
न लगे पाहावे अबद्ध वाकडे।
उच्चारावे कोडे नाम तुझे ।।१ ।।
नाही वेळ काळ पंडितांचा धाक।
होत का वाचक वेदवक्ते ।।२ ।।
वेदी जे प्रतिपाद्य कोठे न मिळे पाहता।
तैशी या अनंता ठेवू नामे ।।३ ।।
आपुलिया मना उपजे आनंद।
तैसे करू छंद कथेकाळी ।।४ ।।
तुका म्हणे आम्ही आनंदेचि धालो।
आनंदचि ल्यालो अलंकार ।।५ ।।
मागच्या भागात या अभंगाच्या निरुपणात आपण नाममंत्र आणि वेदमंत्र याची तुलना पाहिली. त्याच अनुषंगाने प्रस्तुत अभंगातल्या तिसर्या चरणाचे निरुपण करत असताना वेदात नसलेल्या पण वेदाने प्रतिपाद्य केलेल्या देवाच्या नामाचा उच्चार आवडीने करतो असं तुकोबाराय का म्हणतात, याचा उलगडा आपण पाहत होतो. त्यासाठी आपण ज्ञानेश्वरीचं उदाहरण घेतलं. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत सुरुवातीलाच ‘ओम नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा ।।’ असं जे म्हटलं आहे त्यातील वेदप्रतिपाद्य आद्यतत्व म्हणजे विठ्ठलच आहे. ज्ञानेश्वरीतील सुरुवातीच्या या नमनपर ओव्या गणेशवंदनेच्या असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. वास्तविक या ओव्या गणेशरूपाने केलेल्या विठ्ठलवर्णनाच्या आहेत. त्याची मांडणी वारकरी भाष्यकार आणि फडकरी वै. बाबासाहेब आजरेकर यांनी त्यांच्या कीर्तनात केलेली होती. ज्याप्रमाणे संपूर्ण ज्ञानेश्वरीत विठ्ठल किंवा पांडुरंग हा शब्द नसला तरी ज्ञानेश्वरीत देव म्हणून जे काही वर्णन आलं आहे ते विठ्ठलाचं आहे. त्याचप्रमाणे वेदांत विठ्ठल हा शब्द नसला तरी वेदाने विठ्ठलाचंच प्रतिपादन केलं आहे अशी संतांची भूमिका होती. साहजिकच तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या तिसर्या चरणात ‘वेदी जे प्रतिपाद्य कोठे न मिळे पाहता। तैशी या अनंता ठेवू नामे ।।’ असं म्हणतात, त्यामागे ही तात्त्विक भूमिका आहे.
आता जर वेदाने विठ्ठल हेच आद्यतत्व प्रतिपाद्य केलेलं असेल तर वेदमंत्रातल्या नावाने मंत्रोच्चार करायचा सोडून आवडीच्या इतर नावाने स्मरण करण्याची गरजच काय, असा प्रश्न उभा राहतो. या प्रश्नाच्या उत्तराचं मूळ आवड या शब्दातच आहे. कागदोपत्री नावापेक्षा लाडाच्या, आवडीच्या आणि प्रेमाच्या नावाचीच गोडी जास्त असते. मूळ कागदपत्रातल्या नावाला व्यवहारात काही अर्थच नसतो. इथे वेदातील देवाचा नामोच्चार करायचा तर अनेक बंधनं येतात आणि त्यातली गोडीच निघून जाते. उलट देवाच्या आवडीच्या नामाला ना वेदाचं बंधन, ना पंडितांचं बंधन, ना वेळ काळाचं बंधन, ना शुचित्वाचं बंधन.
वेदात प्रतिपाद्य केलेल्या देवाचं नाम ‘ओम’ म्हणजे ‘प्रणव’ आहे. प्रणव आणि ओम एकच आहे. ज्ञानेश्वरीतही याचा उल्लेख आला आहे. ‘म्हणोनि प्रणवैकनाम। हे एक क्षर ब्रह्म। जो माझे स्वरूप परम। स्मरत सांता ।।’ अशा शब्दात ज्ञानदेवांनी प्रणवनाम हे देवाचं परम स्वरूप असल्याचं सांगितलं आहे. अर्थात वेदाने प्रतिपाद्य केलेल्या देवाच्या या प्रणवनामापेक्षा संतांच्या आवडीच्या विठ्ठलनामाची गोडी काही औरच आहे. त्यामुळेच वेदाधारित प्रणवमंत्रोच्चारापेक्षा संतप्रतिपादित विठ्ठलनाममंत्राचा जप अधिक श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वरीत त्याचाही उल्लेख आला आहे. ‘सर्व यज्ञात जपयज्ञ श्रेष्ठ आहे’ या मूळ गीतेतल्या प्रमेयाच्या विस्ताराचं निमित्त करत ज्ञानदेव थेटपणे नामजपाचं श्रेष्ठत्व पटवून देतात.
