• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कागद

ऋषिराज शेलार अर्ध्या मुर्ध्या गोष्टी

Marmik Team by Marmik Team
October 9, 2026
in गावगप्पा, गावची गजाल, विनोदी लेख
0
कागद

चित्र-आशुतोष वाळे

“आये, माझं दहावीचं मार्कशीट कुठंय?” अर्ध्या आरवला. तशी म्हातारी तणतणत घरात आली.
“तुह्या कागदांना कोण कश्याला हात लावील? तुला आवरून ठेवता येत नाही का?” म्हातारी उलट कावली.
“पण माझ्या बॅगला हात लावतंच कोण? ती कपाटात घालेल होती. इथं टांगली कोणी?” अर्ध्याची चिडचिड चालू झाली. हा आता दोन दिवसांनी इंटरव्ह्यू म्हंटल्यावर कागद शोधणं आलंच! आणि शोधाशोध करताना मागं काय कुठं ठेवलेलं होतं नि ते सापडेल कुठे हे सांगता येणं कठीण!
“भानावर राहतो का तू? ठेवतो कुठं? दोन दिवस इथं टेबलवर पडेल होतं. तुझ्या बापानं वर टांगलं. एवढी काळजी होती, तर त्वाच उचलून ठेवायचं ना?” म्हातारी खवळली.
आता रे? अर्ध्या गार झाला.
“पण माझं ते दहावीचं मार्कशीट सापडत नाहीय, तू कुठं पाहिलं का?” अर्ध्यानं गपगुमान म्हातारीला विचारलं. एव्हाना त्यानं अख्खी बॅग कोंबडीगत उलटी पकडून झटकली. पण एकदोन आत्राबे कागद वगळता काहीच खाली पडलं नाही.
“दिसलं तर पाहिल ना? तेवढी बॅगच व्हती टेबलावर. तुह्या बापानं धरून वर टांगली. दुसरं कोण लावायचंय हात त्याला?” म्हातारी थोडी झुकून पाहायला लागली.
“अगं पण नेमकं दहावीचं सर्टिफिकेटच नाहीय गं. बाकी सगळं जागच्या जागी आहे बघ!” अर्ध्याची कुणकुण काही मिटेना.
“तुझे कागदं तुला जपून ठेवता येत नाही व्हय? आम्हाला रे काय काम त्याचं? इथं उचकपाचक करायला आपल्याशिवाय आहे कोण?” म्हातारीनं वर अर्ध्याला सवाल केला.
“अय अर्ध्या, चालायचं नाही का?” नम्या दारातून डोकावला.
“ये तूच राहिला.” म्हातारी खोचकपणे बोलली.
“मावशी लै चिडल्या?” नम्याचं लक्ष अर्ध्याच्या म्हातारीकडं गेलं.
“काही नाही रे! दहावीचं मार्कशीट गावंना.” अर्ध्यानं पटकन मधी उडी घेतली. नको वातावरण तापायला.
“पण कश्याला पाहिजे तुला?” नम्यानं थेट सवाल केला, आणि अर्ध्याजवळ जाऊन उभा राहिला.
“ते तू सांगितलं त्या कंपनीत इंटरव्ह्यूला जायला सगळी फाईल लावून ठेवतो ना!” अर्ध्यानं हेतू सांगितला.
“ये पोरा जेवला का? दोन घास खातो का?” म्हातारीला माया फुटली.
“नको मावशी मी जेवून आलो. पण काय भाजी केलीय?” नम्यानं नकार दिला खरा. पण न राहवून त्यानं विचारलंच!
“काळं कालवण केलं डुबुक वड्याचं! खातो का?” म्हातारीनं सांगितलं तसं नम्याच्या डोळ्यात ससे चमकले.
“आता थोडं काम आहे. तेवढं करून येतो ना मावशी! पण भाकर आहे का? चुरून खायला बरं!” नम्याचं पुढलं नियोजन चालूय.
“माझं काय? तुमचं काय..?” अर्ध्या वैतागला. इथं मार्कशीट सापडेना अन् नम्याला भाकऱ्या कुस्करायचं पडलं.
“चाल मग! दुपारी आल्यावर शोधू. चाल… चाल!!” नम्या घाईला उतरला. आता काय करावं? अर्ध्यानं डोकं खाजवलं. त्यानं बॅग पुन्हा टांगवली आणि अर्ध्या आणि नम्या दोघं बाहेर पडले.
