
गाव झानुटा. जेरुसलेमच्या दक्षिणेला. पॅलेस्टिनी गाव. आसपासच्या जमिनीवर गुजराण करणारी माणसं. एके रात्री घरघर ऐकू आली, लोक जागे झाले. जे आजवर कानावर येत होतं ते आता घडणार आहे याची जाणीव झाली. गाव जागं होई होईपर्यंत वाहनं आणि बुलडोझर गावात पोचले. वाहनांच्या टपावर इस्रायलचे लष्करी गणवेश घातलेले लोक होते. त्यांच्या हातात बंदुका होत्या. डोक्यावरच्या टोपीतून लांबलांब वेण्या कानावरून खांद्यापर्यंत लोंबत होत्या. म्हणजे हे पेशेवर सैनिक नव्हते. हे स्वयंसेवक सैनिक होते. त्यांच्यावर जबाबदारी त्यांच्या वस्तीचं रक्षण करणं. वस्ती म्हणजे सेटलमेंट. इस्रायली लोकांनी अरबांच्या जागेवर उभ्या केलेल्या वस्त्या. बेकायदेशीर वस्त्या, सरकारचं त्यांना संरक्षण.
वाहनं गावाच्या वेशीवर थांबली. वाहनांवरचे ‘सैनिक’ शिट्या वाजवत उतरले. बंदुकी उगारून सांगू लागले की चला, घरं सोडा, चालते व्हा.
जमीन पॅलेस्टाईनची. इस्रायलची नव्हे. तांत्रिकदृष्ट्या या जमिनीच्या म्हणजे भूभागाच्या कारभाराची जबाबदारी स्वायत्त
पॅलेस्टाईन सरकारवर. सध्या गाझा विधानसभेत हमासचं बहुमत असल्यानं, सरकार हमासचं आहे. पण कुठंही गावकर्यांचं रक्षण करण्यासाठी पोलिस नाहीत. पॅलेस्टाईन सैनिक तर ठेवूच शकत नाहीत. त्यामुळं झानुटाचे गावकरी वार्यावर.
बोचकी डोक्यावर घेऊन लोक घराबाहेर पडले. भिंती होत्या म्हणून घर म्हणायचं अशी घरं, तंबू सोडून बाहेर पडले. दिशाहीन पळत सुटले. कुठे जाणार? काय करणार? कसं जगणार? विचारही करायला वेळ नाही. गाव रिकामं झालं.
एका घरात रेझिम नावाचा ७७ वर्षांचा म्हातारा शिल्लक होता. त्याला धड चालताही येत नव्हतं. बसल्या जागी तो आणि त्याच्या भोवताली त्याची गाढवं. हीच त्याची संपत्ती. सैनिकांनी त्याच्या छातीला बंदुक लावली. ढकललं. लडखडत रेझिम उठला. खड्डे चुकवत चालू लागला. अंधारात नाहीसा झाला. गावातला तो शेवटला माणूस.
बुलडोझर सरकले. घरं, तंबू, जनावरं आणि कोंबड्या ठेवण्याची खुराडी, पाण्याच्या टाक्या, जमीनदोस्त झाल्या. काही मिनिटात गाव सपाट झालं. बुलडोझरनं सगळ्या गोष्टी लोटून दूर नेल्या, त्यांचे ढीग केले, जमीन सपाट केली.
दुसर्या दिवशी ट्रकची रांग लागली. त्यात घरांचे तयार सुटे भाग रचलेले होते. ़क्रेननं ते भाग उचलले, जमिनीवर एकावर एक, एका बाजूला एक अशा रीतीनं रचले. झाली घरं तयार. भितींचे सुटे भाग ट्रकमधून उतरवण्यात आले. सेटलमेंटच्या भोवती भिंती उभ्या राहिल्या. भिंतीवर तारेचं कुंपण. भिंतीला एकच दरवाजा. भिंतीवर दोन ठिकाणी टेहळणी मनोरे. त्यावर सैनिक मशीनगन घेऊन उभे राहिले.
