१९६४ सालातील गणेशोत्सवात बाळासाहेबांनी रेखाटलेली ही रविवारची जत्रा पाहून तो काळ, तेव्हाचा गणेशोत्सव अनुभवलेल्यांच्या मनात ‘गेले ते दिन गेले’ अशी खंत दाटून येईल. गणेशोत्सव सार्वजनिक होता तेव्हाही, पण त्याचा झगमगाटी इव्हेंटोत्सव झालेला नव्हता. गणपती आपल्या हक्काचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा गणपती बाप्पा होता; तो इकडचा राजा, तिकडचा सम्राट, नवसाला पावणारा शेठ बनून बसलेला नव्हता. उंच मूर्ती आणि भव्य श्रीमंती देखाव्यांची स्पर्धा लागलेली नव्हती. सर्वसामान्य माणूस आपली गार्हाणी घरातल्या, गावातल्या एखाद्या वयाने मोठ्या, जाणत्या माणसाच्या कानावर घालावीत, तशी गणपतीच्या कानावर घालू शकत होता. गणपतीही भक्तांच्या व्यथा विवंचना निदान ऐकून तरी घेत होता, त्यांचं मन हलकं करत होता. आता मात्र, उद्योगपतींनी हायजॅक केलेल्या उत्सवात, व्हीआयपी दर्शनांच्या गदारोळात बाप्पाचे चरण दिसण्याइतकाही वेळ मिळत नाही भाविकांना. डीजेच्या दणदणाटात बाप्पाला ऐकू काय जाणार? त्याच्याशी भक्त सुखदु:खाच्या गप्पा कुठून मारणार?

