• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टोपी संभालो दिनकरराव!

मर्मभेद

Marmik Team by Marmik Team
August 28, 2026
in मर्मभेद
0
टोपी संभालो दिनकरराव!

भा रतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मातृसंघटनेचा परिवार यांचा तसा अभ्यासाशी फार संबंध नाही! बाबा वाक्यम् प्रमाणम् पद्धतीने अधिकाधिक घोकंपट्टी करणार्‍याला ते विद्वान वगैरे समजतात. अभ्यासासाठी आवश्यक चिकित्सेचं त्यांना कायमच वावडं राहिलेलं आहे. पण, समजा, त्यांनी खरोखरचा अभ्यास केला असता आणि बनावट डिग्री सर्टिफिकेटं (तीही बनावट डिग्री घेतलेल्यांकडूनच बनवून घेतलेली असावीत इतकी सुमार) छापून घेण्याऐवजी कधी खरोखरची परीक्षा दिली असती आणि हातात पेपर आल्यावर त्यांच्या लक्षात आलं असतं की आपण आतापर्यंत जो काही अभ्यास केला, त्याचा हा पेपर नाहीच; मंडळाने विषय, अभ्यासाची पुस्तकं , पाठ्यक्रम हे सगळं बदलून टाकलेलं आहे, तर काय झालं असतं?… तोच अनुभव सध्या हा पक्ष घेतो आहे आणि त्यातून त्यांची जी तारांबळ उडते आहे ती पाहणं कमालीचं मनोरंजक आहे… गंमत म्हणजे ज्याला पप्पू ठरवायला हजारो कोटी रुपये खर्च केले, तोच आता यांच्या शाळेचा हेडमास्तर बनलेला आहे आणि तोच त्यांचा अभ्यासक्रम ठरवतो आहे… कर्मा इज ए बिच असं म्हणतात, ते खोटं नाही.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूँज’ हा कार्यक्रम नुकताच पुण्यात झाला आणि तिथे मंचावर, मंचासमोर आणि कार्यक्रम लाईव्ह पाहणार्‍यांच्या मनात पाच तास सलग जे काही घडलं, जे काही उमटलं ते पुढचा बराच काळ मनोमनी गुंजत राहणार आहे. हे भारतीय राजकारणात, समाजकारणात काही अनोखं घडलं आहे, देशाला वेगळी दिशा दाखवणारं आहे. याची सुरुवात झाली नीट पेपरफुटीनंतर. एकंदर शैक्षणिक दुरवस्था आणि जबाबदारी न घेण्याची सत्तेची मस्ती यामुळे विद्यार्थ्यांचा बांध फुटू लागला आणि जेन झी या नावाने ओळखल्या जाणार्‍या तरुणाईचा असंतोष उफाळून आला, तेव्हा सरकारला, भाजपला जाब विचारण्यासाठी राहुल यांनी छात्रों की गूँज हा कार्यक्रम सुरू केला, तेव्हापासूनच त्याचं सगळं स्वरूप टिपिकल राजकीय कार्यक्रमांपेक्षा पूर्णपणे वेगळं राहिलेलं आहे. पाठोपाठ जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पक्षप्रणीत आंदोलन झालं. त्यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण आणि देशभर जेन झीचा झालेला उठाव, यामुळे देशाची हवा अशी काही बदलली आहे की आता भाजपवाले ‘हव्या तितक्या शिव्या द्या, पण आम्हाला आपलं म्हणा’ अशी आर्जवं तरुण पिढीपुढे करत आहेत.
राहुल गांधी हे देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आहेत, त्यांना राजकारणच करायचं आहे, राजकारणातूनच सत्तापरिवर्तन घडवायचं आहे, पण त्यासाठी त्यांनी अवलंबलेला मार्ग पूर्णपणे वेगळा आणि कल्पक आहे, तो देशाच्या राजकारणाची दिशाच बदलणारा आहे. खरेतर भाजपने २०१४ साली अण्णा आंदोलनाच्या आडून असाच बदल घडवून आणला होता. काँग्रेसच्या पठडीबाज, सुस्तावलेल्या राजकारणापेक्षा वेगळ्या प्रकारे, प्रचंड पैसा ओतून, शेअरबाजारात ठरवून एखादा शेअर वर आणावा तसं नरेंद्र मोदी यांचं नेतृत्त्व आधी भाजपमध्ये आणि नंतर देशात वर आणलं गेलं. देशापुढच्या प्रत्येक प्रश्नाला जणू मोदींकडे उत्तर आहे, असं वातावरण निर्माण करण्यात आलं. त्यासाठी गुजरात मॉडेल नावाची बनवेगिरी सोशल मीडियाच्या माध्यमातून खपवण्यात आली. देश ताब्यात आल्यावर मोदी आणि कंपनी त्यांना जो एकच विषय समजतो, त्यावरच घसरली…हिंदू-मुस्लिम दुफळी माजवत राहायचं, हिंदूंना खोट्या भीतीत ठेवायचं आणि दोन शेठजींच्या घशात देश घालायचा! त्यात नरेंद्र मोदींच्या फुग्यात हवा भरून त्यांची अशी काही प्रतिमा निर्माण करण्यात आली होती की तेही स्वत:ला नॉन बायॉलॉजिकल अवतार पुरुष समजू लागले होते. २०२४ ला लोकसभा निवडणुकीत फुगा पंक्चरला आणि लगेच ज्ञानेश पंक्चरवाल्याने एसआयआर नावाचा
