
यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशननं २७० धावांच्या अजस्र खेळीच्या बळावर पूर्व विभागाला दुलीप करंडक जिंकून दिला. वादग्रस्त घटनांमुळे काही वर्षांपूर्वी कारकीर्द संपल्याची चर्चा होत असताना त्यानं पुनरागमनाची कास धरली. गीतेमधून प्रेरणा घेत ‘ईशान किशन २.०’ म्हणून अवतरलेल्या ह्या धडाकेबाज क्रिकेटपटूची ही यशोगाथा.
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः
माणसानं स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःचा उत्कर्ष साधावा. स्वतःला खचू देऊ नये. कारण माणूस स्वतःच स्वतःचा मित्र असतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रूही असतो, असं ह्या भगवद्गीतेमधील संस्कृत ओळी सांगतात. क्रिकेटपटू ईशान किशनच्या जीवनगाथेचा ह्या विचारांशी सुंदर मेळ बसतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी माणसानं न खचता प्रयत्न केले, तर यश नक्की मिळतं. महाभारताचं युद्ध आपल्याच आप्तस्वकीयांविरुद्ध का लढावं, या प्रश्नानं भांबावलेल्या अर्जुनाला कृष्णानं गीता ऐकवली आणि त्याच्या शंकांचं निरसन केलं. इथे साक्षात किशनला त्याच्या कुटुंबानं गीतेचा मार्ग दाखवला.
ही कथा आहे, ईशानची. जो काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटच्या पटलावरून दूर फेकला गेला होता. ईशानची कारकीर्द अकाली संपली, असं क्रिकेटवर्तुळात म्हटलं जाऊ लागलं. पण त्यानं सर्व क्रिकेट विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरवले. देशांतर्गत क्रिकेट गाजवलं. झारखंडाला रुबाबात मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेचं विजेतेपद जिंकून दिलं. भारतीय क्रिकेट संघात झोकात पुनरागमन केलं. भारताच्या ट्वेंटी-२० जगज्जेतेपदाच्या यशात त्याचा सिंहाचा वाटा होता. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत त्यानं सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्व करताना संघाला बाद फेरीपर्यंत (प्ले-ऑफ्स) नेलं. ‘ईशान किशन २.०’च्या किमयेचा आलेख निरंतर उंचावत राहिलाय. पुढे भारताच्या एकदिवसीय संघातही तो परतला. पांढर्या चेंडूंच्या क्रिकेटमध्येच तो खेळतो, हा शिक्काही त्यानं आता पुसून टाकलाय. पूर्व विभागाला त्यानं दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद मिळवून दिलं, ते फक्त नेतृत्वाच्या बळावर नाही, तर अद्वितीय कर्तृत्वाच्या बळावर. ईशाननं २७० धावांच्या मॅरथॉन खेळीसह पूर्व विभागाला ७०८ धावांचा डोंगर उभारून दिला, तेव्हाच पूर्वेचं वर्चस्व नक्की झालं. मग दुसर्या डावातही त्यानं ८० धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळे आता भारताच्या कसोटी संघासाठी तो दावेदारी मजबूत करतोय.
ईशानच्या आयुष्यात असं काय घडलं? हे समजून घेण्यासाठी थोडं मागे जाऊया. २०२३-२४चा हंगाम सुरू होण्यापूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी, राष्ट्रीय संघातून खेळायचं असेल, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी दाखवायला हवी, अशी सूचना ईशानला दिली होती. देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासंदर्भात ‘बीसीसीआय’चे तत्कालीन सचिव जय शाह यांनीही वार्षिक करारबद्ध खेळाडूंना अध्यादेश जारी केला होता. पण तरीही झारखंडकडून रणजी क्रिकेट खेळणं ईशाननं पूर्णत: टाळलं. त्याऐवजी ‘आयपीएल’ २०२४च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यासमवेत सराव करताना तो आढळला. यात आणखी एक घटना घडली. डिसेंबर २०२३मध्ये ईशाननं दक्षिण आफ्रिका दौर्यावर कसोटी मालिका सुरू होण्याआधी वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. ‘बीसीसीआय’नं नाईलाजास्तव त्याला परवानगी दिली.

