
जाणे भक्तीचा जिव्हाळा।
तोचि दैवाचा पुतळा।।१।।
आणिक न ये माझे मना।
हो का पंडित शहाणा।।२।।
नाम रुपी जडले चित्त।
दास त्याचा मी अंकित।।३।।
तुका म्हणे नवविध।
भक्ती जाणे तोचि शुद्ध।।४।।
प्रस्तुत अभंगात तुकोबाराय भक्तीचा महिमा सांगतात. वारकरी संप्रदाय हा मुळात भक्तीसंप्रदाय आहेीची एक लाटच भारतात निर्माण झाली. भक्तीचा उगम मूळचा दक्षिणेतला. तामिळनाडूतील अळवार आणि नयनार या दोन भक्तिपरंपरा आद्य भक्तीपरंपरा मानता येतील. त्यानंतर लिंगायत आणि महानुभाव या अनुक्रमे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भक्तीपरंपरा. लिंगायत परंपरा बाराव्या शतकातील तर महानुभाव परंपरेतील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा काळही त्याच शतकातील. या सर्व परंपरांनी भक्तीचा विचार रुजवला. भक्ती म्हणजे परमेश्वराप्रतीची समर्पण भावना. वारकरी संप्रदायानेही याच भक्तितत्त्वाचा पुरस्कार केला.
भारतीय आध्यात्मात कर्म, ज्ञान आणि भक्ती असे तीन मार्ग प्रचलित आहेत. यातील कर्म मार्ग म्हणजे कर्मकांडाचा मार्ग.यज्ञ, तप, तीर्थयात्रा, श्राद्धतर्पण आणि स्नानसंध्या अशी अनेक प्रकारची कर्मकांड आहेत. पुढच्या काळात हा कर्मकांडाचा मार्ग मागे पडला. लोकांना त्यातला फोलपणा लक्षात यायला लागला. त्यानंतर ज्ञानमार्गाचा महिमा वाढला. अर्थात हा ज्ञानमार्ग म्हणजे ब्रह्मज्ञानाचा माग.हे ब्रह्मज्ञान म्हणजे वेदोपनिषदातून मिळणारं ज्ञान. ब्रह्मज्ञान आणि कर्मकांड हे दोन्ही मार्ग सूक्ष्म आणि दुस्तर होते. दुस्तर म्हणजे कठीण. त्यात बरीच तांत्रिकता होती. शिवाय त्यात अधिकारभेदाचा मुद्दाही होताच. केवळ उच्चवर्णीय पुरुषांनाच या दोन मार्गावर चालण्याची परवानगी होती. त्यामुळेच संतांनी हे दोन्ही मार्ग बंद करून टाकले. ‘मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा।।’ असं तुकोबाराय म्हणतात. ब्रह्मज्ञानाची सूक्ष्म वाट आणि कर्मकांडाची दुस्तर वाट अशा दोन्ही वाटा संतांनी मोडून टाकल्या. त्यासाठी संतांनी भक्तीचा एक प्रशस्त राजमार्ग तयार केला. तो तयार झाल्यावर लोकांनी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञानाच्या सूक्ष्म-दुस्तर वाटांनी सुरू असलेला प्रवास थांबवला. ते बहुतांश लोक संतांनी दाखवलेल्या भक्तीच्या प्रशस्त राजमार्गाने निघाले. साहजिकच ज्या वाटेने लोक वर्षानुवर्षे जात नाहीत ती वाट आपोआपच मोडली जाते. त्यामुळेच तुकोबाराय ‘मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर। केला राज्यभार चाले ऐसा।।’ असं म्हणतात.
