१५ ऑगस्ट १९६४ या तारखेच्या मार्मिकमध्ये बाळासाहेबांनी रेखाटलेली ही जिवंत रविवारची जत्रा. एखाद्या चित्रपटासारखी सरसर सरकत पुढे जाणारी आणि स्वातंत्र्याचा तोवरचा म्हणजे १८ वर्षांचा प्रवास दाखवणारी. सिनेमांमध्ये मोठा काळ झरझर दाखवण्यासाठी माँटाजचा वापर करतात. प्रत्येक काळातली प्रमुख दृश्यं झरझर उलगडत जातात त्या चित्रणातून, तसा हा झरझर उलगडणारा देशाच्या प्रवासाचा कालपट. ब्रिटिशांच्या शृंखलांमधून देश मुक्त झाला तिथून या सिनेमाची सुरुवात होते, आता सगळे आबादीआबाद होईल, असे वाटत असताना सर्वसामान्य माणसाचा हळुहळू भ्रमनिरास होत गेला. असंतोष आणि मोर्चे यांनी आसमंत व्यापला, मोजक्याच शेठजींच्या तिजोर्या भरत गेल्या, वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांमधूनही देशाची भूक भागेना, वेळ उलटून गेल्यावर जागे होण्याच्या सवयीमुळे आपल्यावर आक्रमणं झाली, एक प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रश्न निर्माण करणं हेच आपलं धोरण राहिलं. साधे साधे निर्णयही सरकारी लालफीतशाहीत अडकले, अन्नटंचाई, पाणीटंचाई, भ्रष्टाचार यांची भुते लोकशाहीला भेडसावू लागली… यातली प्रत्येक परिस्थिती मांडताना बाळासाहेबांनी स्वतंत्र चित्राइतका विचार करून एकेक फ्रेम रचली आहे… भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांनी तो पुरता लुटला होता, नवजात देशाच्या सरकारसमोर प्रचंड आव्हानं होती… देशाने यातल्या अनेक आव्हानांवर मात केली, प्रगती केली, तरी गेल्या काही वर्षांमध्ये दिशाच भरकटल्यामुळे आज ८० वर्षांनंतरही काही प्रश्न तसेच आहेत… बाळासाहेबांनी लालबहादूर शास्त्री आणि पंडित नेहरू या शास्त्रीपंडितांचे महत्त्व वाढले आणि कृषिपंडित शेतकर्याकडे दुर्लक्ष झाले, असं म्हटलं आहे… ते शास्त्री आणि पंडित खरोखरीच विद्वान होते आणि त्यांनी देशाला दिलेलं योगदान मोठं आहे… आज ज्यांचं स्तोम माजलेलं आहे, त्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही आणि ओळख आहे ती तडीपार गुन्हेगार अशी. स्मारकबाजीत अडकलेल्या देशात शाळा बांधल्या असत्या तर, असा प्रश्न बाळासाहेबांना पडला होता… आजही स्मारकं, मंदिरं, राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांच्यात अडकलेला देश शाळा बांधायला विसरलेलाच आहे… हीच मूळ प्रवृत्ती असेल आपली, तर ८०० वर्षांनंतरही, देश स्वतंत्र असेलच तर, या परिस्थितीत काही फरक पडला असेल का?
