
ही कसली सोसायटी आहे काय माहीत? पण सोसायटीच्या नावात काही विविध आणि कार्य असलं काही जोडलं गेलंय. पण अधिकाधिक काळ ती बंदच असते. तिथल्या समोरल्या थोडक्या जागेत गावातली पोरं क्रिकेट खेळायला आणि बसून गप्पा झोडायला येतात. केतन, परेश आणि नयन तिघे सोसायटीच्या पायर्यांवर गप्पा झोडत बसलेत. अर्ध्या घरात भांडण झालं म्हणून घरच्यांना आणि मित्रांना चटकन सापडू नये म्हणून आज इथं त्यांच्यासोबत पण थोडा दूर बसलाय. तसे तिघे अर्ध्याच्या ओळखीचे, पण डोक्यातील तिडीक आणि राग निवळेपर्यंत किमान शांत बसण्यासाठी अर्ध्यानं मुद्दाम अंतर राखलंय. त्यात हातात मोबाईल आणि हातानं चाळण चालू आहे. समोर काही मुलं क्रिकेट खेळताय. एकाएक त्यांच्यात भांडणं झालीत, एकजण माझी बॅट, माझी बॅट म्हणत तावातावाने बॅट घेऊन निघून गेला. त्यामुळं बाकीचे पोरं पांगू लागले. पण अचानक एकजण हॉकी स्टिक घेऊन तिथं आला, तिसर्या एकानं टेनिस बॉल शोधला आणि क्रिकेट पुन्हा सुरू झालं.
‘साला पेड्डी काय सिन्मा आहेऽ? कमाऽऽल! तेलगूवाले टॉपचे पिक्चर बनवतात मात्र!’ नयननं चर्चेला तोंड फोडलं.
‘ते कसलं काय? तू हे तामिळ, मल्याळम पिक्चर पहाय! मग तुला दर्जा कळंल!’ परेशनं काडी टाकली.
‘हट! मी फक्त प्रभास, अल्लू अर्जुनचे पिक्चर बघतो. काय अॅक्टिंग करतात ते? जबरदस्त!’ नयननं पोथी उघडली.
‘अरे ते फक्त मारधाड पिक्चर बनवतात. फिझिक्सला वात आणतात. एक ठोसा मारला का गडी अर्धा किलोमीटर उडतो. असं कुठं असतं का? मल्याळम बघ!’ परेशनं सल्ला दिला.
‘पण बाहुबलीसारखे पिक्चर कुठं जमतात त्यांना?’ नयननं पहिलं पारायण सुरू केलं.
‘अरे बाबा, मल्याळम, तमिळ बघशील तर त्यात सगळ्या प्रकारचे चित्रपट बनवले जातात. त्यात त्यांचे विषय काय भारी असतात सांग रे अर्ध्या! तू तो बघितला ना?’ परेशनं अर्ध्याला साक्षीसाठी हाक दिली.
‘हा तो मामानाना ना? भारी वाटला! पण अर्ध्यातून पुढं झोप लागली. पुरा पहायचा राहून गेला बघ!’ अर्ध्यानं मोबाईलमधली नजर काही वेळ हटवत लागलीच साक्ष नोंदवली.
‘मामानाना? असला कुठला पिक्चर आहे?’ नयन हसायला लागला.
‘साल्या तुला नाव सुद्धा घेता येत नाही का?’ परेश अर्ध्यावर चिडला.
‘मी दाखवला तो रे?’ आता नयननं अर्ध्याला विचारलं.
‘वक्रतुंडपूर चांगला होता! पण पाच-पाच मिनिटं सुरुवात आणि एन्ड बघितली फक्त! त्यात बर्याच स्टोर्या सिरीयलच्या
कॉपी केलेल्या असतात. त्यात सध्या टाइम नसतो.’ अर्ध्यानं कारण दिलं.
‘यंटम आहे का रे तू? कोणी असं सुरुवात आणि डायरेक शेवट बघतं का? पिक्चर एकतर पूर्ण बघायचा नाहीतर बघायचाच नाही.’ आता नयननं अर्ध्याला झापलं. पण आता हसायची वेळ परेशची होती, तो मोठमोठ्याने हसायला लागला.
‘काय बकवास पिक्चर बघत असतात तुम्ही? त्यापेक्षा हॉलिवूडचे पिक्चर बघायचे. ओटीटीवरच्या सिरीज बघायच्या…’ केतनला आता कंठ फुटला. तितक्यात कुठून अभिनव आला. तो बसला.