समस्ताही यज्ञांच्या पैकी।
जपुयज्ञ तो मी ये लोकी।
जो कर्मत्यागे प्रणवादिकी।
निपजविजे ।।
अर्थ- संपूर्ण यज्ञात कर्मकांडी यज्ञ (रुढ यज्ञ) त्यागून जे प्रणवादी मंत्रजपांचे जपयज्ञ आहेत तो जपयज्ञ म्हणजे मी (देव) आहे.
नामजपयज्ञु तो परम।
बाधू न शके स्नानादी कर्म।
नामे पावन धर्माधर्म।
नाम परब्रह्म वेदार्थे ।।
अर्थ- संपूर्ण प्रणवादी जपयज्ञात नामजपयज्ञ हा परम म्हणजे श्रेष्ठ आहे. त्याला स्नानादी कर्माचं बंधन नाही.
इथे ज्ञानदेवांनी मेख मारली आहे. आधीच्या ओवीत त्यांनी कर्मकांडी यज्ञापेक्षा प्रणवादी जपयज्ञ श्रेष्ठ ठरवला आणि नंतरच्या ओवीत प्रणवादी सर्व जपयज्ञात नामजपयज्ञ श्रेष्ठ आहे हे दाखवून दिलं. शिवाय श्रेष्ठ गोष्टी कठीण असतात पण इथे नामजपयज्ञ श्रेष्ठ असूनही स्नानादी कर्माचं बंधन नसल्यानं सुलभही आहे हे माऊलींनी सूचकपणे दाखवून दिलं. या दुसर्या ओवीतूनच वारकरी संप्रदायाचा गाभा आलेला आहे. ही ओवी वारकरी संप्रदायात आणि ज्ञानेश्वरीत प्रचलित असूनही ज्ञानेश्वरींच्या जुन्या हस्तलिखित प्रतीत मात्र दिसत नाही. यातून ज्ञानेश्वरीतल्या अशा अनेक ओव्या वगळल्या जाऊन त्यातला मुख्य आशयच नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला असण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत.
नामजपयज्ञ हा प्रणवादी जपयज्ञात परम म्हणजे श्रेष्ठ ठरण्याचं एक कारण ज्ञानदेवांनी दिलं ते म्हणजे त्याला स्नानादी कर्माचं बंधन नाही. त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे प्रणवादी मंत्रांचा उच्चार करण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णीय पुरुषांना आहे तर नामजपयज्ञाचा अर्थात विठ्ठल नामस्मरणाचा अधिकार सर्वांना आहे. स्त्रियांना प्रणवाचा अधिकार नाही. यासंदर्भात संत बहिणाबाईंनी ‘करू नये मुखे प्रणवाचा उच्चार। बीजाचा संचार ऐको नये ।।’ अशा शब्दात स्त्रियांना (ब्राह्मण स्त्रियांनाही) प्रणवाच्या उच्चाराचा अधिकार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. ज्याप्रमाणे स्त्रियांना हा अधिकार नाही त्याचप्रमाणे शूद्रातिशूद्रांनाही हा अधिकार नाही. त्यामुळेच ओम असा उल्लेख असलेल्या मंत्रातील ओम वगळून प्रणवरहित मंत्र म्हणावा असं धर्मशास्त्राचं बंधन आहे. यासंदर्भात महामहोपाध्याय पां. वा. काणे लिहितात-‘ शूद्र आणि चांडाळ यांच्यासह सर्व व्यक्तींना १३ अक्षरांच्या राममंत्राचा (श्रीराम जयराम जयजय राम’ या मंत्राचा) आणि ५ अक्षरांच्या शिवमंत्राचा (नमः शिवाय) जप करण्याचा अधिकार होता. द्विज (उच्चवर्णीय पुरुष) मात्र सहा अक्षरांच्या शिवमंत्राचा (ओम नमः शिवाय या मंत्राचा) जप करू शकत.’ काणे यांनी सांगितलेला हा धर्मशास्त्राचा नियम प्रत्यक्ष व्यवहारातही काटेकोरपणे पाळला जात होता. त्यामुळेच बहिणाबाईंनीही त्यांच्या अभंगात प्रणव उच्चाराचा अधिकार नसल्याचं सांगितलं आहे.