गाव तयार झालं
बेकायदेशीर गाव. पॅलेस्टिनी लोकांना हाकलून तयार केलेलं गाव. ही गावं बेकायदेशीर आहेत, असा ठराव युनोनं एकदा नव्हे, अनंत वेळा केला आहे. युनो ठराव करत रहातं. इस्रायली लोक नवी गावं तयार करत रहातात.
****
सरसकट गाझावर बाँबिंग? युनायटेड नेशन्सच्या इमारतींवर बाँबिंग? अँब्युलन्स आणि हॉस्पिटलवर बाँबिंग? दोन आठवडे वय असलेलं मूल, पाच सातच्या आसपास वयं असणार्या मुलांवर बाँबिंग?
बाँबिंगही नाही. इतर बरंच अल तिरान. गावात पाच कुटुंब रहात असत. शंभर माणसं, ३५ मुलं. ५०० मेंढ्या. ओदे अबु शारा हे ७५ वर्षांचे गृहस्थ सर्वात सीनियर. त्यांचे वडील या गावात ११० वर्षींपूर्वी जन्मले होते. गाव टेकडीच्या पायथ्याशी आहे. टेकडीवर इस्रायलींची सेटलमेंट होती. ऑक्टोबरमध्ये इस्रायलनं गाझावर आक्रमण सुरू केलं, तेव्हापासून टेकडीवरच्या सेटलमेंटमधून धमक्या येत. गाव मोकळं करा. गावकरी का म्हणून गाव सोडून जातील? शंभर वर्षांपासून ते या गावात आहेत. इस्रायलनं १९४८ साली पॅलेस्टाईनमध्ये ठाण मांडलं तेव्हा हे अरब वस्तीचं गाव अरब होतं, इस्रायल झालेलं नव्हतं. युनोचा ठराव, जगभरच्या देशांनी केलेल्या अनेक ठरावांनुसार हे गाव पॅलेस्टाईन हे राज्य व्हायचं होतं.

आसपास बाँब कोसळत होते. ११ नोव्हेंबरच्या शनिवार सकाळी १० वाजता गावात दोन तरुण ट्रकनं गावात पोचले. त्यांच्या हातात बंदुका होत्या. ते टेकडीवरचे तरुण होते, गावातल्या लोकांनी त्यांना पाहिलं होतं. मेंढ्यांच्या कळपात त्यांनी ट्रक घुसवला, मेंढ्या सैरावैरा पळू लागल्या. मेंढ्या सांभाळणारी मुलं त्यांना एकत्रित करायच्या प्रयत्नात होती. बंदुकधारी तरुणानं एका मुलाच्या डोक्याला बंदुकीची नळी लावली. ‘चालते व्हा. तुम्हाला २४ तास देतोय.’
ते गेले. नंतर दुपारी आणखी दोघं आले. शिवीगाळ करून चालते व्हा, असा आदेश देऊन निघून गेले. रात्री परत येणार आहोत असं म्हणाले. त्या रात्री आले नाहीत, रविवारी रात्री आले. साताठ जणांची टोळी होती. काहींनी सैनिकी गणवेश घातले होते. त्यांच्या हातात लाठ्या आणि दगड होते. ट्रकमधून उतरल्या उतरल्या त्यांनी दगडफेक करून घरांच्या काचा फोडल्या. गावकरी घरात लपून राहिले. लाठीधारींनी जाहीर केलं ‘तुम्हाला कालच जा म्हणून सांगितलं होतं. गेला नाहीत. रांडेच्च्यानो, आणखी २४ तास देतोय. जाताना त्यांनी गावातली पाण्याची टाकी फोडली, काही घरात घुसून धान्याची पोती फाडून धान्यं चहूकडे फेकलं.
गावकर्यांनी गाव सोडलं, गावाबाहेर कडेकपारीत वस्ती केली, तिथं कामचलावू आडोसा तयार केला. रात्री तिथं मुक्कामाला गेले, दिवसा गावात मेंढ्या राखण्यासाठी परतले. एकदा रात्री गावाबाहेरच्या तंबूत परतले तेव्हा इस्रायली वाहनं, बुलडोझर आले. घरं उद्ध्वस्त केली. जनावरं पळवली.