भक्तीच्या मार्गात कोणताही भेदभाव नाही. भक्तीचा सर्वांना अधिकार आहे. भक्ती ही जीवनाभिमुख आहे. मानवी जीवन भावनेवर आधारलेलं आहे. त्यामुळेच भक्तीला सर्व सामाजिक स्तरातून प्रतिसाद मिळाला. तुकोबाराय प्रस्तुत अभंगात म्हणतात की जो जिव्हाळ्याने भक्ती करतो तोच भाग्यवान आहे. जिव्हाळा म्हणजे प्रेम. भक्तीत प्रेमाची, आवडीची आणि भावाची गरज आहे. ‘भावेविण भक्ती भक्तीविण मुक्ती। बळेविण शक्ती बोलू नये।।’ असं ज्ञानोबाराय म्हणतात. भाव हाच भक्तीचा पाया आहे. त्यामुळेच तुकोबाराय जिव्हाळ्याने भक्ती करणारा भाग्यवान आहे असं म्हणतात. परमेश्वराविषयी प्रेम नसेल तर भक्तीला काही अर्थ नाही. ‘मोले घातले रडाया। नाही आसू नाही माया।।’ असं तुकोबाराय उदाहरण देऊन सांगतात. पैसे देऊन रडायला सांगितलं तर त्यात प्रेमही नसतं आणि अश्रुही नसतात. ‘सासूसाठी रडे सून। भाव अंतरीचा भिन्न।।’ असं एक रोजच्या जगण्यातलं आणखी एक खास उदाहरण तुकोबारायांनी दिलं आहे. भक्तीत असा दिखाऊपणा चालत नाही.
तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या दुसर्या चरणात सांगतात की पंडित आणि शहाणा माझ्या मनाचं समाधान करू शकत नाही. जिव्हाळ्याने भक्ती करणारा दैवाचा पुतळा आहे तर पंडित हा करंटेपणाचा पुतळा आहे. ‘नेणे वाद घटपटा। करिता पंडित करंटा।।’ असं तुकोबाराय आणखी एका अभंगात म्हणतात. तुकोबाराय जेव्हा जेव्हा पंडितांचे वाभाडे काढतात तेव्हा त्यांच्यासमोर वेदांती पंडित असतात. घटापटाचे वाद करणारा पंडित करंटा आहे असं जेव्हा तुकोबाराय म्हणतात तेव्हा हे वाद वेदांती पंडित करत असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे.
तुकोबारायांनी इथे पंडित आणि शहाणा असे दोन शब्दप्रयोग केलेले आहेत. आपला समज असतो की पंडित आणि शहाणा एकच आहे. पण वास्तविक पाहता पंडित हा शहाणा नसून वेडा असतो. ‘कपट काही एक। नेणो भुलवायाचे लोक।।’ असा तुकोबारायांचा एक अभंग आहे. त्यात तुकोबारायांनी मठपती, पुराणिक, पुरोहित वगैरे लोकांची यादी देत त्यात पंडितांचाही उल्लेख केला आहे. त्या अभंगाचा शेवट ‘नोहे त्यांच्या ऐसा। तुका निरयवासी पिसा।।’ असं तुकोबाराय म्हणतात, म्हणजे मी ‘त्यांच्यासारखा’ वेडपट आणि नरकवासी नाही. थोडक्यात तुकोबाराय पंडिताला वेडपट म्हणतात. आणखी एका अभंगात तर त्यांनी स्पष्टपणेच पंडिताला मूर्ख म्हटलेलं आहे. ‘पंडित म्हणता थोर सुख । परि पाहता अवघाची मूर्ख।।’ असं तुकोबाराय म्हणतात. पंडित जसा करंटा असतो तसाच तो वेडपट आणि मूर्खही असतो. त्याचं कारण पंडित हा पुस्तकी ज्ञानावर अवलंबून असतो. त्यामुळे जगण्याचा शहाणपणा त्याच्याजवळ नसतो. त्यामुळेच तुकोबारायांनी पंडित आणि शहाणा असे दोन वेगवेगळे शब्दप्रयोग केलेले आहेत. तुकोबारायांना जसा पंडित नको आहे तसाच शहाणाही नको आहे. इथे शहाणा शब्दाचा अर्थ ‘शहाणपणा’ करणारा अश्ाा अर्थाने आहे. अशा शहाणपणाची सुरुवात वेदाने केली. पण तोही परमेश्वराला जाणून घेऊ शकला नाही. अखेरीस तो ‘मुका’ झाला. ‘शहाणपणे वेद मुका। गोपिका त्या ताकटी।।’ असा तुकोबारायांचा अभंग आहे. परमेश्वराचं वर्णन करताना त्याची बोलती बंद झाली असं तुकोबाराय म्हणतात. थोडक्यात शहाणपणा करणारा वेद आणि वेदांवर पांडित्य दाखवणारे पंडित अशा दोघांचीही भक्तीच्या क्षेत्रात गरज नाही असं तुकोबारायांना म्हणायचं आहे.
