• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शेतकरी स्वराज्याचे नवचैतन्य

सचिन परब (प्रबोधन १००)

Marmik Team by Marmik Team
September 18, 2026
in प्रबोधन १००
0
गोव्यात सामाजिक क्रांतीचा एल्गार

मागील काही प्रकरणांत आपण शेतकर्‍यांचे स्वराज्य या प्रबोधनकारांच्या पुस्तकाचा आढावा घेत आहोत. त्यातलं सातवं आणि शेवटचं प्रकरण अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं आहे. सबंध पुस्तकाचं सार त्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणाविषयी लिहिण्याऐवजी ते थेट वाचकांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.

उ द्ध्वस्त झालेली गावं, गावांतून शहरांत विस्थापित झालेल्या शेतकर्‍यांची गळचेपी, दाक्षिणात्यांचं मराठी नोकरदारांवरचं आक्रमण, महात्मा गांधींच्या नेतृत्वाच्या आधी असणारा काँग्रेसचा शहरी तोंडवळा, त्यानंतर शेतकर्‍यांना मिळालेलं स्थान, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचं आणि विचारांचं महत्त्व, छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात वाढलेली ब्राह्मणेतर चळवळ, तीच शेतकर्‍यांची खरी चळवळ असल्याचा दावा आणि तिची केलेली चिकित्सा असे शेतकर्‍यांच्या व्यथांचे रूढ चाकोरी सोडून केलेलं विश्लेषण हे प्रबोधनकारांच्या शेतकर्‍यांचे स्वराज्य या पुस्तकाचं वैशिष्ट्यं असल्याचं आपण आतापर्यंतच्या मागोव्यावरून पाहिलं. यातली पहिली सहाही प्रकरणं महत्त्वाची आहेतच, पण अखेरचं सातवं प्रकरण या मांडणीचं सार सांगणारं म्हणून महत्त्वाचं आहे.

या प्रकरणाची सुरुवात प्रबोधनच्या पहिल्या अंकातला उतारा उद्धृत करून होते. प्रबोधनकारांच्या विचारांतील खरं स्वराज्य काय आहे, याचा उलगडा या उतार्‍यावरून होतो. आजच्या परिस्थितीलाही लागू पडणारा असा हा उतारा- राजकीय सुधारणा झाली म्हणजे सर्व इतर सुधारणा आपोआप होतील, या गोंडस तत्त्वावर प्रबोधनाचा मुळीच विश्वास नाही. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रे गुलामगिरीच्या आचारविचारांनी चिडचिडलेली, बौद्धिक क्षेत्रांत जाणतेपणाचा मक्ता मूठभर सुशिक्षितांच्या हाती, बाकी सर्वत्र अज्ञानाच्या अमावास्येची काळकुट्ट रात्र औद्योगिक चतुराई ठार मेल्यामुळे आर्थिक बाबतीत सर्वत्र पसरलेले दैन्य आणि दास्य; अशा विचित्र परिस्थितीत राजकीय स्वातंत्र्याची अपेक्षा म्हणजे राजकारणी जुगार खेळणाच्या जुगारुंची सट्टेबाजी होय. अर्थात या जुगारांत येनकेन प्रकारेण हिन्दुस्थानच्या स्वराज्याचे तट्टू यदाकदाचित जिंकलेच, तर ती स्वराज्याची लॉटरी म्हणजे मूठभर मोठ्या माशांना बाकीच्या अनंत धाकट्या मासोळ्यांना बिगर परवाना गिळण्याचा सनदपट्टाच होय.

