• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अर्जेंटिना-इंग्लंड तेलयुद्ध भडकणार?

अ‍ॅड. नोएल डाबरे जगाच्या पाठीवर

Marmik Team by Marmik Team
October 1, 2026
in विशेष लेख
0
अर्जेंटिना-इंग्लंड तेलयुद्ध भडकणार?

फॉकलंड हा द्वीपसमूह दक्षिण अमेरिकेच्या टोकाला दक्षिण-पूर्व भागामध्ये वसलेला आहे. या द्वीपसमूहाचे एकूण क्षेत्रफळ ४,७०० चौरस मीटर इतके आहे. या द्वीपसमूहाच्या सगळ्यात जवळचा देश आहे अर्जेंटिना. या द्वीपसमूहालगत खनिज तेलाचे भांडार सापडलेले आहे, त्यावरून सध्या अर्जेंटिना आणि इंग्लंड या देशांमध्ये जुंपलेली आहे.

अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामधील वाद तसा नवीन नाही. या वादाला जवळपास २०० वर्षांचा इतिहास आहे. परंतु आताच्या वादाने निर्णायक वळण घेतलेले आहे. फॉकलंड बेटांचा ताबा सध्या इंग्लंडकडे आहे. येथील लोकांची भाषा आणि राहणीमान देखील इंग्रजी आहे. येथील लोक इंग्लंडच्या राजाला आपला राजा मानतात. आज तिथे केवळ ३,६०० लोकसंख्या आहे. तरी देखील हा द्वीपसमूह अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामधील कळीचा मुद्दा बनून राहिलेला आहे. या द्वीपसमूहामध्ये अकराशे कोटी पाउंड किमतीचे खनिज तेल सापडल्याचे नुकताच इंग्लंडने घोषित केले आहे. हे खनिज तेल काढण्यासाठी इंग्लंड आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे ‘सी लायन
ऑइल ड्रिलिंग’ प्रकल्प राबवण्याचे ठरविले आहे. इंग्लंडच्या घोषणेनंतर अर्जेंटिनामध्ये जनक्षोभ उसळला. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली यांना या जनक्षोभाची नोंद घ्यावी लागली. हा प्रकल्प रद्द न झाल्यास अर्जेंटिना या प्रकल्पात भाग घेणार्‍या सर्व कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लावेल अशी धमकी त्यांनी दिली. अर्जेंटिनामध्ये त्या कंपन्यांना कोणतीही कामे देण्यात येणार नाहीत आणि दिलेली कामे रद्द करण्यात येतील, असेही त्यांनी धमकावले. त्याचा एक भाग म्हणून नव्हिटास या इस्रायली तेल कंपनीवर ८ सप्टेंबरला फौजदारी खटला दाखल केला. अर्जेंटिनाच्या संमतीविना या कंपनीने तेल खोदकाम सुरू केले म्हणून ही कारवाई करण्यात आली. फॉकलंड हा अर्जेंटिनाचा भाग असून इंग्लंडने फॉकलंडचा ताबा अर्जेंटिनाला परत द्यावा अशी देखील मागणी त्यांनी केली. यावरून आंतरराष्ट्रीय राजकारण अचानक तापलेले असून जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामधील या ऐतिहासिक संघर्षाची माहिती घेणे आवश्यक ठरते.

१९८२ साली अर्जेंटिनाने फॉकलंड द्वीपसमूहावर हल्ला चढवून काही भूभाग स्वतःच्या ताब्यात घेतला. तोपर्यंतफॉकलंडवर इंग्लंडचे  नियंत्रण होते. फॉकलंड आपल्यापासून ४५० किलोमीटर अंतरावर आहे, इंग्लंडपासून १४,००० किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे इंग्लंड आपल्यावर काही कारवाई करणार नाही, असे अर्जेंटिनाच्या तत्कालीन सरकारला वाटले होते. त्यांचा हा भ्रम तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी ताबडतोब दूर केला. थेट इंग्लंडवरून फॉकलंडवर विमाने पाठवली. अण्वस्त्रसज्ज नौका फॉकलंडच्या दिशेने वळवल्या. अवघ्या तीन महिन्यांच्या आत अर्जेंटिनाला नमवले. अर्जेंटिनाकडे सैन्यबळ होते, पण हवाई क्षेत्रावर इंग्लंडचा ताबा होता. त्या जोरावर इंग्लंडने अर्जेंटिनाला नमवून अर्जेंटिनाच्या ११,००० सैनिकांना कैदी बनवले. या लढाईत खचलेल्या अर्जेंटिनाने हार मानली. तरीही फॉकलंडचा वाद दोन्ही देशांमध्ये सतत खदखदत राहिला. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