वेदांती पंडित आणि त्यांचं मूळ असणार्या वेदाचा शहाणपणा जरी तुकोबारायांनी नाकारला असला तरी भक्तीमार्गातला शहाणा मात्र तुकोबारायांना जवळचा वाटतो. जो ब्रह्मज्ञानाचा मार्ग नाकारून भक्तीचा मार्ग निवडण्याचा शहाणपणा दाखवतो त्याला तुकोबाराय शाबासकी देतात. ‘तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनी। शहाणा तो धणी घेतो येथे।।’ असं तुकोबाराय म्हणतात. जो कनिष्ठ आणि अवघड मार्ग नाकारून सोपा आणि श्रेष्ठ मार्ग निवडतो तोच शहाणा आहे असं तुकोबारायांना म्हणायचं आहे. ‘भक्तीपंथ बहु सोपा।’ अशी वारकरी संतांची शिकवण असल्यानं हा सोपा भक्ती मार्ग निवडण्याचा शहाणपणा ज्यांच्याजवळ आहे ते तुकोबारायांना प्रिय आहेत. तुकोबारायांच्या एका अभंगाने या दोन शहाण्यांतला फरक आपल्याला नीट समजून घेता येईल.
शहाणपणे वेद मुका।
गोपिका त्या ताकटी।।१।।
वैâसे येथे वैâसे तेथे।
शहाणे ते जाणती।।२।।
या अभंगात पहिल्या दोन चरणात शहाणा हा शब्द आला आहे. पहिल्या चरणातला शहाणा निषेधात्मक आहे तर दुसर्या चरणातला शहाणा तुकोबारायांना अभिप्रेत असलेला खरा शहाणा आहे. पहिल्या चरणात त्यांनी वेदाचा शहाणपणा नाकारला आणि गोपिकांना श्रेष्ठ ठरवलं. दुसर्या चरणात वेद आणि गोपिका यातील कोणाला निवडायचं हे शहाणा माणूस जाणतो असं म्हणून जो शहाणा सांगितला तो तुकोबारायांना अभिप्रेत आहे. वारकरी संप्रदायाने वैदिक परंपरेतील पांडित्य आणि शहाणपण नाकारलं. उलट अर्थाने वारकरी संप्रदायाच्या संदर्भात मात्र जे संतांचा मार्ग निवडून त्यांच्या अभंगांचा गर्भितार्थ आणि गाभा समजून घेतात ते शहाणे तुकोबारायांना अभिप्रेत होते. पांडित्याच्या बाबतीतही जे वारकरी संतांच्या अभंगांचं वर्म समजून घेतील आणि विठ्ठलभक्ती करतील ते पांडित्य संतांनी नाकारलं नाही. ‘पंडित तोचि भला। नित्य भजे जो विठ्ठला।।’ असं त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात.
वास्तविक पाहता शहाणा आणि वेडा या संकल्पना व्यक्तीसापेक्ष आहेत. एका अभंगात तुकोबारायांनी ‘तुका वेडा अविचार। करी बडबड फार।।’ असं म्हणत स्वतःला वेडा म्हणवून घेतलं आहे. त्याचा उलगडा त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणात होतो. तुकोबाराय त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात ‘अहो पंडितजन। तुका टाकावा थुंकोन।।’ तुकाराम महाराजांचं तत्त्वज्ञान, त्यांची विचारसरणी, त्यांची वारकरी परंपरा आणि त्यांचं भक्तीकार्य याचं महत्त्व समजून घेण्याची कुवत आणि बौद्धिक क्षमताच त्या काळच्या वेदांती पंडितांकडे नव्हती. ते ज्ञानाभिमानाने, वर्णाभिमानाने आणि कर्माभिमानाने ग्रस्त होते. या अभिमानाने गर्विष्ठ बनलेल्या या पंडितांना तुकोबारायांचा महिमा सांगण्याची जबाबदारी पार पाडली ती एकेकाळी ‘शास्त्रीपंडित’ असलेल्या रामेश्वरशास्त्रींनी. अशा द्विजांना तुकोबारायांचा महिमा सांगताना रामेश्वरशास्त्री ‘वर्ण अभिमाने कर्म अभिमाने। नाडले ब्राह्मण कलीयुगी।’ असं म्हणून त्यांना ‘म्हणे रामेश्वर भट द्विजा। तुका विष्णू नाही दुजा।।’ याची जाणीव करून देतात.