“लवकर या रे!” म्हातारीनं पोरांना आवाज दिला.
नम्या आणि अर्ध्या बाहेर पडले. पण जायचं कुठं? हे अर्ध्याला माहीत नव्हतं. पण नम्या बोलला म्हणजे काही काम नक्कीच असंल. म्हणून तो त्याच्याबरोबर निघाला. दोघं मोटरसायकलवर निघाले. कुठं? ते फक्त नम्यालाच माहीत. नम्यानं मोटरसायकल जिल्हा परिषद शाळेसमोर आणली. तिथं रवी आणि त्याचा लहान पुतण्या उभे.
“काय रे काय अर्जंट काम काढलं?” नम्यानं गाडी त्यांच्या जवळ थांबवली.
“हे नाव रे!” रवी काही बोलायला बघू लागला.
“नावाचं काय करायचं? बदलायचं असंल तर गॅजेट करत्या ना?” अर्ध्याचं वेगळंच!
“अरे येड्या, याला नोटीस आलीय.” रवीनं अर्ध्याला सुनावलं. रवीनं पुतण्याकडं बोट केलं.
“काय झगडेबिगडे केलेत का?” अर्ध्याला वेगळीच शंका!
“अरे पोलिसांची नाही रे!” नम्याला अर्ध्याची दया आली. कसा हा निर्बुद्ध?
“मग रे? कोर्टाची का बँकेची?” अर्ध्या आणखीच बावचळला.
“हा, त्यानं तुझ्या हाफ मर्डरसाठी बँकेतून कोयते घ्यायला कर्ज काढलं होतं. ते पुरं झालं नाही म्हणून कोर्टानं बँकेच्या मागणीवर नोटीस धाडली! झालं समाधान? खरंच अर्धाच आहे बाबा हां!” रव्यानं संतापून अर्ध्याला फैलावर घेतलं.
“माला सांगाल तर कळंल ना? एवढं बोलत्या का कुणाला?” अर्ध्याचं तोंड उतरलं.
“अरे तू पूर्ण ऐकून तर घेत जा! तो काय म्हणतो आहे ते!” नम्यानं अर्ध्याला समजवायचा प्रयत्न केला.
“तेचं मरू दे! ह्या कागदाचं काय करू बोल!” रवीनं नम्या पुढं कागद धरला. नम्यानं कागद ओढला. आणि वाचू लागला.
“हे कोणाचं नाव आहे?” नम्याचा पहिला प्रश्न!
“अरे याचं आहे ते!” रवीनं त्याच्या पुतण्याकडं बोट दाखवलं!
“त्याची एसआयआरची नोटीस आहे ही!” नम्यानं शोध लावला.
“मग मी वेगळं सांगत होतो का?” रव्याचा डोळे रोखून सवाल.
“बघू! अशी राहती? आयला मला वाटलं…”
“तुला काय वाटलं? लग्नपत्रिकेवानी राहती?” रव्या तिरसटासारखं बोलला.
“अरे म्हणजे कधी बघितली नव्हती.” अर्ध्यानं सावरायचा प्रयत्न केला.
“आम्ही तर रोज ह्या नोटिसात शेंगदाणे बांधून धंदे करतोय!” रव्याचा राग तसूभरही कमी झाला नाहीच.
“ऐ बाबा! थोडं थंड घे ना!” नम्यानं रवीला शांत केलं.
“एवढं भडकायला काय झालं? मी सहज विचारू राह्यलो तर…”अर्ध्या नाराजीनं बोलला.
“ऐ बाबा! कळलं ना! आता विषयावर बोलू या का?” नम्यानं मिटवतं घेतलं.
“मग याला उत्तर द्यायला वकील लागतो का?” अर्ध्या विषयाला बिलगला.
“अय भौ! वकील-बिकिल लागत असंल तर मरू दे! नसलं यादीत नाव म्हणून जीव जायचा नाही. कोण रिकाम्या कोर्टाच्या फेऱ्या मारील?” रवी नुसत्या कल्पनेनं घाबरला.
“अरे कोर्ट-बिर्ट नसतं लगेच. माझ्यामते याच्यात जी कागदं सांगितलीत ती दिली का व्हईल सगळं.” नम्यानं रवीला धीर दिला.
“पण कागदं काय पाहिजे?” अर्ध्यानं कागदात डोकावत प्रश्न विचारला.
“हेच १९८७च्या आधीचं…” नम्या पहिली ओळ वाचायला लागला कुठं नाही तर रव्याला कंठ फुटला.