हेच सूत्र हाती धरून प्रबोधनकार सातव्या प्रकरणातून करतात. त्यावर लिहिण्याऐवजी ही प्रबोधनकारांनी केलेली महत्त्वाची मांडणी जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचायला हवी. पण हे प्रकरण आहे मोठं. त्यामुळे ते संपादित करून, त्यातले महत्त्वाचे मुद्दे प्रबोधनकारांच्या भाषेतच एकापुढे एक ठेवण्याचा प्रयत्न इथे केलाय.-

हिन्दुस्थानात सध्या अनेक रंगांच्या चळवळी जोरजोराने चालू आहेत. निर्भेळ राष्ट्रस्वातंत्र्याच्या कल्पनेपासून तों प्रत्येक व्यक्तीला आंतरराष्ट्रीय इभ्रतीचा दर्जा मिळण्याइतक्या आत्मशुद्धीपर्यंतच्या खटपटी सर्वत्र जोराने चालल्या आहेत. नवमतवादी समाजसुधारकांचा अनिर्वाच्य छळ करणार्‍या जीर्णमतवाद्यांच्या छावण्या आज त्याच नवमतवादी सुधारणांचा अट्टहास करीत आहेत. पण त्या सर्वांत एक मोठा ठळक दोष दिसून येतो. सर्व चळवळी परस्परावलंबी नसून, एकमेकांपासून सुतक्यासारख्या अलग व फटकून चालतात. चळवळ उत्पन्न झाली की तिचा स्वतंत्र ग्रुप एक निराळीच जात बनते. अखिल भारतीय विशेषणाच्या संघांचा व्याप आणि सहकार्याचे क्षेत्रसुद्धा त्याच्या पाच-पन्नास मेंबरांपलीकडे जात नाही. प्रत्येक संघ वृत्तपत्री लेखाळपणाने आसेतुहिमाचल कार्यक्रमाची मिजास कितीही मारीत असला, तरी त्याच्या जन्मग्रामातसुद्धा त्याच्या अस्तित्वाची कोणाला दाद लागत नाही.
राष्ट्रीयत्वाची अंडी उबविणार्‍या नॅशनल काँग्रेसच्या खुराड्यात हिन्दु-मुसलमान द्वैताचा धिंगाणा. हिन्दु संघटनांच्या पत्रावळीवर ब्राम्हणी वर्चस्वाचा खरकटवाडा. शुद्धीच्या चळवळीत नव्या नव्या जाती निर्माण करून हिन्दु चातुर्वर्ण्याचे षोडशवर्णी भटी वरण ढवळण्याच्या कारवाया. यूथलीग पहावी तों त्यात गोर्‍या कोहळ्यांचा उबारा आणि काळ्या कच्चा वैâर्‍यांची आढी. मुख्य लक्षात ठेवण्याचा मुद्दा हाच की, हिन्दुस्थानातल्या चळवळीत एकसूत्रतेचा पूर्ण अभाव असल्यामुळे, दोरा तुटलेल्या माळेच्या मण्याप्रमाणे चळवळी पुष्कळ, कार्य पूज्य असा माथेफिरू प्रकार गेली ३० वर्षे सर्व हिन्दुस्थानभर चालला आहे. कोणाचा कोणाशी मेळ नाहीं. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. सर्व चळवळींना एकतंत्री शिस्तीत नियंत्रण करणारी शक्तीच मुळी जेथे निर्माण झालेली नाही किंवा केलेली नाही, तेथे हव्या त्या भोजनभाऊने उठावे आणि आपल्या राहत्या खुराड्यात ममता संघ थापावे, असा हलकट पोरकटपणा हेच सध्याचे ‘राष्ट्रीय’ चैतन्य आहे.
सर्व चळवळींचा धुमाकूळ मुंबई-पुण्यासारख्या शहरांत. वृत्तपत्रांची पैदास आणि मागतां येइ ना भीक तर एडिटरकी शीक एवढ्याच पुण्याईच्या पुण्यश्लोक पाप्यांच्या पितरांची एडिटरी मुत्सद्देगिरी फक्त शहरात. खेड्यांची आणि खेडवळांची आठवण चुकूनसुद्धा आजपर्यंत कोणाला झाली नाही. त्यांचे ज्ञानच कोणाला नाही. खेडवळ शेतकरी म्हणजे शूद्र. शूद्रासारख्या क्षुद्राची पर्वा ब्राह्मणादि पांढरपेश्या ज्ञानेश्वरांनी काय म्हणून बाळगावी? वृत्तपत्री कालमांच्या खर्डेघाशीने ब्रिटिश सरकारला वंगविण्याचा चंग बांधणार्‍या शहरी बृहस्पतीना नांगरगट्ट्या शेतकर्‍यांच्या संघशक्तीच्या पाठबळाची काय म्हणून जरूर असावी?