चांगली कामगिरी करूनही भारतीय संघात स्थान मिळत नसल्यानं तो निराश झाला होता. मग ईशाननं विश्रांती घ्यायला हवी होती. पण त्याऐवजी तो दुबईल्या पार्टीत आणि एका टीव्ही कार्यक्रमात चमकला. समाजमाध्यमांवर त्याची छायाचित्रं आणि चित्रफिती प्रसारित होताच त्याच्या माघारीबाबत चाहत्यांनी प्रश्नं उपस्थित केले. परिणामी फेब्रुवारी २०२४च्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) जाहीर केलेल्या वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून त्याला वगळण्यात आलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी अनुपलब्ध असल्याचं स्पष्ट केल्यानं ही एक प्रकारची कारवाईच त्याच्यावर झाली होती. त्या काळात हार्दिक पंड्याच्या पावलांवर पाऊल ठेवून ईशान आणि श्रेयस अय्यर यांना आपणही फक्त मर्यादित षटकांपुरतं मर्यादेत राहावं, असं वाटू लागलेलं. ‘बीसीसीआय’नं या प्रकरणी उगारलेल्या बडग्याचा फटका दोघांना बसला.ईशान भारतीय संघापासून दुरावला.
ह्यावेळी नैराश्यानं तो ग्रासला. पण यावेळी त्याचे वडील प्रणव पांडे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. जीवनातील अनिश्चितता आणि दडपणाचा सामना करण्यासाठी श्रीमद्भगवद्गीता तुम्हाला बळ देते, हे काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईने त्यांना सांगितलं होतं. तणावाच्या स्थितीत आपल्यासमोर असं का झालं, या प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात. त्यावेळी गीता उघडावी आणि वाचायला प्रारंभ करावा. तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जातं. परिस्थितीशी सामोरं जाण्याचं धैर्य तुम्हाला गीता देते, हेच ईशानला त्याच्या वडिलांनी पटवून दिलं आणि ते त्याला पटलंही. त्यानंतर गीतेची सोबत त्यानं सोडली नाही. तो कुठेही गेला तरी छोटेखानी गीतेची प्रत त्याच्याकडे असते.

पुण्यात १८ डिसेंबर २०२५ या दिवशी झारखंडनं हरयाणाला हरवून मुश्ताक अली करंडक उंचावला. त्या अंतिम सामन्यात कर्णधार ईशाननंच १०१ धावांची सामनावीर खेळी साकारून झारखंडच्या स्थानिक क्रिकेटमधील फक्त दुसर्या जेतेपदाचा विजयाध्याय लिहिला. स्पर्धेअखेरीस १० सामन्यांत ५७.४४च्या सरासरीनं आणि जवळपास २००च्या स्ट्राइक रेटनं सर्वाधिक ५१७ धावा (२ शतकं, २ अर्धशतकं) त्याच्या खात्यावर होत्या. दुलीप करंडक स्पर्धेतही त्यानं ३ सामन्यांत १०२.२५च्या सरासरीनं सर्वाधिक ४०९ धावा काढल्या आहेत. भारतानं जिंकलेल्या टी-२० विश्वचषकातही त्याचं योगदान महत्त्वाचं होतं. ९ सामन्यांत ३ अर्धशतकांच्या सहाय्यानं ३५.२२च्या सरासरीनं ३१७ धावा काढणारा ईशान सर्वाधिक धावा काढणार्या फलंदाजांमध्ये चौथ्या स्थानावर होता. ‘आयपीएल’मध्ये सनरायजर्स संघाची फलंदाजीची चौकडी प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांवर घणाघाती हल्ला करण्यात तरबेज होती. अभिषेक शर्मा आणि मॅथ्यू हेड सलामीला, ईशान तिसर्या क्रमांकावर, तर हेनरिक क्लासेन चौथ्या स्थानावर. चौघांच्या खात्यावर चारशेहून अधिक धावा, हेच यशाचं गणित. ईशाननं १५ सामन्यांत ४०.१३ची सरासरी आणि १८२.४२च्या स्ट्राइक रेटनं सहा अर्धशतकांनिशी एकूण ६०२ धावा काढल्या.
ईशान मूळचा बिहारचा. औरंगाबाद जिल्ह्यातील दौडनगरचा. वडील व्यावसायानं बांधकाम विकासक. बिहार क्रिकेट संघटनेची ‘बीसीसीआय’शी न्यायालयीन लढाई सुरू असल्यानं ईशाननं शेजारच्या झारखंड राज्यातून खेळायचं ठरवलं. पुढे २०१६मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारत १९-वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता ठरला होता.

आघाडीचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ही ओळख जपणारा ईशान वेळप्रसंगी फिरकी गोलंदाजी करण्यातही वाकबगार. मार्च २०२१मध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. डिसेंबर २०२२मध्ये त्यानं बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय प्रकारातील वेगवान द्विशतकही साकारलं. त्याची कारकीर्द तशी सहा वर्षांचीच. त्यातल्या मधल्या दोन वर्षांचं नुकसान झालेलं. पण तो खचला नाही. आपल्याकडून झालेल्या चुकांमधून बोध घेतला आणि कारकीर्दीच्या दुसर्या डावाला प्रारंभ केला. हा ईशान पहिल्या टप्प्यातील ईशानपेक्षा अधिक धोकादायक आणि वेगळा आहे. ट्वेंटी-२० प्रकारात संजू सॅमसन हा यष्टीरक्षक-फलंदाज आहे; पण तरीही ईशान निव्वळ फलंदाज म्हणून का होईना संघात असतो. एकदिवसीय प्रकारात केएल राहुलसारखा खंदा यष्टीरक्षक-फलंदाज असतानाही २०२७च्या विश्वचषकाच्या दृष्टीनं ईशान हा समर्थपणे पर्याय ठरतोय. तसाच कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत, राहुल आणि ध्रुव जुरेल अशी कडवी स्पर्धा असतानाही ईशान आपल्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर दावा करतोय. कारण ‘ईशान किशन २.०’ हा गीतेच्या समर्थ पायावर उभा आहे.