‘हे पिक्चर तेलुगू पिक्चरसारखे आपल्यातले नाही वाटत.’ नयन मात्र त्याच्या मतावर ठाम.
‘हां तू तर एक बुक्कीत लोखंड वाकवतो नाही का, ते तुला आपल्यातले वाटायला! त्यापेक्षा मल्याळम, तमिळ बघ! स्टोर्या रिलेट करतात त्या! आशयगर्भ का काय? असे पिक्चर असतात ते!’ परेश त्याचा हेका सोडायला तयार नाही.
‘हा मी बघितलेत, एटीनाईन, धरणम्…’ अर्ध्यानं मध्येच तोंड मारलं.
‘तू गप्प बस रे!’ परेश आता जाम चिडला. नयन, केतन हसायला लागले. अभिनव मात्र गप्प ऐकतोय.
‘त्यापेक्षा मी तुला काही सिरीज पाठवतो. त्या बघ! ह्या टेलिग्राम लिंक आहेत त्या…’ केतन मोबाईलमध्ये शोधायला लागला.
‘हां, ती शेम ऑफ ब्रोन्स बघितली मी! पण त्यातल्या गंजलेल्या तलवारी बघितल्या अन् मराठी सब टायटल नव्हतं मग कंटाळा येऊन उडवल्या…’ अर्ध्या पुन्हा बडबडला.
‘तुझ्या तर्… साल्या! एक नाव धड घेत नाही. काहीही बडबडतोय केव्हाचा!’ आता केतन चिडला. तसा अर्ध्या घाबरून आकसून पुन्हा मोबाईल बघत बसला.
‘कोणी काही म्हणो! तेलुगूच बेस्ट!’ नयननं मात्र आधीचाच सूर आळवला.
‘त्यापेक्षा कालाचा दिग्दर्शक एक नवा पिक्चर घेऊन येतोय तो बघ! पुन्हा तेलुगू बघणार नाही तू.’ परेशनं रजनीकांतसारखी कॉलर उडवली.
‘अरे हे सगळे हॉलिवूड-बिलिवूडकडून स्टोर्या कॉपी पेस्ट मारून, चोर्या करून इथं त्यात इंडियन मसाला भरून सर्व्ह करतात. यांचं काय स्वतःचं असतं?’ केतनला पुळका हॉलिवूडचा.
‘अरे त्यापेक्षा आपलं महाभारत रामायण बघ! त्यातल्या स्टोर्या कॉपी पेस्ट करून तिथले लेखक गब्बर झाले. जे पळवलं, ते सगळं भारतातून!’ आता अभिनव बोलू लागला.
‘अरे त्या वेगळ्या विषयावर आहेत, कुठं काहीही जोडतोय तू!’ केतन समजवायला लागला.
‘वेगळं काय? ह्या सगळ्या कल्पना आपल्याच आहेत. सगळ्या पुराणांत, रामायण, महाभारतात ह्या कथा, कल्पना आणि विषय आहेत. त्याच इंग्रजांनी पळवल्या. हे सगळ्यांना माहीत आहे.’ अभिनवनं त्याचा मुद्दा रेटला.
‘धन्य आहे भाऊ!’ केतननं हात जोडले.
‘धन्य काय? आपला ५००० सालाचा गौरवशाली इतिहास आहे हा! तुम्हाला, मला, त्याचा जाज्वल्य अभिमान वाटायला हवा! जरा व्हाट्सअप बघत चला. हे आंतरराष्ट्रीय चोरटे भारताच्या कथा कल्पना कशा चोरतात ते कळेल!’ अभिनवनं पुरावे द्यायला सुरुवात केली.
‘मनी हाईस्ट, मार्व्हल सिरीज, गेम ऑफ थ्रोन्स…. असलं सगळं आपल्याच इथलं आहे तर…’ केतननं मुद्दाम विचारलं.
‘तर तर! हे मी आता सिद्ध करून देऊ शकतो. हे बघ हा व्हाट्सअप मेसेज बघ! यात सगळं डिटेल आहे!’ अभिनवनं मोबाईलमधला मजकूर तात्काळ सेंडला.
‘यायला! मग काही दुसरं बघावा की नाही?’ परेशला प्रश्न पडला.
‘गरज काय आहे? सगळं मराठीत आहे! मराठी नाटकं, सिनेमे इतके समृद्ध असतांना आपण दुसरं का बघावं?’ अभिनवनं उलट प्रश्न केला.
‘म्हणजे?’ नयनला प्रश्न पडला.