पण शहरांच्या शहरी भपक्याचा मूळ उगम शेतकर्‍याच्या नांगराच्या फाळात आहे, ही जाणीव काँग्रेसी देशभक्तांना आता थोडथोडी होऊ लागली आहे; आणि कित्येक बेरोजगार दे भ (देशभक्त) सध्या खेडी आणि खेडेवळ शेतकरी काबीज करण्यासाठी दौर्‍यावर सारखे फिरत असतात. ब्राह्मणेतर चळवळीने थेट खेड्यांच्या मुळाला हात घालून महाराष्ट्रातला अखिल शेतकरी वर्ग गदगदा हालविल्यामुळे, पांढरपेशा भट भटेतर काँग्रेसी वारकर्‍यांच्या मोहजाळात शेतकरी मुळीच सापडत नाहीत; उलट, खेड्यापाड्यात दे.भ. भटांना झाडू मिळतो, अशी स्पष्ट कबुली बापट नावाच्या एका निस्सीम टिळकभगताने नुकतीच ‘केसरी’तून दिल्याचे पुष्कळांच्या स्मरणात असेल. ब्राम्हणेतर चळवळीला विरोध करण्यातच ब्राम्हण्याची शेखी मिरविणार्‍या इरसाल पुणेरी भटांचा हा अनुभव, भटाळलेल्या भटेतरांनी- डोक्यात मेंदू शिल्लक असेल तर विचार करण्यासारखा आहे. महाराष्ट्राच्या जागृतीसाठी ब्राम्हणेतर चळवळीचीहि आवश्यकता होती, अशा अर्थाचे उद्गार बरेच विवेकी ब्राम्हणहि आता निःसंकोच काढू लागले आहेत.
ब्राम्हणेतर चळवळीत कितीहि दोष असले, आणि कोणत्या चळवळीत दोष नसतात? आणि तिच्या पुढार्‍यांच्या हातून कितीहि चुका झालेल्या असल्या- काँग्रेसने ‘हिमालयन ब्लण्डर्स’ केलेल्या आहेत- तरी खेडवळ शेतकरी आणि ब्राम्हणेतर चळवळ यांचा परस्पर संबंध, देह आणि आत्मा यासारखा आहे. या चळवळीनेच शेतकर्‍याच्या महिरलेल्या आणि बावरलेल्या वृत्तीत आत्मोद्धाराचे चैतन्य खेळवून त्याला आत्मीयत्वाची चटक लावली. शेतकर्‍याला ब्राम्हणेतर चळवळीशिवाय दुसरा परमेश्वर नाही.
या चळवळीशी बेइमान होऊन, शेटजी, भटजींनी उफललेल्या दुसर्‍या कोणत्याहि चळवळीच्या पचनी जर महाराष्ट्रातला शेतकरी पडेल, तर त्याच्या अधःपाताला परमेश्वरसुद्धा जर परमेश्वर कोठे असेल तर- थोपवू शकणार नाही. चरख्याच्या पुण्याईवर स्वराज्य कमविणार्‍या महात्मा गांधीनाहि जेथे ब्राम्हणेतर चळवळीची नालिस्ती करायचा मोह आवरला नाही, तेथे त्यांचे शागीर्द वल्लभभाई पुणेरी भटांच्या गळ्यात गळा घालून मी शेतकर्‍यांचा ‘भंगी’ आहे म्हणून लॅण्ड लीगचे कितीहि फार्स करू लागले, तरी या नाटकी लोकांच्या दंगलीला महाराष्ट्रीय शेतकर्‍यांनी बळी पडणे, म्हणजे वस्तर्‍याने गळा कापून आपला आत्मघात करून घेण्यासारखे आहे. महाराष्ट्र मर्‍हाठ्यांचा आहे. मर्‍हाठ्यांचा महाराष्ट्र, इंग्रजांचा समगोत्री आणि समव्यवसायी जो गुजराथ, त्या गुजराथ्याचे पुढारपण केव्हाहि मान्य करणार नाही. प्रांतिक विभागण्या करण्यात तागडीतुकाप्पा गुजराथ्यांची शिवाजीच्या महाराष्ट्राबरोबर मोट बांधण्यात ब्रिटिश बनिया कंपनीची झालेली चूक सुधारण्याचे महाराष्ट्राला मुळीच कारण नाही. महाराष्ट्राचा मर्‍हाठा घीशक्करखाऊ गुजराथ्याचा अनुयायी बनणार? शिवाजीचा मराठा शेतकरी, रण-छोड-रायजी (युद्धाचे क्षेत्र सोडून पळून जाणार्‍या) सारख्या आणि तुपाचा शिरा खाणार्‍या देवाच्या भगताचा भगत बनणार? भांडवलशाहीचा पुरस्कर्ता म्हणून गुजराथेतल्या शेतकर्‍यांनी ज्याचा खून पाडला, त्याच्या भावावर शिवाजीचा मराठा शेतकरी विश्वास ठेवणार? इतका बेशरमपणा मराठी शेतकरी खास करणार नाही.