दुसर्या दिवशी गावकरी गावात परतले तेव्हा कशाचाही मागमूस नव्हता. आता इथं जगणंच अशक्य आहे, हे लक्षात आल्यावर बोचकी खांद्यावर घेऊन दक्षिणेला इजिप्तच्या दिशेनं गावकरी गेले. ते कुठल्या तरी निर्वासित छावणीत गेले असणार. कुठल्या ते कळायला मार्ग नाही.
******
१३ एप्रिल २०२५.
अल अरब हॉस्पिटल.
गाझातलं एकमेव ख्रिस्ती मिशननं चालवलेलं हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार केले जात असत. पहाटे एका डॉक्टरला फोन आला. ‘पुढल्या २० मिनिटात या हॉस्पिटलपासून दूर सुरक्षित जागी जा. हल्ला होणार आहे.’ डॉक्टर एका छोट्या मुलावर शस्त्रक्रिया करत होता. शस्त्रक्रिया अर्धवट कशी ठेवणार? डॉक्टरनं काय केलं माहीत नाही. पटापट आवराआवर करून तो बाहेर पडला. बाहेर इस्रायलच्या लोकांनी २० मिनिटांची मुदत जाहीर केली होतीच. हॉस्पिटलमधील पेशंट व्हील चेअरवर व स्ट्रेचरवरून बाहेर काढले जात होते. त्यांचे उरलेले उपचार कुठं होणार होते? आता गाझात एकही हॉस्पिटल शिल्लक नव्हतं. लोक सैरावैरा पळत होते. हॉस्पिटलच्या अंगणात एक चर्च होतं. माणसं तिथं आश्रयाला गेली. पण तिथंही २० मिनिटांची सूचना दिली गेली होती. चर्च मोकळं करा. विमानातून दोन बाँब टाकण्यात आले. प्रचंड जाळ हवेत पसरला. एका बाँबनं हॉस्पिटल मोडलं. दुसर्या बाँबनं कंपाऊंड उद्ध्वस्त झालं, तिथं उभी असलेली वाहनं नष्ट झाली. चर्चचीही मोडतोड झाली.
रूग्ण कसे बसे कुठे तरी गेले, त्यांचं काय झालं ते कळलं नाही. एक छोटा मुलगा मात्र या धावपळीत मेला. इस्रायलच्या लष्करानं पत्रक काढलं ‘अल अरब हॉस्पिटल हा हमासचा अड्डा होता, तिथून ते हालचाली करत, प्रस्तुत बाँब हल्ल्यानंतर हमासचे हल्लेखोर ठार झाले.’
फक्त एक मुलगा ठार झाला. बाकी शे दोनशे माणसं जखमी झाली. एकही प्रेत किंवा जखमी शरीर इस्रायलनं हमासच्या माणसाचं आहे असं दाखवलं नाही. ऑक्टोबर २०२३पासून पॅलेस्टाईनवर केलेल्या आक्रमणात अगदी पहिल्या दिवसापासून इस्रायलचा हॉस्पिटलांवर डोळा होता.
२०२३ साली झालेले हल्ले
१७ ऑक्टोबर. अल अहली हॉस्पिटलच्या आवारात इस्रायली विमानानं बाँब टाकले. तिथे हजर असणारी शे दोनशे माणसं मेली. इस्रायलनं जाहीर केलं की हा हल्ला इस्रायलनं केलेला नसून हमासचं रॉकेट या चुकीच्या जागी फुटल्यानं स्फोट झाला. इस्लामिक जिहादनं आरोप फेटाळला.
३ नोव्हेंबर. अल शिफा हॉस्पिटल.
हॉस्पिटलकडं निघालेल्या, पोचलेल्या अँब्युलन्सवर बाँब टाकण्यात आले. काही शेकडो रूग्ण, नातेवाईक, डॉक्टर मेले.
