे नववे सुवर्णपदक काबीज केले. दुसऱ्या सत्रात उतरलेल्या महाराष्ट्राच्या अस्लम इनामदारने या विजयात लक्ष वेधले. तंदुरुस्तीचा अभाव असलेल्या पवन शेरावतने आता निवृत्ती पत्करावी, असेच त्याची कामगिरी सांगत होती. भारतीय महिला संघानेही इराणवर ३७-३४ अशी मात करीत सुवर्णयश मिळवले. त्यांचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेप्रमाणेच महिलांच्या अंतिम सामन्यात खराब पंचगिरी पाहायला मिळाली. त्यामुळे भारताला नाहक गुण गमवावे लागले. भारताच्या विजयात संजू देवी, पूजा हथवाला आणि निकिता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर कर्णधार पुष्पा राणाने दिमाखदार पकडी केल्या. सूर हरवलेल्या सोनाली शिंगटेला अंतिम सामन्यात विश्रांती देण्यात आली.
तूर्तास, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर आशियाई क्रीडा स्पर्धाही पार पडल्या आहेत. आता २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा दोन वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. आपण राष्ट्रकुलमध्ये १३ सुवर्णपदकांसह एकूण ३९ पदकांची कमाई केली होती. एशियाडमधील ह्या यशातून धडा घेत ऑलिम्पिकसाठी सज्ज होणे, हेच भारतापुढील प्रमुख आव्हान असेल.