पॅच मारून भोकं बुजवायला सुरुवात केली. एसआयआरच्या एका पावलात मतदानाची व्यवस्थाच ताब्यात घेतल्यानंतर आता पुढच्या पावलात डिलिमिटेशन बिल पास करून घ्यायचं आणि कायमस्वरूपी सत्तेत राहण्याची सोय करून टाकायची, असे मनसुबे रचले जात असताना राहुल गांधी यांनी आणि देशातल्या तरुण पिढीने सगळाच अभ्यासक्रम बदलून टाकला आहे.
भाजपने रोज नवनवे, निरर्थक, अस्मिताबाज, लोकांच्या जगण्याशी काहीही संबंध नसलेले विषय काढत राहायचे आणि विरोधी पक्षांना त्यावर प्रतिक्रिया देण्यात गुंतवून ठेवायचं, सतत कोणाला ना कोणाला देशद्रोही, अर्बन नक्षल, दिमागी नक्षल, हिंदूद्रोही वगैरे ठरवत राहायचं, हा भाजपचा आजवरचा खेळ. नको असलेले मतदार उडवायचे आणि निवडणुकीच्या तोंडावर थेट महिलांच्या अकाऊंटमध्ये सरकारचेच पैसे पाठवून मतं विकत घ्यायची, असं मतदारांचं वस्तूकरण करण्यापर्यंत मजल गेली या पक्षाची. आज जेन झी पिढीने हसत, खेळत, गाणी गात, नाचत आणि कमालीची सकारात्मक ऊर्जा दाखवत ही सगळी बेगडी कल्हई काढून टाकली आणि पोचे आलेलं, झिजून गेलेलं मूळ पितळी भांडंही आता भंगारात काढायच्या लायकीचं झालेलं आहे, हे दाखवून दिलं आहे.
राहुल गांधी ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, तो पक्ष कायमच आधुनिकतेचा, नवनवोन्मेषांचा पक्षधर राहिलेला आहे. भाजपचे नेते देशाला बैलगाडीच्या युगातच ठेवायला निघालेले असताना इथे संगणकाचं युग काँग्रेसनेच आणलं होतं. त्यामुळे तरुणाईची भाषा, त्यांची विचारपद्धती आत्मसात करणं काँग्रेसला अवघड नाही. आता खरी परीक्षा आहे ती जुनं ते सोनं, परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन वगैरेंच्या नावाखाली विषमतेला समरसता म्हणणार्‍या संघ परिवाराच्या बुरसटलेल्या, मागासलेल्या विचारसरणीची! ही पुराणगौरवी विचारसरणी आणि हिंदू-मुस्लिम बायनरी यांच्यापलीकडे यांच्याकडे राजकीय, सामाजिक, बौद्धिक भांडवल काहीच नाही. राहुल गांधींच्या उत्स्फूर्त चैतन्याने भारलेल्या कार्यक्रमाला उत्तर देण्यासाठी नागपुरात ‘भाडे के टट्टे’ (शब्दप्रयोग सौजन्य : मा. मुख्यमंत्री) गोळा करून ‘शिस्तबद्ध’ लेझीम नृत्य, ढोलवादन वगैरे परंपरा सादर करून त्यांनी साधारण कल्पनादारिद्र्याची परिसीमा दाखवून दिलेली आहेच.
राहुल राजकीय यशापयशाची पर्वा न करता या देशाची मानसिकता बदलायला निघालेले आहेत. संघ परिवाराचं इंधन असलेल्या मनुस्मृतीपासून धर्मवादापर्यंत प्रत्येक जुनाट गोष्टीच्या बुडाशी सुरुंग लावत निघालेले आहेत. ही लढाई वेगळीच आहे. हे वादळ असं घोंघावायला लागलं आहे की समस्त मागासबुद्धी दिनकररावांना (काळी असो की अन्य रंगाची) टोपी सांभाळायची वेळ आली आहे…
…रिकामं डोकं उघडं पडण्याची रिस्क कोण घेणार?

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे

Next Post

तर आज दोन निरागस जीव वाचले असते…

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.