१५९२ साली इंग्लिश दर्यावर्दींनी पहिल्यांदा फॉकलंड बेटे शोधली. १६९०पर्यंत तिथे मनुष्यवस्ती नव्हती. १७६५मध्ये ब्रिटिशांनी तिथे वसाहत उभारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला अर्जेंटिनावर स्पेनचे प्रभुत्व होते. स्पेन हा एक ताकदवान देश होता. स्पॅनिश सैनिकांच्या विरोधामुळे ब्रिटिशांना तिथे १८११पर्यंत वसाहत स्थापन करता आली नाही. पुढे १८३३पर्यंत ब्रिटिश आणि स्पेन यांच्यामध्ये हल्ले-प्रतिहल्ले चालूच होते. त्यानंतर मात्र एकही गोळी न झाडता ब्रिटिशांनी फॉकलंड द्वीपसमूहावर निर्विवाद कब्जा जमवला. तिथून १८८५पर्यंत फॉकलंड द्वीपसमूहावर कब्जा ठेवण्यात ब्रिटिश यशस्वी राहिले. मध्यंतरी अर्जेंटिनामध्ये सत्ताबदल झाला. स्पेनच्या राजाचे वर्चस्व झुगारून देण्यात आले. एक सार्वभौम देश म्हणून १८६५ साली अर्जेंटिना अस्तित्वात आला. तेव्हापासून दुसर्‍या महायुद्धापर्यंत फॉकलंड द्वीपसमूहावरून उभय देशांमध्ये वादविवाद चालू राहिले. दुसर्‍या महायुद्धानंतर अर्जेंटिनाने फॉकलंडच्या स्वामित्वाचा प्रश्न संयुक्त राष्ट्रात दाखल केला. संयुक्त राष्ट्राने हा वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु १९८२पर्यंत हा वाद मिटला नाही. अचानकपणे अर्जेंटिनाने फॉकलंड द्वीपसमूहावर चाल केली. त्याची परिणती वर वर्णन केल्याप्रमाणे झाली.

आता मात्र या द्वीपसमूहाचा प्रश्न अतिशय उग्र बनलेला आहे. या द्वीपसमूहामध्ये उच्च प्रतीचे ५०० कोटी बॅरल खनिज तेल सापडलेले आहे. एखादी अर्थव्यवस्था बदलून टाकण्याचे सामर्थ्य या तेलभांडारामध्ये आहे. अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेला अशा तेलभांडाराची अत्यंत आवश्यकता आहे. आर्थिक प्रश्नांनी अर्जेंटिना बेजार झालेला आहे. बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढलेले आहे. महागाई हाताबाहेर गेलेली आहे. अर्जेंटिनाच्या पेसोचे मूल्य डॉलरच्या तुलनेत प्रचंड घसरलेले आहे. त्यामुळे सी लायन ऑइल ड्रिलिंग कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लावण्याच्या धमक्या अर्जेंटिनाच्या अध्यक्षांनी दिलेल्या आहेत. त्यात त्यांची एक चाल आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जेवियर मिली यांचे परममित्र आहेत. दोघांनी एकमेकांना त्यांच्या निवडणुकीत पूर्ण पाठिंबा जाहीर वेâला होता. १९८२ सालची परिस्थिती आता बदललेली आहे. १९८२मध्ये इंग्लंडच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर होत्या. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन होते. दोघेही एकमेकांचे दोस्त होते. त्या युद्धामध्ये रीगन यांनी थॅचर यांना उघड पाठिंबा दिला होता. त्यामुळे इंग्लंडमधून निघालेली विमाने अमेरिकेच्या विमानतळावर पोहोचत आणि तिथून फॉकलंड बेटावर हल्ला करीत. आता परिस्थिती पूर्ण पालटली आहे.

अमेरिका आणि इंग्लंड जरी नाटो संघटनेचे सदस्य असले तरी त्यांच्यात सख्य राहिलेले नाही. इंग्लंडने अमेरिका-इराण युद्धात अमेरिकेच्या बाजूने उतरण्याचा निर्णय घेतला नाही. यामुळे ट्रम्प खवळलेले होते आणि अजूनही खवळलेले आहेत. अर्जेंटिनाने घेतलेल्या पवित्र्यानंतर ट्रम्प यांना ५ सप्टेंबरला त्यांच्या भूमिकेबाबत विचारण्यात आले तेव्हा ‘मी यात लक्ष घालतो’ एवढेच ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी आपले वजन अर्जेंटिनाच्या पारड्यात टाकले तर इंग्लंड आणि अर्जेंटिनामधील तेलयुद्ध चिघळू शकते. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.

Previous Post

भाषावार प्रांतरचना आणि डॉ. सी. डी. देशमुख!

Next Post

आदिवासी आश्रमशाळांची दुरवस्था दूर कधी होणार?

Next Post
आदिवासी आश्रमशाळांची दुरवस्था दूर कधी होणार?

आदिवासी आश्रमशाळांची दुरवस्था दूर कधी होणार?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.