२१ नोव्हेंबर. अल अवदा हॉस्पिटल. तिथं डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर या आंतरराष्ट्रीय डॉक्टरांच्या संघटनेचे तीन डॉक्टर काम करत होते. त्यांना ठार मारण्यात आलं.
२०२४ मध्ये झालेले हल्ले
२२ जानेवारी. खान युनिस मधील नासर हॉस्पिटलवर बाँब टाकण्यात आले. माणसं मेली. किती ते कळलं नाही.
२० मार्च. अल शिफा हॉस्पिटलवर बाँबिंग. ९० माणसं मेली.
३१ मार्च. अल अक्सा हॉस्पिटल. ठिकठिकाणी गावामधून विस्थापित झालेले, तिथं झालेल्या बाँबिंगमुळं बेघर झालेले लोक
हॉस्पिटलच्या आश्रयाला आले होते. बाँबिंगमध्ये हॉस्पिटल उद्ध्वस्त, शेकडो माणसं मेली.
१ एप्रिल. अल शिफा हॉस्पिटलला इस्रायली सैन्यानं वेढा घातला. शेकडो माणसं पकडून नेली. शेकडो मेली.
१४ ऑक्टोबर. डेर अल बाला या ठिकाणी एक छावणी होती. गावोगाव विस्थापित झालेले पॅलेस्टिनी या ठिकाणी तंबूमध्ये रहात होते. जवळच अल अक्सा हॉस्पिटल असल्यानं छावणीसाठी हे ठिकाण निवडण्यात आलं होतं. मध्यरात्रीनंतर या छावणीवर बाँब टाकण्यात आले. काही कळायच्या आता शेकडो माणसं मेली.
२० नोव्हेंबर. बेट लाहिया या ठिकाणच्या इंडोनेशियन हॉस्पटलला सैन्यानं वेढा घातला. कित्येक दिवस. हॉस्पिटलचं अन्न पाणी तोडलं. सर्वात शेवटी सैनिक हॉस्पिटलमध्ये घुसले, सर्व उपस्थितांना मारून टाकलं. सैनिक निघून गेले तेव्हा जळून लाकूड झालेली, सडत असलेली प्रेतं कोपर्याकोपर्यात पडलेली होती.
२८ डिसेंबर. कमाल अद्वान हॉस्पिटलचे संचालक डॉ. हुसाम अबु साफिया यांना सैनिकांनी अटक केली. कारण त्यांनी
हॉस्पिटल सोडून निघून जाण्याची सैन्याची ऑर्डर अमान्य केली होती, मी पेशंटना सोडून जाणार नाही असं ते म्हणाले होते. आदल्या दिवशी त्यांना न विचारता सैनिक हॉस्पिटलमध्ये घुसले. २४० माणसांच्या झडत्या घेतल्या. २० जणांना गोळ्या घातल्या.
२०२५ साली झालेले हल्ले
४ जानेवारी. इंडोनेशियन हॉटेलवर बाँब हल्ल्यांची मालिका, हॉस्पिटल उद्ध्वस्त.
२३ मार्च. पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट संघटनेचे डॉक्टर-सेवक राफामध्ये झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना अँब्युलन्समधून दुसर्या हॉस्पिटलमध्ये नेत होते. सैनिकांनी अँब्युलन्सचा पाठलाग केला, हल्ला केला, अँब्युलन्स आतल्या पेशंट-डॉक्टरसह जाळल्या.