शेतकर्‍यांच्या जागृतीचे विशेष अभिनंदनीय कार्य बजावलेली ‘ब्राम्हणेतर चळवळ’ आज बर्फाप्रमाणे विजून गेलेली आहे. फक्त एखादे इलेक्शन आले की तेवढ्यापुरती पुढार्‍यांची पैदास आणि बोंबाबोंब; यापलीकडे ब्राम्हणेतर पक्षाचा सध्या काहीच कार्यक्रम किंवा चळवळ नाही. केवळ साठवणीच्या पाण्याचे शेवाळलेले डबके! या डबक्यातली सगळी शेवाळं, चिखलांचे गोळे, फत्तर मुरमाच्या कपर्‍या, नासकी सडकी लाकडे वगैरे अडगळ साफ उचकून काढणारी आणि घाणेरडे पाणी उपसून काढून मूळ झर्‍याच्या स्वच्छ जिवंत पाण्याने हौद भरून टाकणारी एक नव्या कार्यक्रमाची जोरदार योजना श्रीयुत जवळकर यांनी नुकतीच ब्राम्हणेतर पक्षापुढे ठेविली आहे. जवळकरांची शेतकरी पक्षाची योजना गेल्या २-३ वर्षांच्या त्यांच्या विचारविनिमयाचा आणि आंदोलनाचा परिपाक आहे. मी पुण्यास असताना या विषयावर माझ्याबरोबर त्यांनी अनेक वेळा खल केलेला आहे. कोणतीहि सुधारणा घडवून आणावयाची तर तेवढ्यासाठी परदेशी चळवळीची किवा तत्त्वांची नुसती नाटकी नक्कल न करता, हिन्दी समाजांच्या पिण्डप्रकृतीचा खोलवर विचार करून, ती त्यांना सहजपणे कोणत्या रीतिरूपात उत्क्रान्त करता येईल; उत्क्रान्तीच्या मार्गातले आणि निकटचे प्रतिस्पर्धी कोण आणि अडचणी कोणत्या; आणि त्या दूर करण्याचे अथवा कायम चेचण्याचे उपाय कोणते; इत्यादि साधकबाधक गोष्टींचा दूरवर विचार करूनच जवळकर आपल्या योजनेने ब्राम्हणेतर पक्षाच्या गारठलेल्या देहात नवचैतन्याचा उबारा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिन्दी शेतकरी ‘भाकरी भाकरी’ करून मरत असता, इंग्रेज सरकारच्या कारकुण्ड्या कारखान्यात ‘चाकरी चाकरी’ म्हणून शंखध्वनि करणार्‍या ‘बामनेतरी’ शंखांच्या मूर्खपणाला पायबंद ठोकायला शेतकरी स्वतःच सर्वसमर्थ व्हावा, आणि शेतकर्‍याचा उद्धार सामाजिक, धार्मिक किंवा राजकारणी सुधारणेच्या फोल ठरलेल्या बोलात नसून अर्धी भाकरी दरएकाला। नंतर श्रीमंता पोळी ।। असल्या आर्थिक क्रांतीच्या चकमकीत आहे, हे अखिल भारतीय शेतकर्‍यांना सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट दिसावे, एवढीच जवळकरी योजनेची मुख्य विवंचना आहे.
हिन्दुस्थानचा शेतकरी आपल्या पिढीजात नांगराला पारखा होऊ नये, मातीतून सोने काढणारा हा जगप्रसिद्ध हिन्दी किमयागार शेतीला मुकून मजुरीच्या मोहाने मायदेशाला मुकू नये; आणि ‘शेतकरी सुखी तर राष्ट्र सुखी’ ही गोल्डस्मिथची उक्ती प्रत्यक्ष वस्तुस्थितीत उतरून, या शेतकीप्रधान भरतखण्डाचे स्वराज्य शेतकर्‍यांच्या खास हुकमतीनेच चालावे, यापेक्षा अन्य कसलाहि कटाक्ष जवळकरी योजनेत दृग्गोचर होत नाही. सध्याच्या भांडवलशाही आणि कज्जेदलाली राजकारणाला पायबंद लावण्यासाठी अखिल भरतखंडातला एकजात शेतकरी संघटित झाला पाहिजे. त्याने आपली एक नव्या चैतन्याची शक्तीच निर्माण केली पाहिजे. विद्यमान असलेले कोणतेहि पंथ आणि पक्ष त्याच्या उपयोगी पडणार नाहीत. सबंध हिन्दुस्थानचा शेतकरी अभेदाने एकवटला, तर त्याच्या संघटनेचा ब्रिटिश पार्लमेण्टावर जेवढा दणक्याचा दाब बसेल, तेवढा शहरी बाण्डगुळ्यांच्या तोंडाच्या वाफार्‍याचा जगाच्या अंतापर्यंत बसणार नाही.