पांडित्याचा संबंध ज्ञानाशी जोडला जातो. जर ज्ञानावर पांडित्य ठरत असेल तर त्या ज्ञानाला कोणतीही मर्यादा नसायला हवी. पण तथाकथित वैदिक पंडितांच्या लेखी ज्ञान म्हणजे फक्त वेदोपनिषदातील ज्ञान. या वेदोपनिषदाचाही अधिकार फक्त उच्चवर्णीय पुरुषांपुरता मर्यादित आहे. त्यामुळे वैदिक पंडितांच्या लेखी फक्त उच्चवर्णीय पुरुषच ज्ञानी असू शकतात. याच भूमिकेतून हे पंडित बहुजन संतांना ज्ञानहीन म्हणून हिणवत होते. जेव्हा बहिणाबाई पाठक यांनी तुकोबारायांना गुरू मानलं तेव्हा मंबाजीची प्रतिक्रिया- ‘स्वप्नीचा उपदेश गुरू केला शूद्र। तो ही बळीभद्र ज्ञानहीन।।’ अशी होती. अर्थात संतांनी पंडितच खरे अज्ञानी हे लोकांना दाखवून दिलं.
मुळात वेदोपनिषदाचं बंधन परमेश्वराच्या भक्तांना नाही. ते बंधन फक्त अज्ञानी म्हणजेच अविद्याग्रस्त लोकांकरिता आहे. यासंदर्भात एकनाथी भागवतात एकनाथ महाराजांनी भागवतांच्या आधारे स्पष्ट लिहिलं आहे –
‘अविद्याभेद सबळ ज्यासी।
वेदु नियामक म्या केला त्यासी।
मद्रूपी अभेदता ज्या भक्तासी।
मिणधा त्यापाशी वेदवादु।।’
या ओवीचा अर्थ असा की ज्यांना देवाच्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे भेदाची भावना प्रबळ झालेली असते त्या अज्ञानी लोकांसाठी वेदाचं बंधन आहे. जे भक्त आहेत, ज्यांना परमेश्वराविषयी प्रेमाची भावना आहे त्यांना वेदाचं बंधन नाही. वैदिक पंडित आणि संत यांच्यातील हे वैचारिक अंतर समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळेच तुकोबाराय प्रस्तुत अभंगात पंडित आणि शहाणा माझ्या कामाचा नाही असं म्हणतात. तिसर्या चरणात तुकोबाराय सांगतात की देवाच्या नामावर आणि रूपावर ज्याचं चित्त जडलं आहे त्याचा मी दास आहे. वारकरी संप्रदायात देवाच्या नामाचा आणि रुपाचा महिमा वारंवार सांगितला गेला आहे. अभंगाच्या अखेरच्या चरणात तुकोबारायांनी शुद्धत्वाची कसोटी सांगितली आहे. जो नवविध भक्ती जाणतो तोच शुद्ध आहे असं तुकोबाराय म्हणतात. नवविध भक्ती म्हणजे नऊ प्रकारची भक्ती. श्रवण, कीर्तन, वंदन, अर्चन, दास्य, आत्मनिवेदन, सख्य, स्मरण आणि पादसेवन अशी नऊ प्रकारची करणं जो जाणतो तोच शुद्ध आहे असं तुकोबाराय सांगतात. संतांच्या काळात शुद्धतेचा निकष जातीशी जोडला गेलेला होता. वरच्या जातीचे पुरुष शुद्ध तर सर्व स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र जातवर्णातील पुरुष हे अशुद्ध मानले जात होते. संतांनी मात्र शुद्धतेचा निकष भक्तीचा असल्याचं सांगितलं. भक्ती करणारा मग कोणत्याही जातीचा असो तो शुद्धच आहे ही संतांची भूमिका होती. त्यामुळेच ‘शुद्ध चोखामेळा। करी नामाचा सोहळा।।’ अशी गर्जना संतांनी केली.