****

इस्रायलनं २८ ऑक्टोबरला ‘हमास नष्ट होईपर्यंत’ गाझाशी युद्ध करण्याचा निर्णय घेऊन सैन्य घुसवल्यावर युनायटेड नेशन्सनं गाझा आक्रमणावर चर्चा केली. इस्रायलचं आक्रमण हा हमासनं केलेल्या निषेधार्ह कृत्यावर इस्रायलनं केलेली कारवाई प्रमाणाबाहेरची आहे असं मत युनोनं व्यक्त करून युद्ध थांबवावं असा ठराव केला. इसरायलनं युनोचे सरचिटणीस गुटेरस यांचा निषेध केला, त्यांच्या राजीनाम्याचाr मागणी केली. अमेरिकेचे परदेशमंत्री ब्लिंकननी मानवतेचा विचार करून युद्ध थांबवावं असं म्हटलं; पण युद्ध तहकुबीला मात्र नकार दिला- कारण युद्ध तहकूब केलं तर हमास त्या संधीचा फायदा घेऊन स्वतःला अधिक संघटित करेल असं म्हटलं. Humanitarian Pause चालेल पण ceasefire नको.
शब्दांचा खेळ
नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यापर्यंत अमेरिका, सौदी, इजिप्त इत्यादी देशांनी युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव तयार केला. हमासनं ओलीस परत करायचे आणि युद्ध थांबेल असं प्रस्तावात म्हटलं होतं. २२ नोव्हेंबरला हमासनं काही ओलीस सोडले, बदल्यात इस्रायलनं काही हमासचे कैदी सोडले आणि युद्ध थांबवलं. पाचव्या दिवशी इस्रायलनं पुन्हा युद्ध सुरू केलं.
डिसेंबर २०२३पासून जानेवारी २०२५ पर्यंत वाटाघाटींचं गुर्हाळ चाललं. हमासनं ओलीस कसकसे सोडायचे, इस्रायलनं कोणते आणि किती पॅलेस्टिनी कैदी सोडायचे याचे तपशील आणि वेळापत्रक यावरून वाद होत राहिले. शेवटी जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ या काळात ओलीस व कैदी यांची देवाण घेवाण झाली. परंतु वाटाघाटी आणि देवाण घेवाण चालली असतानाच इस्रायलनं गाझा उद्ध्वस्त करणं आणि गाझातली माणसं शेकड्यांच्या हिशोबानं मारत राहणं चालूच ठेवलं.
एक गोष्ट स्पष्ट झाली. इस्रायलला युद्ध थांबवायचं नव्हतं. गाझा उद्ध्वस्त करायचं. गाझातली जमतील तेवढी, जास्तीत जास्त माणसं मारायची; जास्तीत जास्त माणसं गाझाच्या बाहेर हाकलून द्यायची; बहुतांश गाझा रिकामं करून तिथं ज्यूंच्या वसाहती बांधायच्या; मोजके गाझावासी एकाद्या छोट्या जागेत बंदिस्त करून ठेवायचे असा इस्रायलचा प्लान होता.
***
१९४८ साली इस्रायल तयार झालं तेव्हा इसरायल नष्ट करायला निघालेले इजिप्त, सौदी, सीरिया, इराक इत्यादी देश गाझाचा नाश आरामात पहात बसले. कोरडी सहानुभूती दाखवणारी पत्रकं त्यानी काढली. कारण सर्वच्या सर्व देश अमेरिकेचे आश्रित होते, सर्व देशांनी अमेरिकेच्या दबावामुळं इस्रायलशी जुळवून घेतलं होतं. युद्ध थांबवण्याचा एक
फॉर्म्युला अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी जाहीर केला. तो असा. गाझामधल्या सर्व लोकांनी देश सोडून शेजारच्या इजिप्त, जॉर्डन इत्यादी देशांत जावं. देश रिकामा झाला की अमेरिका (म्हणजे ट्रंप) तो ताब्यात घेईल आणि तिथं एक आलिशान लक्झरी देश बांधेल. समुद्रकिनारा सुंदर होईल, शहरात कसिनो- हॉटेलं इत्यादी उघडली जातील. या शहरात चैनीची इतकी उत्तम सोय असेल की ते एक जागतिक चैनीचं ठिकाण होईल. देश सोडून गेलेल्या गाझातल्या लोकांचं काय होईल ते ट्रंपनी सांगितलं नाही.
युद्ध अजून संपलेलं नाही.
(लेखमाला समाप्त)