दिल्लीच्या किल्ल्यांचा जुडगा खुळखुळविण्याचा या पुढचा योग भारतीय शेतकर्‍यांचा आहे. जे ब्रिटिश पार्लमेण्ट गेली अनेक शतके भांडवलशाही आणि सरदारशाहीची जन्मप्राप्त वतनी जहागीर होऊन बसले होते, तेच कुदळ्या मजुरांनी आणि नांगर्‍या शेतकर्‍यानी पूर्ण काबीज करून, इंग्लंडचा मजूर ब्रिटिश साम्राज्यसत्ताधारी जर बनू शकतो, तर तोच प्रयोग आमच्या हिन्दी शेतकर्‍यांना यशवंत करून दाखविता येणार नाही काय? अलबत् आलाच पाहिजे. शिस्तीची संघटना आणि ध्येयाची तळमळ इकडची दुनिया तिकडे करील. मग ‘शेतकर्‍यांचे स्वराज्य’ ही आजची कल्पनासृष्टीतील घटना प्रत्यक्ष सृष्टीत अवतरलेली, प्रस्तुत लेखकाला पाहण्याचा योग न आला तरी परवडला! अलम दुनिया त्याच्या नांगर चिन्हांकित राष्ट्रध्वजाला मुजरा करील.

Previous Post

ब्रह्मज्ञानाचा अव्हेर

Next Post

विसर्जनासाठी कायमस्वरूपी पर्यावरणपूरक व्यवस्था हवी!

Next Post
विसर्जनासाठी कायमस्वरूपी पर्यावरणपूरक व्यवस्था हवी!

विसर्जनासाठी कायमस्वरूपी पर्यावरणपूरक व्यवस्था हवी!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.