‘आता अशी ही बनवाबनवी ह्या चित्रपटाच्या दर्जाचा पिक्चर कुठल्या तरी भाषेत झालाय का? मी सांगतो ना! कुठेच नाही! माहेरची साडी? हॉलिवूडवाल्यांना म्हणून बघा! जमतंय का? करा प्रयत्न! नाही जमणार! तितकं सटल, भावनात्मक विषय ते हाताळूच शकत नाही.’ अभिनव विजयी मुद्रेने मराठीचे गोडवे गायला लागला.
‘हा तिकडं साड्या कुणी नेसतच नाही!’ केतननं वास्तव सांगितलं.
‘आता चूळबंद पिक्चर आलेला! परडे आहेत ना? त्यांना सल्ला आहे. त्यांनी पुढल्या पार्टमधी त्या पाश्चात्य मार्व्हल स्टोर्यांचा समाचार घ्यावा. हे पुचाट नास्तिक चांगले ठेचलेत त्यांनी!’ अभिनव गर्वाने बोलू लागला.
‘मग रे आता आम्ही काय बघावं?’ परेशनं मांजरागत विचारलं.
‘मी करतोय सोय.’ अभिनवनं उत्सुकता ताणत सांगितलं.
‘कसली? काही चित्रपटगृह काढतोय की काय?’ नयनला वेगळी शंका.
‘नाही सगळ्या मराठीजणांना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला हेवा वाटेल अशी निर्मिती असेल ती!’ अभिनव उत्सुकता बेडकसारखी फुगवत चालला.
‘काय चित्रपट काढतो की सिरीयल?’ केतननं प्रश्न केला.
‘अरे असं काही नाही! पण मराठीजणांच्या नजरा आणि आंतरराष्ट्रीय रंगमंचाची अपेक्षा वाढेल. पुन्हा सगळे मराठीकडे खेचले जातील असं असेल काही…’ अभिनव अजूनही कोड्यातच बोलतोय.
‘अरे काय ते सांग पटकन.’ नयननं अधीरतेने विचारलं.
‘नाटक लिहिलंय मी!’ अभिनवनं गुपित फोडलं.
‘त्यात काय जपानी, कोरियन नाटकांसारखे चित्तथरारक स्टंट असतील की…’ केतन विचारू लागला.
‘का काही नवीन विचार नवीन आशय नवीन प्रयोग असेल?’ परेशलाही प्रश्न विचारायचाच आहे.
‘का काही महाभारत किंवा पुराण कथा मोठ्या, भव्यदिव्य स्वरूपात मांडायच्या आहेत?’ नयन मागे राहील कसा?
‘सामान्य मराठी प्रेक्षक व आंतरराष्ट्रीय मंडळी आकर्षित होतील असा विषय मांडेन मी!’ अभिनव त्याच्या स्वप्नरंजनात रमलेला.
‘सांगणार आहेस की जाऊ?’ परेश, नयन आणि केतन तिघे एकसुरात बोलले.
‘अरे नवरा बायकोच्या नाजूक संबंधावर आधारित नाटक असेल. ज्या दृष्टिकोनातून कुणी आजवर त्या नात्याकडे बघितलं नसेल अश्या पद्धतीने मांडणी केली आहे मी! आणि मला खात्री आहे! मराठी प्रेक्षक भरभरून ते नाटक बघायला जातील, आणि पुन्हा मराठी नाटक, आणि सिनेसृष्टीला चांगले दिवस येतील.’ अभिनवनं स्वतःच्या लेखनावरचा ठाम विश्वास जाहीर केला.
‘असंय तर!’ नयनला आता बोध झाला.
‘तुम्हीही या बघायला माझं नाटक लग्नानंतरचा बारावा महिना!’ अभिनवनं सगळ्यांना आमंत्रण दिलं.
‘आधी अर्ध्याला विचार!’ केतननं स्वतःवरचं झटकून अर्ध्याकडं बोट दाखवलं.
‘येशील ना अर्ध्या?’ अभिनवनं अर्ध्याला विचारलं.
‘नाही रे! सध्या हे रील बघतोय!’ अर्ध्यानं त्याची विनंती वरच्यावर उडवली.
‘यायला पहिलाच मराठी प्रेक्षक नाही म्हंटला रे तुला!’ परेशनं अभिनवला भडकवलं!
‘साल्या!’ अभिनवनं पोरांची हॉकी स्टिक हिसकावून अर्ध्याच्या मागे धाव घेतली! बिचारा अर्ध्या काहीही न कळल्याने जीव वाचवत पळत सुटला.