“काहीच मिळायचं नाही! इथं दोन वर्षापूर्वी त्याची कोपी जळली! अंगावरल्या कपड्यात त्याला मी बाहेर काढला…” रवीनं पहिलाच नकार कळवला.
“मग हे..? नसंल! हे..? शाळा सोडल्याचा दाखला?” जे मिळू शकेल अशी कलमं नम्या वाचू लागला.
“तो शाळात गेला कधी? हे लहान असतानापासून माह्या संगतीनं खड्डे खणायला येतो तो. हे चुलते-पुतणे मिळून तासात केवढी-मोठी पाईपलाईन टाकून देऊ! हां!” रवी पराक्रम सांगावा तसं कवतिक गायला लागला.
“मग जन्म दाखला?” किमान हा कागद तरी असेल ही नम्याची भाबडी आशा!
“ते नाही सांगता यायचं ब्वॉ!” रवीनं डोकं खाजवलं.
“अरे ज्या हॉस्पिटलमधी त्याचा जन्म झाला असंल, तिथून मिळेल ना!” अर्ध्यानं डोकं चालवलं.
“त्याचा जन्म पण घरीच झाला व्हता! त्याच्यातच त्याची आई वारली ना?” रवीनं त्याच्या पुतण्याची जलमकथा ऐकवली.
“मग वडील?” अर्ध्यानं प्रश्न केला.
“तो दारू ढोसून पडायचा इथं तिथं! एक दिवस विहिरीत पडला. अन् गेला.” रवी बोलायला लागला तसे अर्ध्या आणि नम्या हादरत सुटले.
“पण विहिरीत..?” नम्या काही विचारू गेला.
“विहिरीच्या कामावर जायचे ते! दगड फोडायला अन्… तोल जाऊन…” पोरगा कोरड्या डोळ्यांनी काही शब्द फक्त बोलला.
“मग काही कागदं? आज्याचे..?” नम्यानं फुंकून प्रश्न टाकला.
“कसलं काय? माह्या बापाला ते कधी जमलं नाही. मी रेशनकार्ड काढलं घराचं पहिल्यांदा! तवर आमच्याकडं काही तोंड पुसायला कागद नव्हता. त्याच्यात अख्ख्या जातीत कुणाकडं जमीन-जुमला नाही. त्यामुळं मी काय झटे घेतले, मलाच माहीत!” रव्यानं त्याची कर्मकहाणी ऐकवली.
“पण काही तरी यांच्यापैकी एखादा कागद पैदा करावा लागंल बाबा! नाहीतर नाव कापल्या जाईल.” नम्यानं डायरेक पराभव स्वीकारला!
“ते असतं तर तुला बोलावलं असतं का?” रवीनं रोकडा सवाल टाकला.
“पण कागद जपून ठेवायचे ना रे!” अर्ध्या काळजीनं बडबडला.
“येऊन बघ! त्याच्या झापात. तो त्याची बायको अन् पोरगी कशी राहत्या ते! इथं कुणी जीव जप म्हणाना! तू कागद जपायच्या गोष्टी करतोय!” रवी पुन्हा संतापला. ह्या बारक्या पोराचं लग्न झालं? अर्ध्या उडालाच!
“पण काही मार्ग सध्या तरी नाहीय रवी! तसं मी एकदोघांना विचारून कळवतो तुला! काही होत असलं तर!” नम्यानं थातुरमातुर उत्तर देऊन समाधान करायचा प्रयत्न केला.
“चल येतो मी! तसंबी बापजादेबी कुठल्या कागदाबिगर जगले! अख्खे कागद, अन् अख्खे नावं खोडले म्हणून आपुन काही मरायचो नाही. खोडा म्हणावं साल्यांना!! पण आम्हाला खोडता यायचंच नाही!” रव्या पुटपुटत पुतण्याला पुढं घालून निघून गेला.
अर्ध्या डोकं खाजवत बसला, काही माणसं कागदात कधीच सापडत का नसतील याचं कोडं सुटायला लागलं.

Previous Post

एकाकीपणावर एआयच्या मायेचा उतारा, किती खरा?

Next Post

रात्रही तापतेय; हा कसला विकास?

Next Post
रात्रही तापतेय; हा कसला विकास?

रात्रही तापतेय; हा कसला विकास?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.