हे मुखपृष्ठचित्र बाळासाहेबांनी १ मे १९६६ रोजीच्या अंकासाठी चित्रित केलेले आहे. म्हणजे त्याला आता ६० वर्षे झाली आहेत. हे चित्र म्हणजे शिवसेना या मराठी माणसांच्या राज्यात मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणार्या संघटनेच्या पायाभरणीचा एक दगड आहे. व्यंगचित्रकार बाळासाहेबांना शिवसेनाप्रमुख बनवलं ते मराठी माणसावर मराठी राज्यात होत असलेल्या अन्यायानेच. मुळात एखाद्या राज्यात, त्या राज्याच्या राजधानीत भूमिपुत्रांच्या हक्कासाठी संघटना काढावी लागते, ही किती लाजिरवाणी गोष्ट. त्याहून लाजिरवाणी गोष्ट म्हणजे आज ६० वर्षांनंतरही महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या राजधानीत चित्र तेच आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळापासूनच देशाच्या विविध मागास भागांमधल्या लोकांना पोटापाण्यासाठी, रोजीरोटीसाठी मुंबईची वाट धरायची सवय लागली. देशात कोणालाही, कुठेही रोजगार शोधायला जाण्याचा आणि तिथे वसण्याचा हक्क आहे, या तथाकथित राष्ट्रीय बाण्याचा सर्वाधिक फटका तेव्हा सर्वात प्रगत असलेल्या महाराष्ट्राला बसला. महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा चालत नव्हता तेव्हा, आता आपल्याविना महाराष्ट्रगाडा चालत नाही, असा या परप्रांतीयांना भ्रम झाला आहे. महाराष्ट्रात आज ५ खासदार, ३२ आमदार आणि राजधानी मुंबईत ७९ नगरसेवक अमराठी आहेत. हेच चित्र लवकरच ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि नाशिकमध्येही दिसेल, यात शंका नाही. मराठी माणूस तेव्हा वेगळ्या अन्यप्रांतीयांचा भार वाहात होता, आता आणखी वेगळ्या अन्यप्रांतीयांचा भार वाहतो आहे. त्यांना मराठी शिकायला लावण्याऐवजी आपण मोडकी तोडकी हिंदी बोलून स्वत:ची भाषा आणि संस्कृती उत्तर भारतीय बकालीत विसर्जित करून टाकतो आहे. आपला दख्खनी बाणा विसरून गोपट्ट्यात स्वेच्छेने सामील होतो आहे. हे चित्र बदलणार तरी कधी?