त्याचबरोबर आणखी एक प्रसंग सत्यशोधक पंढरीनाथ पाटील यांच्याबाबतीत घडला होता. त्याविषयी ‘पंढरीनाथ पाटील : राजकीय व सामाजिक कार्य’ या पुस्तकात लेखक डॉ. मनोज डांगे आणि डॉ. नामदेव ढाले लिहितात- ‘पंढरीनाथ पाटील यांची धार्मिक वृत्ती व त्यांचा दृढ विश्वास, यामुळे त्यांनी या बुवांकडून कानमंत्र घेण्याचे ठरविले. इतरांसोबत नारळ व एक रुपया घेऊन ते गुरु करण्यासाठी रांगेमध्ये लागले. आपली वेळ आल्यानंतर पंढरीनाथ पाटील यांनी बुवांकडून कान फुंकून घेतला व बुवांनी त्यांना मंत्र दिला तो असा होता, ‘नमो भगवते वासुदेवाय नमः’ हा मंत्र सांगून मोहनबुवा पंढरीनाथ पाटील यांना कानात हळूच म्हणाले, ‘हा मंत्र रोज मनात एकदा तरी जपावा, हा कानमंत्र दुसर्या कोणालाही सांगू नको, सांगशील तर देवाचा व गुरुचाही गुन्हेगार होशील.’ हे ऐकून पंढरीनाथ पाटील बुवांना म्हणाले, ‘हा मंत्र चुकीचा आहे.’ तेव्हा बुवांनी विस्मयाने विचारले की मंत्रात काय चूक आहे? तेव्हा पंढरीनाथ पाटील म्हणाले, ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ असा हा मंत्र आहे. तेव्हा बुवा म्हणाले, ‘तू कशावरून म्हणतोस?’ पंढरीनाथ पाटील म्हणाले, मी पुस्तकात वाचले आहे. तेव्हा मी म्हणतो तेच बरोबर आहे, असे बुवांनी ठासून सांगितले व आपले म्हणणेच खरे आहे हे पटवून देण्याचा अट्टाहास त्यांनी केला. परंतु पंढरीनाथ पाटील ते मानायला तयारच नव्हते, तेव्हा बुवा हसले व म्हणाले, ‘तू म्हणतोस ते बरोबर नाही. तो मंत्र जपण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. शूद्राने एकादशाक्षरी मंत्रच जपला पाहिजे. म्हणूनच मी तुला जो मंत्र सांगितला तोच तुझ्यासाठी बरोबर आहे.’ जपासाठी मंत्र देण्याच्या बाबतीत मोहनबुवा पुराणिकाकडून केल्या गेलेल्या या भेदभावाचा अत्यंत खोल परिणाम पंढरीनाथ पाटील यांच्या मनावर झाला. या भेदभावाच्या विरुद्ध त्यांच्या मनात बंडखोरीचा वणवा पेटला आणि पुढे ते सत्यशोधक समाजात सहभागी झाले. महात्मा फुल्यांचं पहिलं सविस्तर चरित्र त्यांनीच लिहिलं. त्यांच्या या बंडखोरीची मूळंही वारकरी संप्रदायातच सापडतात. ते बालपणी वारकरी होते. ते मुक्ताईंची वारी करत. गळ्यात तुळशीमाळ, कपाळावर उभा गंध, अंगावर गोपीचंदनाच्या मुद्रा असा त्यांचा वेष असायचा. सकाळी तुळशीला पाणी घालणं, देवपूजा, नामस्मरण आणि मारुती दर्शनही ते करत असत. दर एकादशीला ते डिघीला कीर्तन ऐकायला जात. पुढच्या काळात ते कीर्तनही करायला लागले. साहजिकच वारकरी संप्रदायाच्या या संस्कारानेच पुढच्या काळात त्यांनी सत्यशोधक विचारांचा प्रसार केला.
पंढरीनाथ पाटील यांना जपमंत्राचा जो भेदभावाचा अनुभव वाट्याला आला त्यावरचा उतारा तुकोबारायांच्या प्रस्तुत अभंगात सापडतो. देवाचं नामस्मरण करताना ते आवडीने केलं तर ते नाम वेदबाह्य असूनही देवाला आवडतं. त्यामुळे वेदाने जरी भेदभाव केला असला तरी ‘वेदाचे ते मूळ तुका म्हणे।’ या न्यायाने वेदांचा बाप असलेला विठ्ठल मात्र भेदभाव करत नाही. त्यामुळेच वेदाने केलेल्या भेदभावाची तुकोबाराय पर्वा करत नाहीत. ‘वेद आम्हावरी रुसोनिया गेला। आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी ।।’ असं तुकोबाराय सांगतात. या अभंगातही वेदाचा बाप आम्ही कंठात धारण केला आहे म्हणजे आम्ही कंठात देवाचं नाम धारण केलं आहे असं तुकोबारायांना म्हणायचं आहे. त्यामुळेच तुकोबाराय वेदाची पर्वा न करता आवडीच्या नावाने देवाचं स्मरण करतात. त्यांच्या नामस्मरणाचा हेतू आनंद मिळवण्याचा आहे. त्यामुळेच प्रस्तुत अभंगात ‘आपुलिया मना उपजे आनंद। तैसे करू छंद कथेकाळी।।’ असं चरण आहे. किंबहुना नामस्मरणाच्या आनंदाचे अलंकारच तुकोबारायांनी परिधान केलेले आहेत. ‘तुका म्हणे आम्ही आनंदेचि धालो। आनंदचि ल्यालो अलंकार ।।’ असे तुकोबारायांचे शब्द आहेत.
